तभा वृत्तसेवा
आर्वी,
Arvi Marathi News : शहरातील गांधीचौक येथील जागेवर कोणत्याही राजकीय पक्षाची सभा, कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रमाकरिता परवानगी देऊ नका अशी मागणी स्थानिक गांधी चौक परिसरातील नागरिक व व्यापार्यांनी केली होती. त्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषदेने ठराव घेतला आहे.

गांधी-चौक ते शिवाजी चौकापर्यंत संपूर्ण भाग हा व्यापारी प्रतिष्ठानचा - रहिवासी भाग आहे. तो अत्यंत - गजबजलेला असून तेथे सतत - वर्दळ असते. त्या जागेवर राजकीय सभा व सामाजिक, सांस्कृतिक - कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सभा घेतल्याने वाहतुकीची कोंडी होऊन ध्वनी प्रदूषण होते तसेच व्यापारावर देखील परिणाम होतो. त्या ठिकाणी होत असलेल्या गोगाटामुळे रहिवाशी क्षेत्रात राहणार्या वयोवृद्ध व लहान मुलांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. या क्षेत्रातील व्यापारी प्रतिष्ठान व निवासी रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या भागात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आर्वी, मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने नपने ठराव घेऊन यापुढे गांधी चौकात कार्यक्रमाकरिता परवानगी दिली जाणार नसल्याचा ठराव घेण्यात आला.
यापुढे गांधी चौक येथील जागेवर कोणत्याही राजकीय पक्षाची सभा, कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रमाकरिता कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्याधिकार्यांनी पत्रकातून कळवले आहे.