मुंबई,
MP Dr. Rajendra Gavit : शिवसेनेने तिकीट नाकारल्याने नाराज असलेले शिवसेनेचे पालघरमधील विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
खा. गावित यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपात पुनप्र्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित यांचा भाजपा प्रवेश झाला. खा. गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे. या दृष्टीने त्यांच्या संमतीनेच पालघरमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली. खा. गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. फडणवीस राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. यापुढे भाजपा नेतृत्व जी जबाबदारी सोपवेल, ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असे खा. गावित यांनी सांगितले.