रणरागिणी प्रजावत्सल राणी

    दिनांक :31-May-2024
Total Views |
प्रेरणा
- सोनाली ठेंगडी
आज मुलांच्या बरोबरीने मुलींना प्रगतीची, शिक्षणाची संधी मिळते आहे. हे सर्व पाहून घरातील वडीलधारे म्हणतात, आज काळ बदलला आहे. मात्र, 18 व्या शतकात काही लोक असेही होते ज्यांनी काळाच्या पुढे जात आपल्या कर्तृत्वाची अशी काही छाप सोडली की आजही त्यांचे मोठेपण अजोड आहे. अशीच कथा आहे Ahlyabai Holkar अहल्याबाई होळकर यांची, नव्हे ही कथा फक्त त्यांची नाही तर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर आणि त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांची. कारण हे लोक नसते तर अहल्याबाई घडल्याच नसत्या. अहल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.
 
 
Ahlyabai Holkar
 
एकदा मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडी येथे मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी देवळात एका आठ वर्षांच्या मुलीला गोरगरिबांना अन्नदान करताना आणि देवळातील कामे मोठ्या श्रद्धेने करताना पाहिले. मल्हाररावांनी माणकोजींकडे आपल्या मुलासाठी, खंडेरावासाठी अहल्येचा हात मागितला आणि अहल्या होळकर घराण्याची सून बनून इंदूरला आली. यथावकाश त्यांंना मालोजीराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दरम्यानच्या काळात Ahlyabai Holkar अहल्याबाईंनी आपल्या क्षमाशील, शांत आणि तितक्याच कुशलतेने कुटुंबातील सर्वांचे मन जिंकून घेतले.
 
 
मल्हारराव हे काळाच्या पुढील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित अशा सर्व गोष्टी शिकवल्या. एवढेच नाही तर घोडेस्वारी, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे आणि राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी, आधीच कुशाग्र असलेल्या अहल्येची सामाजिक आणि राजकीय बुद्धी अधिक परिपक्व आणि परिपूर्ण झाली.
 
 
1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहल्याबाईंचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्याकाळच्या रुढी परंपरेनुसार अहल्याबाईंनी सती जाण्याची तयारी केली. मात्र, पुत्रशोकाने विव्हळत असणार्‍या मल्हाररावांनी अहल्येला थांबवले आणि मी पुत्र गमावला आहे, आता तुम्हाला कसे गमावू. तुम्हाला माझा मुलगा बनून प्रजेचा सांभाळ करायचा आहे, असे म्हटले. सासर्‍यांची आज्ञा शिरोधार्य मानून Ahlyabai Holkar अहल्याबाईंनी राज्यकारभाराची सूत्रे अतिशय विनम्रतेने स्वीकारली आणि तितक्याच प्रभावीपणे शासन चालवले.
 
 
मुलाला मृत्युदंड देणारी न्यायदेवता
राज्यकारभार करताना अहल्याबाईंना सासर्‍यांनी दिलेले शिक्षण, प्रशिक्षण कामी आले. त्यांनी त्याच मुशीत आपल्या मुलांनाही घडवले. मुलगा पराक्रमी असला तरी एकदा त्याच्या हातून अक्षम्य अपराध घडला. मुलगा मालोजीराव आपल्या रथातून जात असताना मार्गात एके ठिकाणी गाय आणि तिचे वासरू उभे होते. त्यांना पाहूनही मालोजीरावांनी आपला रथ थांबवला नाही आणि गायीचे वासरू रथाखाली चिरडले गेले. मालोजीराव तरीही न थांबता पुढे निघून गेले. योगायोगाने त्याच मार्गाने अहल्याबाईंचा रथ गेला आणि त्यांनी वासरू मरून पडलेले पाहिले. आजूबाजूच्या लोकांना विचारले असता त्यांनी मालोजीरावांचे नाव सांगितले. अहल्याबाई संतापल्या. महालात पोहोचल्यानंतर त्यांनी मालोजीरावांच्या पत्नीला बोलावून घेतले आणि विचारले, एका आईच्या समोर तिच्या असहाय मुलाची रथाखाली चिरडून हत्या झाली असेल तर काय न्याय करावा? त्यावर सूनबाई म्हणाल्या, त्या खुन्यालाही तशीच शिक्षा व्हावी. लगेच Ahlyabai Holkar अहल्याबाईंनी आपली न्यायपालिका बोलावली आणि आपला मुलगा मालोजीराव यालाही हातपाय बांधून त्याच रस्त्यावर टाकून त्याच्यावरून भरधाव रथ नेण्याची आज्ञा केली. सारेच या न्यायाने हादरले. सर्वांनी आपआपल्या परीने त्यांना मालोजींना माफ करण्याची विनंती केली. गायीच्या वासरासाठी राजपुत्राला मृत्युदंड देणे ही बाब फारच अवघड वाटत होती. या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी मालोजींचे हात-पाय बांधून त्यांना रस्त्यावर टाकण्यात आले. मात्र, कोणीही त्यांच्यावरून रथ नेण्यासाठी तयार होईना. तेव्हा स्वत: अहल्याबाईंनी रथाची कमान आपल्या हाती घेतली आणि त्या भरधाव निघाल्या. आश्चर्य पाहा, रथ वेगाने येत असताना मार्गात गाय आडवी आली आणि तिने जणू काही रथ थांबवला. सारे लोक हे दृश्य आ वासून बघत होते. तेव्हा मंत्र्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी अहल्याबाईंना हात जोडून म्हटले की, राणीसाहेब बघा या गायीची सुद्धा मालोजीरावांचा बळी जावा अशी इच्छा नाही. तेव्हा अहल्याबाईंनी मालोजीरावांना क्षमा केली. अशा कर्मकठोर, न्यायप्रिय शासक होत्या अहल्याबाई.
 
 
पेशव्यांना मुत्सद्देगिरीने फटकारले
वास्तविक, होळकरांना इंदूरचे संस्थान पेशव्यांनी मल्हाररावांच्या काळातच दिले होते. तरीसुद्धा मल्हाररावांच्या मृत्यूनंतर पेशव्यांची मती फिरली आणि त्यांना वाटले की, आता इंदूरमध्ये अहल्यादेवी राज्य करताहेत. एक महिला राज्य करत असल्याने आता हे संस्थान आपल्या ताब्यात पुन्हा घेता येईल. राघोबादादांना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्यांनी पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदूरवर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहल्याबाईला कळताच मुळीच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला. त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फितुरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दु:खात बुडालेेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणार्‍या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल. पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नये. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. मुत्सद्दी अहल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते, पूल निर्माण केले आहेत. मुघल आणि इतर क्रूर शासकांनी ज्या मंदिरांना उद्ध्वस्त केले त्यांचा जीर्णोद्धार अहल्यादेवींनी केला. जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहल्याबाईंनी केलेे. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले.
 
 
दररोज एका शिवलिंगाची प्राप्ती
महेश्वर येथे त्यांनी उभारलेल्या मंदिरात असंख्य शिवलिंग आहेत. असे म्हणतात की, त्या ठिकाणी नदीत स्नानासाठी गेलेल्या Ahlyabai Holkar अहल्याबाईंना पाण्यात डुबकी मारल्यानंतर दररोज एक शिवलिंग हाती लागायचे आणि त्या शिवलिंगाची स्थापना त्या नदीकाठी करत असत. हेच नंतर महेश्वराचे शिवमंदिर म्हणून ख्यात झाले आणि आजही लोक येथे आवर्जून दर्शनासाठी जातात.
 
 
मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदूरवरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली. मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगिचे, वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ज्ञांची मते विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायर्‍या कशा हव्या, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.
 
 
सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार बांधले. तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महामार्ग बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण केली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार्‍या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वत:च्या एकुलत्या एका मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातिभेदाला तडा दिला. Ahlyabai Holkar अहल्याबाई खर्‍या अर्थाने समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रुढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वत:चा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोगसुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खर्‍या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या.
 
 
Ahlyabai Holkar : ‘रामायणा’तील शापित अहल्या आपल्याला घरोघरी माहिती आहे. मात्र, ज्या अहल्येने तब्बल 29 वर्षे निर्धोकपणे यशस्वी शासन केले, अनेक लढाया मारल्या, अजरामर ठरणारे जीर्णोद्धार आणि समाजोपयोगी बांधकाम केले, तिचा जीवनपरिचय बहुतांना नाही, ही शोकांतिका आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे राजांमध्ये सर्वात यशस्वी ठरलेत, तसेच कर्तृत्व, दातृत्व आणि त्याच्या जोडीला मातृत्व अहल्यादेवींच्या ठायी होते. उद्या 31 मे रोजी त्यांची जयंती असल्याने किमान त्यांचे पुण्यस्मरण करून मनोमन या देवीला प्रणाम करावा, एवढे तर त्यांचे महात्म्य अजोड आहेच..
इतिहासाने पानोपानी...
जिची गायिली गाथा
होळकरांची तेजस्वी ती..
पुण्यश्लोक माता!
या कर्तृत्वशालिनीला शतश: नमन...!
- 7755938822