वान नाही पण गुण लागला दिसतो

मुख्यमंत्र्यांचा वडेट्टीवारांना टोला

    दिनांक :29-Jun-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
Eknath Shinde-Vadettivar आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो, मित्र समजत होतो. पण, तुम्हीदेखील खोटं बोला पण रेटून बोला, सुरू केलेले दिसते. यांच्या संगतीत राहून ‘वान नाही पण गुण लागला दिसतो तुम्हाला’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला.
 
 
Eknath Shinde-Vadettivar
 
विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही नेहमी शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकर्‍यांना फसवले म्हणता तर, विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला आकडेवारी बघण्याचा, मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती बघा आणि छातीवर हात ठेवून सांगा, अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला दोन वर्षांत 15 हजार कोटी रुपये इतिहासात कधी दिले नव्हते. ते आम्ही शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा केले. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट देण्याचा निर्णय करून दिले. शिवाय, सततच्या पावसामुळे होणार्‍या नुकसानीला कधीही भरपाई मिळत नव्हती. Eknath Shinde-Vadettivar ती देण्याचा निर्णय घेतला आणि द्यायला लागलो. एक रुपयात पिक विमा दिला. शेतकर्‍यांचे हप्ता भरण्याचे टेंशन दूर करून, संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली. केंद्र सरकार 6 हजार रुपये शेतकर्‍याला देते. त्यात राज्य सरकारने 6 हजार द्यायला सुरुवात केली. कधी दिली जायची ही मदत. असा प्रश्न करताच, वडेट्टीवारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, खरं ऐकण्याची हिंमत ठेवा. नुसतं खोटं बोला रेटून बोलाची सवय लागलेली दिसते तुम्हाला, असा टोला लगावला.
‘दादा का वादा पक्का’
शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करण्याची हिंमत आम्ही दाखवली. युवकांना 10 हजार रुपये छात्रवृत्ती देण्याचाही निर्णय घेतला. आता देणार कुठून, असा प्रश्न तुम्ही उपस्थित करीत आहात. तुम्हाला काळजी करायची गरज नाही, आम्ही येथे बसलो आहोत. 1 जुलैपासून त्यांच्या थेट खात्यात जाईल, तेव्हा कळेलच तुम्हाला. आता जुलैला जास्त दिवस नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. ‘ये दादा का वादा है, दादा का वादा पक्का रहता’, अशी मिश्कील टिप्पनी मुख्यमंत्र्यांनी केली.