तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal-Washim Lok Sabha Result : यवतमाळ वाशीम लोकसभेची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी होणार असून, या मतदारसंघाचा खासदार कोण होणार आहे याचा निकाल लागणार आहे. मंगळवारी निकाल लागणार असल्याने उमदेवारांची धाकधूक वाढली आहे. मुख्य उमेदवारांनी तर देव पाण्यात ठेवले आहेत.
यवतमाळ वाशीम मतदारसंघात एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी महायुतीच्या उमदेवार राजश्री पाटील व महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यात खरी लढत होती. येथील दारव्हा रस्त्यावरील शासकीय गोदामात यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जिल्हा निवडणूक कार्यालयाने सर्व आवश्यक तयारी केली आहे.
येथे एकूण चार वेगवेगळ्या हॉलमध्ये सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणी कर्मचारी, टेबल, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींची व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एकूण 30 फेर्यांमध्ये आणि कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 26 फेर्या होतील.
वाशीम विधानसभा मतदारसंघ 28 फेर्या, पुसद विधानसभा मतदारसंघ 25 फेर्या, दिग्रस विधानसभा मतदारसंघ 28 फेर्या, तर राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण 25 फेर्या होणार आहे. मंगळवारी होणार्या मतमोजणीत मतदार राजाने कोणाला कौल दिला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दारव्हा मार्ग बंद
या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग बंद राहणार आहे. अवजड व इतर हलक्या वाहनांच्या वाहतुकीकरिता हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे.