तीनशे शब्दांचा निबंध

    दिनांक :02-Jun-2024
Total Views |
दखल
- डॉ. साधना कुलकर्णी
'punishment' of essay writing : तीनशे शब्दांचा निबंध या घटनेने अल्पवयीन, अपराधी बालकांच्या सुधारणा प्रक्रियेला एक अभिनव आयाम मिळाला आहे. निबंध लिहिण्याची ‘शिक्षा’ या घटनेचे किती बरे कौतुक करावे? आम्ही शाळेत असताना इंग्रजी, हिंदी, मराठी या विषयात ‘निबंध’ हा एक अनिवार्य भाग असायचा. ‘मी केलेला प्रवास’, ‘एक अविस्मरणीय घटना’, ‘माझा आवडता सण’, ‘माझा आवडता प्राणी/पक्षी’ असे विषय सामान्यतः असायचे. मग ‘गाय’ या विषयावर निबंध लिहिताना ‘गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईला चार पाय व एक शेपूट असते. या शेपटीने ती स्वतःच्या अंगावरच्या माशा हाकलते. गाय गवत खाते,’ असे अनेक माहितीपूर्ण निबंध आमच्या लेखणीतून उतरले आहेत. निबंधात म्हणी आणि वाक्प्रचार टाकायचे असतात, हा एक अनिवार्य नियम. ‘चोर सोडून संन्यासाला सुळी’, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’, ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ अशा म्हणींनी आम्ही निबंधाची उंची वाढवत असू. अर्थात हे माझ्या पिढीचे अनुभव बरं का. हल्लीच्या मुलांचा आणि निबंध या शब्दाचा काही संबंध असतो का, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. असो. मग जरा वरच्या वर्गात गेलं की ‘विज्ञान शाप की वरदान?’, ‘एका वृक्षाचे आत्मवृत्त’, ‘माझे ध्येय’, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ वगैरे वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारे निबंध असायचे.
 
 
writing
 
आता मला प्रश्न पडला आहे की परवाच्या घटनेतल्या त्या अल्पवयीन बाबूला निबंधाचा कोणता विषय दिला असेल हो? ‘मी केलेला अपघात’, ‘दारू पिण्याचे दुष्परिणाम’, ‘महागड्या गाडीचे वर्णन’, ‘एक अविस्मरणीय प्रसंग’, ‘माझे वाहन - माझा वेग’... या प्रश्नाने माझा अक्षरशः छळवाद मांडला आहे. पण आणखी एका बाबीने माझा मेंदू वैचारिक आवर्तात गरगरतो आहे. तो म्हणजे ही शिक्षा देणारे नेमके कोण आहेत? अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे की महनीयांच्या डोक्यातून या शिक्षेचा उगम झाला आहे? निबंध लिहिणे या शिक्षेमागचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय असावा बरं? हे महाशय पूर्वी शिक्षक तर नसावेत ना? नाही तर शिक्षण मंडळावर तर नक्कीच असतील. परवा घडलेल्या अपघाताच्या घटनेवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. काही भयानक घटना घडत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं. पण काही घडतं तेव्हा समस्त जनतेची तत्त्वनिष्ठा, नीतिमत्ता, विद्वत्ता, वक्तृत्व शिगेला पोचतं. मी पण त्यातलीच.
 
 
'punishment' of essay writing : परवा होर्डिंग कोसळलं आणि मग आम्ही तोंडसुख घ्यायला मोकळे झालो. आपलं कसं आहे ना, प्रश्न निर्माण झाल्यावर जागं व्हायचं. तोपर्यंत झोपेचं सोंग घ्यायचं आणि दुसरं म्हणजे अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांमध्ये आपली शक्ती, बुद्धी पणाला लावायची आणि खर्च करायची. यातच आम्ही गुंतलेले. तसंही ‘निवडणूक’ या विषयावर बोलून, ऐकून, चर्चा करून जरा अजीर्णच झालं होतं. असो. अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया देण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याने जनता (म्हणजे आपणच हो.) एकदमच जागृतावस्थेत पोहोचली. आणि आमच्यातले संस्कार, संस्कृती, नीतिमूल्ये, कायदे, वाहतूक नियम सगळंच सरसरून उफाळून आलं. यात कोणी पालकांना दोषी ठरवलं. काहींच्या मते अती संपत्तीच याला कारणीभूत आहे. कुणी आरटीओवर हल्लाबोल केला तर, काहींनी वाहतूक पोलिसांवर ताशेरे झाडले. तरुण पिढीचा उद्धार तर यातला महत्त्वाचा मुद्दा होता. आयुष्यात ‘पब’चं तोंडही न पाहिलेल्यांनी पबच्या कायदे, नियमावलींचे वाभाडे काढले. काहींना तर एक मुलगा आणि मुलगी इतक्या रात्री बाईकवरून कुठे जात होते हा प्रश्न पडला. त्यांच्या दृष्टीने तो प्रश्न जास्त महत्त्वाचा होता. हे दोघे जण मध्यरात्री नेमके काय करत होते? त्या दोघांचे एकमेकांशी काही नाते होते का? आता पुण्यातील संस्कृतीचं काय?
 
 
ही घटनाच अशी होती की प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थता येऊन काहीतरी व्यक्त करावंसं वाटलं. मला मात्र या भयानक प्रसंगातही एक आशेचा किरण दिसला. निबंधाचा मुद्दा मला इतका आश्वासक आणि महत्त्वाचा वाटला (कुणाचं काय नि कुणाचं काय) की बाकी तपशील जरा नजरेआडच झाला. एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, महागडी गाडी अत्यंत वेगाने चालवून मध्यरात्री अपघात केला. त्यात बाईकवरचे दोघे घटनास्थळी मृत्युमुखी पडले. आपल्या सल्लूभाईंच्या बाबतीतही असे झालेच होते की... दिवसागणिक अपघात होतात. लोक प्राणाला मुकतात. पण सगळ्या घटना आपल्यासमोर येतातच असे नाही. त्यामुळे शिक्षा म्हणून ‘300 शब्दांचा निबंध’ हा माझ्यासाठी या घटनेतील अनपेक्षित, अकल्पित आणि अभिनव असा ट्विस्ट अर्थात वळण आहे. म्हणूनच हा शिक्षेचा अभिनव प्रकार इतिहास घडवणार याची मला खात्री वाटते. मी एक हाडाची (ऑर्थो नाही हो) शिक्षिका आहे आणि अधूनमधून कागदावर खरडण्याची आवड असल्याने निबंध, शब्द याबद्दल मला कमालीचे ममत्व आहे. शाळेत असताना बरेचदा शिक्षा म्हणून आम्हाला चूक लिहिलेला शब्द शंभर वेळा परत लिहायला सांगायचे. (पुन्हा तेच. आमच्या काळातलं हो...) पण अपघात केला म्हणून आजच्या काळातल्या अल्पवयीन मुलाला चक्क निबंध लिहायची शिक्षा करणं, तेही स्वतः शिक्षक नसताना? हे एक दिव्य दूरदृष्टीचे उदाहरण आहे असे मला वाटते.
 
 
'punishment' of essay writing : आजच्या ‘कॉपी पेस्ट’च्या जगात मुलांनी निबंध लिहायचा हे आव्हान अपघात करण्यापेक्षाही भारी आहे हो. निबंध लिहायचा म्हणजे विचार करणे आले. आता हल्लीच्या पिढीचा विचार करण्यावर विश्वास नाही. यांच्या मेंदूमध्ये विचार करण्याची प्रणाली विकसित झालेलीच नाही. कारण, त्यांना विचार करण्याची संधी पालक आणि आपली शिक्षण व्यवस्था देत नाही. ही पिढी न कळत्या वयापासून सतत काही तरी अ‍ॅक्शनपॅक्ड प्रसंग बघत असते. त्यामुळे ही मुले डायरेक्ट कृती करणारी आहेत. मग निबंधासाठी मनातले विचार कागदावर उतरवण्याची शक्यता तर दूरच. तसंही आता ही जेन झी मुलं, कागदावर लिहिण्याची निर्बुद्ध कामं अजिबातच करत नाही हो. ते टाईपतात. शब्दांऐवजी ईमोजी टाकतात. आता अशा परिस्थितीत विचार करून कागदावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या प्रक्रियेतून सदरहू अल्पवयीन बाबू जाईल तेव्हा त्याच्या बालमेंदूत किती वैचारिक वादळे आणि केमिकल लोच्या होईल याचा विचार संबंधित अधिकारी यांनी केला नाही का? याशिवाय निबंध लेखनाबरोबर शुद्धलेखन, व्याकरण आणि चांगलं अक्षर हे ओघाने आलंच की हो. म्हणजे किती मानसिक ताण? यापेक्षा गाडी चालवून लोकांना मारणं किती बरं सोप्पंय.
 
 
'punishment' of essay writing : पण काहीही म्हणा, निबंध लिहिण्याची शिक्षा हा भारतीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरावा. अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन घडवून आणणार्‍या वैचारिक क्रांतीची ही रुजवात आहे. ही साधीसुधी कारवाई नाही तर अल्पवयीन अपराधींच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवणारी एक प्रक्रिया आहे. बालसुधारगृहांच्या कार्यपद्धतीला एक वैशिष्ट्यपूर्ण, बौद्धिक कलाटणी मिळण्याचे हे संकेत आहेत. ही शिक्षा ठोठावण्याचा विचार करणारे साहेब नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत. यात मला एक सूचना करण्याची खुमखुमी (मूलभूत प्रेरणा) आली आहे, ती म्हणजे भावी अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांनाही एक हजार शब्दांचा निबंध लिहिण्याचा अंतर्भाव या शिक्षेत करावा. विषय मी सुचवू शकेन, हेही इथेच सुचवून टाकते हो. जो परिणाम आरटीओ कारवाईमुळे होणार नाही, वाहतूक पोलिसांच्या दट्ट्यामुळे होणार नाही, पब बंद केल्याने होणार नाही, तो एका निबंधाने साध्य होईल. निबंध लिहिण्याच्या शिक्षेची दहशतच एवढी भयंकर असणार आहे की कुणाची बिशाद आहे हो गुन्हा करण्याची?
 
वाईटातून चांगलं घडतं ते हेच!