शासकीय कर्मचार्‍यांना मुख्यालयाचे वावडे

29 May 2024 20:04:38
- ग्रामीण भागातील जनता त्रस्त
- शासन आदेशाची अवहेलना

उमरखेड, 
Umarkhed Gramin : ग्रामीण भागाच्या विकासाची मदार असलेले तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पशुपर्यवेक्षक खर्‍या अर्थाने ग्रामविकासाचा कणा समजला जातो. ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत शासकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाकडून त्यांची नेमणूक होते. मात्र हे कर्मचारी शहरातच स्थायिक झाले असल्यामुळे गरजू नागरिकांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत आहे.
 
 
Grampanchayat
 
Umarkhed Gramin : ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळेवर सुविधा व सेवा मिळाव्या, यासाठी शासनाकडून कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली. कर्मचार्‍यांनी मुख्यालयी हजर राहून तत्परतेने सेवा द्यावी, असा आदेश आहे. मात्र या आदेशाची तालुक्यात कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकारीही या कर्मचार्‍यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येते. घरभाडे भत्त्याचा लाभ घेणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना मुख्यालय जेथे असेल त्या गावात राहणे बंधनकारक आहे. ग्रामीण जनतेच्या दृष्टीने आवश्यक आरोग्य, शिक्षण, पशुवैद्यकीय, वीजपुरवठा यासार‘या सुविधा गावातच आणि वेळेत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र बहुतेक कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सेसेवर विपरित परिणाम होतो.
 
 
सेवा हमी कायदा व आपले सरकारच्या माध्यमातून ठराविक कालावधीत सेवा देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. परंतु शासनाच्या या महत्वाकांक्षी व लोककल्याणकारी ध्येयधोरणाची अंमलबजावणी करण्यात वरिष्ठ अधिकार्‍यांची टाळाटाळीची भूमिका असल्यामुळे कर्मचार्‍यांकडूनही नियमांची खिल्ली उडवली जात आहे.

तालुकास्तर अधिकार्‍यांचेही मराठवाड्यातून ‘अप-डाऊन’
Umarkhed Gramin : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण जनतेचे आरोग्य सांभाळण्याची धुरा असलेले तालुका आरोग्य अधिकारीसुद्धा मराठवाड्यातून ये-जा करतात. लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक सत्रही सुरू होणार आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी होणारी धावपळ, आरोग्य समस्या अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी कर्मचारी मुख्यालयी असणे नितांत गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0