मानोरा,
rural hospital शहर आणि तालुक्यातील गरीब व गरजू नागरिकांना अद्यावत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय प्रशासकीय हेळसांडीचा उत्तम नमुना ठरत असल्याचे वारंवार स्थानिक व तालुक्यातील नागरिकांकडून वरिष्ठ वरिष्ठांकडे करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून पुढे येत आहे.
वाटोळ येथील नागरिक दिलीप उत्तमराव चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करून तालुका आरोग्य अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी हे किरकोळ असो अथवा गंभीर आजारी रुग्ण त्यांच्या आजाराच्या प्रकाराची कुठलीही तमा बाळगता तासंतास रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात ताटकळत ठेवत असल्याची तक्रार केली आहे. मागील महिण्याच्या १५ तारखेला वाटोद येथील काशिनाथ झिता चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथे कर्तव्याला असलेले वैद्यकीय अधिकारी कोल्हे यांनी कुठल्याही प्रकारची आवश्यक रुग्णसेवा न करता रुग्णास वाशीमला पाठविले. काशिनाथ चव्हाण यांना नेण्यासाठी चार तास रुग्णवाहिका आलीच नसल्याने नाईलाजाने खाजगी वाहनाद्वारे अस्वस्थ झालेल्या चव्हाण यांना वाशीम येथे दाखल केले. त्यांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने व उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप दिलीप चव्हाण यांनी केला आहे. तळप या गावातील प्रल्हाद गुलाब राठोड या नागरिकाने विष प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉ. कोल्हे यांनी कुठलेही प्रथमोपचार न करता अकोला येथे पाठविल्याने उपचाराअभावी प्रल्हाद राठोड सुद्धा दगावल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.rural hospital आमच्याकडे कुठल्याही सुविधा नसल्याचे सांगून मोठ्या दवाखान्यात रेफरच्या चिठ्ठ्या देणार्या व प्रथमोपचार सुद्धा न करता मोठ्या शहरात पाठवून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या डॉ. कोल्हे आणि तालुका आरोग्य अधीक्षक यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून संबंधीतांवर कारवाईची मागणी दिलीप चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.