पंढरपूरच्या वारीसाठी 45 बसेस

    दिनांक :18-Jun-2024
Total Views |
- आषाढी एकादशीनिमित्त विशेष सेवा

वर्धा, 
Ashadhi Ekadashi Pandharpur Bus Service : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. हे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धा परिवहन महामंडळाने 5 आगारातून विशेष 45 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 13 जुलैपासून विठ्ठल भक्तांसाठी याचा लाभ घेता येणार आहे.
 
 
Bus Service
 
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने जातात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यात एसटी परिवहन महामंडळाकडून दरवर्षी विशेष बससेवा सोडण्यात येते. यावर्षी पाच आगारातून 45 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाविकांना 13 जुलैपासून या बससेवेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 जुलैपासून पाच आगारातून पंढरपूरसाठी अधिक बसेस सोडण्यात येणार आहे.
 
 
Ashadhi Ekadashi Pandharpur Bus Service : ग्रामीण भागात एकाच गावातील भाविक, वारकरी, भजन मंडळ, मंदिर समिती आदी गटांना थेट प्रवासाची सुविधा देण्यासाठी सर्व बसस्थानकावर आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्धा विभागातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्याहून अधिक भाविकांना एकत्र जायचे असेल तर ग्रुप बुकिंग केल्यानंतर गावातूनच विशेष बस उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे, पंढरपूरसाठी सुटणार्‍या विशेष बसमध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठ प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना तिकिटात 50 टक्के सूट देणार्‍या महिला सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. अधिक बसेसचा लाभ घेण्यासाठी आगारप्रमुख आणि बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन रापमंचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे.
 
 
आगारनिहाय उपलब्ध बसेस
आगार - बसेस
वर्धा - 25
आर्वी - 07
हिंगणघाट - 10
तळेगाव - 02
पुलगाव - 01