‘लिफ्ट करा दे!’

    दिनांक :29-Jun-2024
Total Views |
वेध
- विजय कुळकर्णी
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray : ‘मुझको भी तो लिफ्ट करा दे...’ या हिंदी गाण्याची आठवण एक बातमी वाचून झाली. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठाचे) सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही क्षणांची लिफ्ट-भेट झाली आणि त्याची बातमी झाली. या भेटीची दिवसभर विधान भवनात खमंग चर्चा रंगली. दोन परस्पर विरोधी पक्षांचे नेते आणि त्यातही देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची भेट होऊन चर्चा किंवा काही बोलणे झाले, तर तो प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा विषय होणारच. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे पक्के मित्र असलेले हे दोन नेते कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत. या दोन नेत्यांना योगायोगाने एकाच लिफ्टमधून काही सेकंद एकत्र जावे लागले. यावेळीदेखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना टोमणे आणि कोपरखळ्या मारण्याची संधी सोडली नाही.
 
 
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
 
कधी नव्हे, ते उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात हजेरी लावली होती. त्यांना विधान परिषदेच्या सभागृहात जायचे होते. त्यासाठी ते तळमजल्यावर लिफ्टची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतील कामकाज आटोपून सभागृहासमोरील वर्‍हांड्यात तिसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची प्रतीक्षा करीत होते. तेव्हा, या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघेही एकाच लिफ्टमधून तिसर्‍या मजल्यावर गेले. काही मिनिटांच्या या भेटीत त्यांच्यात काही चर्चा झाली का? झाली असेल, तर कोणत्या विषयावर... यावरून दिवसभर विधिमंडळ परिसरात तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या. लिफ्टमध्ये जाताना फडणवीस यांनी काही लोकांना बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तेथे उपस्थित असलेल्या प्रवीण दरेकर यांना उद्देशून ‘याला आधी बाहेर काढा’ असा टोला लगावला. यावरून उद्धव ठाकरे अजूनही वजाबाकीचेच राजकारण करीत असल्याचे जाणवते. तर, या लिफ्ट-भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये बसले असल्याचा टोला लगावला. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही विधाने केली होती.
 
 
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray : संजय राऊत यांनी तशी परिस्थिती आल्यास आम्ही एनडीएसोबत जाऊ शकतो, असे विधान केले होते. या वक्तव्यांवरूनदेखील या भेटीचे अर्थ लावले जात आहेत. मात्र, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना उद्धव ठाकरे यांनी ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे! असे काही होणार नाही’ असा खुलासा केला. हा खुलासा करताना त्यांनी लिफ्टबाहेर असलेल्यांना धक्का बसला असेल, असेही म्हटले. भिंतीला कान असतात, अशी आपल्याकडे म्हण आहे. तेव्हा, यापुढील आमच्या गुप्त बैठका, चर्चा आम्ही लिफ्टमध्येच करू. कारण, लिफ्टला कान नसतात, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. मात्र, प्रसारमाध्यमांना दिवसभर चर्चेसाठी हा नवा विषय मिळाला. अशातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने घोषित करावे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याकडून महाविकास आघाडीने अजून तसे काही ठरविले नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
 
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray : मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा आधी महायुतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यावर महाविकास आघाडी काम करेल. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडला जाईल, असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, कालच्या या लिफ्ट-भेटीनंतर या दोन्ही पक्षांत उघड दिसत नसले, तरीही आत शंका-कुशंका निर्माण झाल्या नसतील, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. कारण, लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या बरोबरीने खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेचा गड असलेल्या कोकणातही शिंदे यांच्या शिवसेनेला मतदारांनी पसंत केले आहे. तर, एनडीएच्या केंद्र सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मंत्रिपद मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व शक्ती पणाला लावून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची मदत घेऊन लोकसभा निवडणूक लढवूनही त्यांना केंद्रात विरोधात बसावे लागत आहे. राज्यातही त्यांचा पक्ष विरोधातच आहे. तेव्हा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लिफ्टमध्ये त्यांची काय गुपित चर्चा झाली, ते विधानसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीदरम्यान अथवा निवडणुकीनंतरच उघड होईल. 
 
- 8806006149