Land Record Office तालुक्यातील जमीन मोजमाप व शेतीसंबंधी कामाकरीता नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालय गाठावे लागते आणि तालुक्यातील बहुतेक नागरिक हे शेतकरी असल्यामुळे तालुक्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय हे महत्वाचे कार्यालय आहे. परंतु नेहमी बहुतेक कर्मचारी हे गैरहजर राहत असल्यामुळे नागरिक भूमी अभिलेख कार्यालयाच्या चकरा मारून कंटाळले असल्याचे दिसून येत आहे.
आज कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयात भेट दिली असता सदर कार्यालयामध्ये फक्त किशोर ईश्वरकर हे एकमेव कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार यू. एम. बोरकर व एम. के. पटले हे दोन्ही कर्मचारी दौर्यावर होते व उर्वरित सर्व कर्मचारी हे आपल्या वरिष्ठांना कुठलीही पूर्वकल्पना न देता गैरहजर असल्याचे दिसून आले. काही नागरिक हे आपले काम घेऊन नेहमीप्रमाणे कार्यालयात दिसून आले. परंतु त्यांना कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे रिकाम्या हाताने नेहमीप्रमाणे परतावे लागले. कोरची येथील उपअधीक्षक पद हे मागील कित्येक महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे कुरखेडा येथील प्रकाश कुरवाडे यांच्याकडे प्रभार देण्यात आलेला आहे.Land Record Office परंतु त्यांचे सुद्धा कोरची तालुक्याकडे विशेष लक्ष नसल्यामुळे त्याचा गैरफायदा भूमी अभिलेखचे कर्मचारी घेत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना नेहमी होणार्या या गैरसोयीचे निराकरण करण्याकरिता वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु या भोंगळ कारभाराची वरिष्ठांना कल्पनाच नसल्याचे दिसून आले.