व्यवसायीकरण थांबावे म्हणून असोशिएशन कटीबध्द

    दिनांक :18-Jun-2024
Total Views |
- 150 प्लॉटपैकी केवळ 70 वरच कारखाने
- 7 बार व काही शोरूम्सही थाटले गेलेत
- एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष रुंगठा यांची माहिती

चंद्रपूर, 
Chandrapur MIDC : चंद्रपूर एमआयडीसी येथे उद्योगांसाठी 150 प्लॉट्स दिले गेले आहेत. पण त्यापैकी केवळ 70 प्लॉट्सवरच कारखाने आहेत. उर्वरित एकतर तसेच पडले आहेत, काही उद्योग बंद झाले आहेत, तर काही प्लॉट्सच्या व्यवसायिकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्लॉट्सचे व्यवसायिकरण झाले असून, एमआयडीसीत 7 दारूची दुकाने व काही शोरूम्स आहेत. हे चित्र बदलावे म्हणून चंद्रपूर एमआयडीसी असोशिएनशन कटिबध्द असून, तशी तक्रारही संबंधितांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
 
 
Chandrapur MIDC
 
Chandrapur MIDC : रूंगठा म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या औद्योगिक विकासासाठी ‘अ‍ॅडव्हान्टेज चंद्रपूर 2024-इंडस्ट्रियल एक्स्पो आणि बिझनेस कॉन्क्लेव्ह’चा समारोप वन अकादमीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामध्ये एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने मुख्य भूमिका निभावली. तेथे 75 हजार कोटीचे सामंजस्य करार केले गेले. या विविध करारामधील 20 हजार कोटींचे न्यू इरा क्लीनटेक हे एमआयडीसी भद्रावतीमधील गॅसिफिकेशन प्लांट ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला हातभार लावणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील 5000 लोकांना थेट रोजगार मिळेल. एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन औद्योगिक विकास, एसएमई आणि उद्योजकता सशक्तीकरण, नवीन उद्योगांची स्थापना, औद्योगिक उद्याने आणि औद्योगिक झोन आणि तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहाय्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करीत असल्याचा दावाही रूंगठा यांनी केला.
बामणी प्रोटीन्स कंपनी बंद होऊ नये म्हणून प्रयत्न करू
जिल्ह्यातील बामणी प्रोटीन्स कंपनी बंद पडली आहे. त्यामुळे जवळपास 400 लोकांचा रोजगार हिरावला गेला असून, हा कारखाना सुरू व्हावा म्हणून एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा अध्यक्ष, फेडेरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोशिएशन ऑफ विदर्भचा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र चेंंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचा सहअध्यक्ष म्हणून मी प्रयत्न करेल, असे आश्वासनही रुंगठा यांनी यावेळी दिले.