- फक्त 4, हजार 756 व्यक्तींंना मिळाली डेपोतून वाळू
वर्धा,
अवैध रेती चोरीला लगाम लागावा आणि स्वस्त दरात रेती मिळावी यासाठी राज्यात नवीन वाळू धोरण अवलंबण्यात आले. त्यासाठी Concept of sand depot वाळू डेपोची संकल्पना पुढे आली. मात्र, वाळू डेपोच्या आडून जिल्ह्यात सर्वत्र रेतीचे 24 तास अवैध उत्खनन होऊ लागले. ज्या प्रमाणात वाळू चोरी पकडण्यात येत आहे. त्याच्या दुप्पट अवैध वाहतूक सुरू आहे. याची कल्पना महसुल व पोलिस प्रशासनाला आहे. परंतु, राजकीय पक्षांचा पदर पकडत पडद्या मागे राहून काम करणारे आणि प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी वाळू रगडून पैसा काढणे सुरू केले आहे.
Concept of sand depot : मागील वर्षी नवीन वाळू धोरणामुळे वाळूचा काळाबाजार करणारे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याचे वास्तव असतानाच यंदाही मोठ्या प्रमाणात वाळू माफियांना चांगलेच फावले आहे. नदीतून रेतीची उचल करून ती वाळू वाळू डेपोत टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून तीन वर्षासाठी कंत्राटदार एजन्सी नियुक्त केल्या आहेत. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सावंगी (रिठ), दारोडा, येळी, पारडी, मांडगाव, सालफळ, आलोडी व टाकळी (चणा) या ठिकाणावरील वाळू डेपो यंदा सुरू करण्यात आले. अधिकृत कंत्राटदार एजन्सींनी नदीपात्रातून वाळूची उचल केल्यावर वाळू डेपोत नेणे अपेक्षित असताना वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करून चढ्या दराने विक्री तर वाळू डेपोतून 4 हजार 756 व्यक्तींनी शासकीय दरात रेती मिळावी म्हणून ऑनलाईन बुकींग करून पैशाचा भरणा केला. या व्यक्तींकडून 25,096.7 ब्रास वाळूची बुकींग करण्यात आली. त्यापैकी 20259.4 ब्रास वाळू संबंधितांना वितरित करण्यात आली आहे. तर 4836.33 ब्रास वाळू अजूनही जिल्ह्यातील आठ वाळू डेपोत शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. पोलिस आणि महसूल प्रशासनाची करडी नजर हिंगणघाटकडे असुन देवळी, पुलगाव, आर्वीकडे अद्याप पोलिसांची नजर पोहोचली नाही.
शिल्लक वाळू
सावंगी (रिठ) : 430 ब्रास
दारोडा : 1514 ब्रास
येळी : 837 ब्रास
पारडी : 168 ब्रास
मांडगाव : 935 ब्रास
सालफळ : 873 ब्रास
आलोडी : 76.93 ब्रास
टाकळी (चणा) : 2.4 ब्रास