लोकसभेतील निकाल भाजपसाठी विधानसभेत अग्णीपरीक्षा ठरणार?

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी मोर, 
Lok Sabha results : लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला पाहीजे अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. ही भाजपसाठी आत्मचिंतनाची बाब आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुक भाजपासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
 
 
loksabha
 
 
भंडारा-गोंदियाची निवडणुक चुरशीची झाली. 18 उमेदवार रिंगणात होते. खरी लढत कॉग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे व महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यातच झाली. वंचीत, बसपाची मते मोठ्या प्रमाणात असली तरी वंचीत व बसपा उमेदवारांना 50 हजार मतावरच समाधान मानावे लागले. काँग्रेसचे बंडखोर सेवक वाघाये यांचीही जादु मतदारांवर चालली नाही. त्यांना 13 हजार मतावरच समाधान मानावे लागले. प्रशांत पडोळे यांना 587413 मते तर सुनील मेंढे यांना 550033 मते मिळाली. पडोळे 37380 मतांनी निवडून आले. या लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभांपैकी गोंदिया, तिरोड्यात मेंढे यांना आघाडी मिळाली. साकोली, भंडारा, तुमसर, अर्जुनी मोर. या विधानसभांमध्ये पडोळे यांना निर्णायक आघाडी आहे. अर्जुनी मोर. विधानसभेत पडोळे यांना 92,455 मते तर मेंढे यांना 71,797 मते मिळाली. पडोळेंना 20,658 मतांची आघाडी आहे. ही भाजपसाठी आत्मचिंतनाची बाब आहे. तालुक्यातील बोंडगावदेवी जिप क्षेत्र भाजपाचा गड आहे. येथे जिप, पंस सदस्य भाजपाचे आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीत भाजप प्रणणित पॅनलची सत्ता असुनही या क्षेत्रात मेंढे 1184 मतांनी माघारले. 13 गावांतील 19 बुथावर घुसोबाटोला, पिंपळगाव वगळता उर्वरित गावांत पडोळेंना आघाडी आहे. तालुक्यात 7 जिप क्षेत्र आहेत. पैकी माहुरकुडा, केशोरी येथे कॉग्रेसचे जिप सदस्य आहेत. गोठणगाव राष्ट्रवादी तर महागांव, नवेगावबांध, ईटखेडा, बोंडगावदेवी येथे भाजपाचे सदस्य आहेत. येथे भाजपाचे वर्चस्व असताना सातही जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपाचे मेंढे पिछाडीवर असणे ही बाब भाजपा पदाधिकार्‍यांसाठी मिमांसेची आहे.