उदि्दष्ट 6 लाख क्विंटल धान खरेदीचे

3 लाख क्विंटलच खरेदी

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
गोंदिया,
purchase of paddy : जिल्हा पणन विभागाच्या 79 धान खरेदी केंद्रांवरून उन्हाळी हंगामातील धान खरेदी सुरू आहे. 9 जूनपर्यंत 2 लाख 98 हजार 919 धानाची 7276 शेतकर्‍यांनी विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी 15 लाख क्विंटल पेक्षा अधिक धान खरेदी झाली होती. धान खरेदीची मुदत 30 जूनपर्यंत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धान खरेदीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरिप हंगामातही जिल्ह्यात गत वर्षीपेक्षा 16 लाख क्विंटल कमी धान खरेदी झाली.
 
 
paddy
 
 
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा पणन व आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने खरीप व उन्हाळी हंगामात धान खरेदी केली जाते. यंदा उन्हाळी धान खरेदी महिनाभर उशिराने सुरू झाली. त्याचा धान खरेदीवर परिणाम झाला आहे. तर खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने आदिवासी विकास महामंडळाने यंदा उन्हाळी हंगामात धान खरेदी केली नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करण्याची मुदत 31 मेपर्यंत होती. जिल्ह्यातील 16778 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. पैकी 7276 शेतकर्‍यांनी 2 लाख 98 हजार 919 क्विंटल धानाची विक्री केली आहे. सद्यःस्थितीत 79 धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी सुरू असली तरी केंद्रावर पाहिजे तशी आवक नसल्याचे चित्र आहे. खरीपात खरेदी केलेल्या 24 लाख 76 हजार क्विंटलपैकी केवळ 20 हजार क्विंटल धानाची उचल झाली आहे. राइस मिलर्स आणि शासन यांच्यातील तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शासकीय धान भरडाई रखडली आहे. पणन व आदिवासी महामंडळाचा 32 लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत पडून असल्याने तो खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.