जनतेला आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची अपेक्षा

Surgical Strike-India पाकिस्तानच्या मोठ्या कटाचा भाग

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
अग्रलेख 
 
Surgical Strike-India पाकिस्तानला पुन्हा एकदा घरात घुसून मारण्याची गरज आहे. स्वत: भिकारी बनलेल्या पाकिस्तानने शेजाऱ्यांना शांततेने राहताच येऊ नये, याचा विडा उचललेला दिसतो. याआधी सर्जिकल स्ट्राईक करूनही पाकिस्तानच्या वर्तणुकीत सुधारणा होताना दिसून येत नसल्याने मोदींच्या नेतृत्वातील सरकारने पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या पद्धतीने धडा शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रिय झाले आहेत, ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे. परवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी सुरू असतानाच रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात दहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ही बाब मनाला चटका लावणारी आहे. २०१९ साली काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून खोऱ्यात दहशतवाद कमी झाला होता, जनजीवन सुरळीत झाले होते. काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली होती. दगड फेकणारी तरुणाई शांततेची पाईक झाली होती. असे सगळे सुखावह चित्र दिसत असतानाच परवा झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा मन विचलित केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट या अतिरेकी गटाने घेतली आहे.
 
 
 
Surgical Strike-India
 
 
काश्मीरमध्ये येणाऱ्या गैरकाश्मिरी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचे, काश्मिरी आणि गैरकाश्मिरी लोकांमध्ये दुरावा निर्माण करायचा, हा पाकिस्तानच्या मोठ्या कटाचा एक भाग आहे. त्याचा एक भाग म्हणून हिंदू यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरात शांतता नांदत आहे, हा केंद्र सरकारचा दावा खोटा ठरविण्यासाठीच अतिरेक्यांकडून अशी घृणित कृत्ये केली जात आहेत. खोऱ्यात आता दहशतीची जागा पर्यटनाने घेतली आहे, असे सरकारकडून सांगितले जात असताना पाकिस्तानला ते सहन होणे केवळ अशक्य होते. त्यातूनच असे हल्ले केले जात आहेत. कलम ३७० रद्द होण्यापूर्वी अतिरेकी गटांमध्ये सामील होण्याचे प्रमाण १३ टक्के होते, जे आता कलम रद्द केल्यानंतरच्या काळात ३९ टक्के झाले आहे. नव्वदच्या दशकात जी परिस्थिती होती, तशीच आताही निर्माण व्हावी असा प्रयत्न अतिरेकी गटांकडून केला जात आहे आणि त्याला त्यांचे पाकिस्तानी ‘आका' खतपाणी घालत आहेत. अतिरेक्यांकडून आधी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले केले जायचे. आता त्यांनी जाणीवपूर्वक फिरायला येणारे गैरकाश्मिरी पर्यटक, यात्रेकरू आणि रोजगारासाठी येणारे लोक यांना लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
असे करून आपण भारतीय नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू आणि भारत सरकारचा दावा खोटा ठरवू, हा त्यांचा प्रयत्न आहे. असे हल्ले करून अतिरेक्यांना आणखी एक भास निर्माण करायचा आहे आणि तो असा की, स्थानिक लोकच हल्ले करीत आहेत. स्थानिक लोक आणि गैरकाश्मिरी लोक यांच्यात सद्भावाचे जे वातावरण तयार झाले आहे, ते संपुष्टात आणण्याचा अतिरेकी गटांचा प्रयत्न एव्हाना उघड झाला आहे. रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या  पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा यात्रेकरूंचे जीव गेले आहेत, ३३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे आणि हा धोका वेळीच ओळखून पुढची पावलं उचलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तिसऱ्या कार्यकाळासाठी राजधानी दिल्लीत शपथ घेत असतानाच पाकिस्तानने हा भ्याड हल्ला घडवून आणल्याने तीव्रता आणखी वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शपथविधीनंतर लागलीच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोदींनी अंतर्गत सुरक्षेला असलेला धोका ओळखला आहे आणि पाकिस्तानी अतिरेक्यांकडून पाठविल्या जाणाऱ्या अतिरेक्यांचा मुकाबला करण्यासाठी योजनाही तयार झाली आहे, ही समाधानाची बाब मानली पाहिजे.
 
 
 
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानातून होणारी घुसखोरी कमी झाली ही बाब खरी असली तरी अतिरेक्यांच्या कारवाया पूर्णपणे थांबलेल्या नाहीत, हे वास्तव आहे. पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या इशाèयावरून काश्मिरात होणारी दगडफेक जरूर थांबली आहे. घुसखोरी करून भारतीय सीमेत शिरलो तरी जीव वाचणार नाही, याची अतिरेक्यांना खात्री पटल्याने त्यांनी घुसखोरी न करता भारताला कसा त्रास देता येईल, यासाठी नवा मार्ग मधल्या काळात शोधला होता. घुसखोरीऐवजी त्यांनी ड्रोनमध्ये स्फोटके भरून ती भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर सोडण्याचा आणि त्या माध्यमातूत भारतीय जवानांचे प्राण घेण्याचा, सांपत्तिक हानी करण्याचा नवा उपाय शोधला होता. त्यांचे हे कारस्थान भयंकर होते. ते हाणून पाडण्यासाठी भारत सरकारने नेटाने प्रयत्न केले. तीन वर्षांपूर्वी थेट पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करत शेकडो अतिरेक्यांना जसे ठार मारले होते, तशी कारवाई करून पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना, तिथे आश्रयास असलेल्या अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांना आता पुन्हा एकदा धडकी भरविणे गरजेचे आहे.
 
 
 
अर्थात, दुसरा मजबूत ‘सर्जिकल स्ट्राईक' करण्याची गरज आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने असा धाडसी निर्णय घ्यावा, ही जनतेची अपेक्षा आहे. देशवासीय सरकारच्या पाठीशी आहेत, याची मोदींनी खात्री बाळगावी. चीनच्या पाठींब्याने पाकिस्तानी अतिरेकी आगळिक करत आहेत, हे अनेक हल्ल्यांवरून स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अमेरिकादी देशांनी भारताच्या नावाने जो शिमगा केला, तो खरे तर अनावश्यक होता. केजरीवाल हे भारतीय नागरिक आहेत, त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि आरोपांच्या पुष्ट्यर्थ असलेल्या पुराव्यांच्या आधारेच भारतीय तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली होती. अन्य देशांनी यात लक्ष घालण्याची, वेगळ्या शब्दात तोंड मारण्याची गरज नव्हती. तरीही त्यांनी अनावश्यक हस्तक्षेप केलाच. आता दहा हिंदू यात्रेकरूंना पाकिस्तानी अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारल्यानंतर कुठे गेलेत हे अमेरिकादी देश आणि मानवाधिकारवाले? कुठे लपलेत समाजवादी? भारताच्या कुठल्याही भागात एखादी छोटीशीही घटना घडली तरी बेंबीच्या देठापासून बोंबलणारे स्वयंघोषित पुरोगामी हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा साधा निषेध करताना दिसत नाहीत.
 
 
एरवी साध्या छोट्या घटनेवरून गळे काढणारे हे स्वयंघोषित पुरोगामी दहा निष्पाप यात्रेकरू मारले गेल्यानंतर निर्लज्जपणे गप्प बसतात, याचेही आता आश्चर्य वाटत नाही. स्वत:ला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी हिंदूच हिंदूंची बाजू घेत नाहीत, हे कटू सत्य आहे. दहशतवाद काय असतो हे सर्वप्रथम भारतानेच अनुभवले आहे. पण, अमेरिकेत ट्विन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला चटके बसलेत अन् मग त्यांना दहशतवादाची दाहकता लक्षात आली. त्यांनी ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची पर्वा न करता आणि मानवाधिकाराचीही पर्वा न करता ज्या पद्धतीने कारवाया केल्या, तशा कारवाया भारताने केल्या तर या ढोंग्यांना लागलीच मानवाधिकार कसा काय आठवतो? आता भारतानेही अशा ढोंग्यांची पर्वा न करता आपली संपूर्ण क्षमता वापरत सीमेपलीकडे सैन्य पाठवून समोरच्याला धडकी भरेल आणि तो पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, अशी कारवाई करणे गरजेचे आहे.
 
 
 
खरे तर, दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देऊ अशी भाषा गतकाळात करणाऱ्याअमेरिकेकडून भारताला मजबूत सहकार्य मिळायला पाहिजे. पण, अमेरिका सहकार्य करेल याची काही खात्री नाही. त्यामुळेच आपण काहीही केले तरी भारत सरकार ठोस काही करणार नाही, हा अतिरेक्यांचा आणि पाकिस्तानचा जो भ्रम आहे ना, तो शक्य तेवढ्या लवकर तोडणे आता आवश्यक झाले आहे. जनतेला आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची अपेक्षा आहे. ती लवकरच पूर्ण होईल, अशी आशा करूया!