सावंगी रुग्णालयात चार दिवसांच्या बाळावर हृदयोपचार

26 Jun 2024 20:28:14
वर्धा, 
Dr. Abhyuday Meghe : श्‍वासोच्छवासामुळे प्रकृती अस्वस्थ असलेल्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाला सुसज्ज कॅथलॅबमध्ये बलून व्हॉल्वोटॉमी प्रक्रियेद्वारे प्रकृती स्थिर करणारे हृदयोपचार सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागांतर्गत यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेण्यात आले.
 
 
balak
 
स्थानिक समतानगर येथील प्रतीक्षा भगत ही प्रसूतीकरिता परिसरातील अन्य एका रुग्णालयात भरती झाली. या रुग्णालयात एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला. मात्र, बाळाला श्‍वासोच्छवास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने तेथील डॉक्टरांनी सावंगी मेघे रुग्णालयात बाळाला भरती करण्याचा सल्ला दिला. बाळाला तातडीने सावंगी रुग्णालयातील बालरोग विभागात भरती करण्यात आले. या विभागातील बालरोग तज्ज्ञ डॉ. रेवत मेश्राम व डॉ. सागर कारोटकर यांनी बाळाची तपासणी करून तात्काळ नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले. येथे नवजात बाळाला कृत्रिम श्‍वसनोपचाराकरिता 36 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
 
 
 
या दरम्यान हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव राऊत यांनी अत्याधुनिक उपकरणांद्वारे तपासणी केली असता बाळाच्या हृदयातील महाधमनी झडप आकाराने लहान असल्याचे दिसून आले. कमी आकाराच्या झडपेचा आकार सामान्य करण्यासाठी ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजेंद्र अग्रवाल, डॉ. आकाश लोहकरे, डॉ. शंतनू गोमासे, डॉ. वैभव महल्ले, डॉ. अनुज चतुर्वेदी, डॉ. पृथ्वी मुंदडा यांनी बलून व्हॉल्वोटॉमी प्रक्रिया कार्यान्वित करीत ती यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली. या उपचारांमुळे बाळाची श्‍वसनयंत्रणा पूर्ववत झाली. प्रकृती पूर्णतः स्थिरावल्याने बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या उपचारांसाठी शासनाच्या राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमांतर्गत आर्थिक सहकार्य लाभले. शिवाय, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारेही सवलत देण्यात आल्याने या उपचारांसाठी रुग्णपरिवाराला कोणताही खर्च करण्याची गरज भासली नाही, असे विशेष कार्य अधिकारी Dr. Abhyuday Meghe डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0