आनंदाची अनुभूती : पंढरीची वारी

    दिनांक :30-Jun-2024
Total Views |
संत प्रबोधन
Pandhari Vari : पंढरीची वारी ही आनंदाची अनुभूती आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येक मनुष्यजीव हा परम सुखाच्या प्राप्ती आणि जीवनातून दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत धडपडत असतो. परंतु, प्रत्येकाला ते प्राप्त होत नाही. खरा आनंद हा त्याग, समर्पण भावनेत व भगवंताच्या नामस्मरणात आहे, असे तत्त्व मानणारे वारकरी भगवंतांचे नाम घेत, वारीच्या मार्गाने पंढरीला निघाले आहेत.
उजळले भाग्य । आता अवघी चिंता वारली ॥
संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनी पोटी साठवू ॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सापडला ॥
 
 
pandharichi-wari
 
आपल्या भाग्याचा उदय वारीच्या मार्गामध्ये आहे, असे मानणारे हे सर्व Pandhari Vari वारकरी पंढरीच्या मार्गाने निघालेल्या प्रत्येक वारकर्‍याला वाटते. आपले जीवन समर्पित भावनेने जगताना त्यांना विठ्ठलाचा खूप मोठा आधार वाटतो. आपल्या वर्षभराच्या कामाचे नियोजन करून आषाढी देवशयनी एकादशीसाठी वारकरी वारीच्या मार्गाला लागलेला आहे. विठोबाच्या नावाचा गजर करीत मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या मार्गाला नाचत-गात भगवंताला आपले क्षेम देण्यासाठी पोहोचला आहे.
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंद भरीन तिन्ही लोक ॥
जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेल माहेरा आपुलिया ॥
 
 
ही Pandhari Vari वारी आनंदाची व्हावी यासाठी तो हरिनामात तल्लीन होऊन आपल्या संसाराची कोणतीही चिंता न वाहता त्यामध्ये समरस झाला आहे. वारकर्‍याला वारीचा हा संपन्न वारसा ज्यांच्यामुळे लाभला, त्या संतांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रदेशीची संत मांदियाळीने निर्माण केलेली ही वारी संत ज्ञानेश्वरांनी दाखवून दिलेली आहे. हा मार्ग आज सर्व वारकरी निष्ठावान पांथस्थ म्हणून चालत आहेत. या वाटेचे वारकरी होताना गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. मुखामध्ये विठ्ठलाचे नाम आहे. त्यांच्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज या सर्व संतांच्या दिंड्या वारकर्‍यांसह पंढरपूरला निघालेल्या आहेत. सर्व जणू आपल्या मुखातून एकच सांगत आहेत-
माझे माहेर पंढरी । आहे भिवरीच्या तीरी ॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ॥
 
 
संतांनी दाखवलेल्या त्यागाचे प्रतीक असणारा वारीचा मार्ग त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारला आहे. संत तुकारामांना तर, विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस त्यांनी अनेक अभंगातून व्यक्त केली आहे. ते म्हणतात -
भेटी लागी पंढरीनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ।
कै कृपा करिसी नेणे । मज दिनांचे धावणे ॥
शिणले माझे मन । वाट पाहता लोचन॥
तुका म्हणे भूक । तुझे पहावया मुख॥
 
 
Pandhari Vari : तुकारामांना विठ्ठल भेटीची लागलेली ही आस त्यांनी व्यक्त केलेली आहे. देवा तुझा नाम चिंतनाची गोडी माझ्या जिवाला लागली आहे. तुझ्या दर्शनाची भूक डोळ्यांना लागली आहे. प्राण गेला तरी हा माझा भक्तिभाव बदलणार नाही. माझ्या वाणीमध्ये पांडुरंगाच्या भावाचे गुणगान आहे. माझी वाणी पांडुरंगाला समर्पित आहे. कारण पंढरीचा विठ्ठल हा आधी- मध्ये -अंती त्याच वाणीचा विसावा आहे. तुकारामांना पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने त्यांच्या बुद्धीला वेदांच्या अभंगाचे झालेले स्फूरण आहे. याबद्दल विठ्ठलाचा कृपाप्रसाद आहे, असे ते मानतात. वेदातील कर्म-उपासना-ज्ञान या तत्त्वत्रयींसोबतच तत्त्वबोध, प्रमेय शास्त्रातील सिद्धांत आणि पुराणातील देवांचे अवतार कार्य या गोष्टी त्यांनी विठ्ठलाला साक्षी म्हणून अभंगामध्ये उद्धृत केले आहेत. तुकोबाची आविष्कार करण्याची पद्धती अशी आहे की, साक्षात विठ्ठल आपल्याशी बोलत आहे, असे वारकर्‍याला वाटते. तुकोबा अभंगाच्या निमित्ताने आपल्याला आपल्याच जगण्याची कथा सांगत आहेत, असे प्रत्येक वारकर्‍याला वाटते. वारकर्‍यांचा धर्म ते सांगतात-
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ॥
जगाचे कल्याण व्हावे, सर्वांना शाश्वत सुख लाभावे, समाजात सर्वत्र दैवी संपत्ती नांदावी व सर्वांना अद्वैत बोध प्राप्त व्हावा आणि ईश्वर प्राप्ती होऊन सर्वांच्या आत्म्यास शांती लाभावी, ही विश्वकल्याणाची इच्छा संत तुकारामांनी आपल्या वारीच्या अभंगातून व्यक्त केली आहे. विठ्ठलाला ते म्हणतात-
अल्प माझी मती । म्हणूनी येतो काकुळती ॥
आता दाखवा दाखवा । तुमची पाउले केशवा ॥
धीर माझ्या मना। नाही नाही नारायणा॥
तुका म्हणे दया । मज करा अभगिया॥
 
 
असे या विठ्ठलाला आठवतात. तुकारामांना जीवनामध्ये निश्चिती प्राप्त होईल व मनाला समाधान वाटेल आणि वर्षभर तुझ्या रूपाचे ध्यान करेल. तुझ्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला. तुला शरण आलो. पांडुरंगा. आता कोणत्याही भावाने माझा अंगीकार करावा. हीच त्यांच्या जीवाची तळमळ आपल्याला दिसते.
तुका म्हणे होईल दर्शने निश्चिती ।
गाईन ते गीत ध्यान मग ॥
 
 
लाखोच्या संख्येने Pandhari Vari वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत. ते याचसाठी की, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. संतांनी सांगितलेली वारी ही केवळ वारी नसून प्रत्येक पावलागणीक त्या विठ्ठलाचे नाम घेतो म्हणजे पावलागणीक यज्ञ करण्याचे पुण्य त्यांना लाभते, असा समज वारकर्‍यांचा आहे. नाम घेताना ते आपले देहभान विसरून नाचत आहेत. ऊन्ह, पाऊस, थंडी, वार्‍याचा कोणताही परिणाम त्यांच्या मनावर होत नाही. वारकरी जणू काही सर्वांना प्रेरणा देत आहेत की, कितीही संकटे आली तरी आपण आपल्या ध्येयासाठी म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी चालत राहील तर, निश्चितच विठ्ठल आपल्याला भेटेल आणि आपल्या जीवनातील ध्येय प्राप्ती होईल. संसारामध्ये हा जीव त्रासून गेला आहे. त्याला खरी विश्रांती विठ्ठलाच्या चरणाजवळ प्राप्त होते. त्याला भेटल्यानंतर सर्व जीव निवतो. त्याला परमानंदाची प्राप्ती होते. जीवनामध्ये विविध भौतिक वस्तूंनी फक्त सुख प्राप्त होते. तर, विठ्ठलाच्या भजन आणि भक्तीने परम सुखाची प्राप्ती होते. जीवनातून दुःखाची निवृत्ती झाल्याचा भाव त्यांच्या चेहर्‍यावर प्रकट होतो. म्हणून आपली भावना व्यक्त करतो -
त्रासला हा जीव संसारीच्या सुखा ।
तुजविन सखा कोणी नाही ॥
असे माझे मनीं वाटे नारायणा।
घालावी चरणावरी मिठी ॥
ते सुंदर देखणे रुपडे आवडीचा कोंडे आलिंगीन।
नाही पूर्व पुण्य मज पामराशि ।
म्हणून मी पायाशी अंतरलो॥
अलभ्य लाभ कैसा संचिता वेगळा ।
विनवी गोपाळा दास तुका॥
 
 
Pandhari Vari : भगवंताच्या दर्शनाने अलभ्य लाभ प्राप्त होतो. पूर्वजन्मीचे काही सुकृत माझ्या जीवनाचे काही संचित असेल म्हणून भगवंताने वारीसाठी बोलावले, असा भाव त्या प्रत्येक वारकर्‍यांच्या मनामध्ये आहे.
आर्त माझ्या बहु पोटी । व्हावी भेटी पायांची ॥
यासी तुम्ही कृपावंता। माझी चिंता असु द्या ॥
तळमळ करी चित्त। अखंडित वियोगे॥
तुका म्हणे पंढरीनाथा । जाणे व्यथा अंतरीची ॥
पांडुरंगा तुझ्या दर्शनाची आशा मनाशी बाळगून मी तुझ्या दारी आलो आहे. आता मला निराश करू नको. मला परतही करू नकोस तर, मला तुझे दर्शन देऊन धन्य धन्य कर.
पोटी दर्शनाची तळमळ लागलेल्या वारकर्‍यांचा भाव तुकोबांनी या साध्या शब्दांमध्ये व्यक्त केला आहे.
भेटी लागी जीवा । तुझी लागलीसे आस ॥
आपल्या जीवनामध्ये खरा आनंद विठोबाच्या नामाने त्याच्या भजनाने येतो. म्हणून त्यांच्या भेटीसाठी हे वारकरी मोठ्या आनंदाने पंढरीला पोहोचले आहेत.
सर्व भाव तुझे चरणी । काया वाचा मनासहित देवा॥
आणिक दुसरे नये माझ्या मना राहिली वासना तुझ्या पायी॥
 
 
अशाप्रकारे भगवंताचे आपल्या जीवनामध्ये येणे म्हणजे आनंद आणि त्याच्या भेटीला घरातून निघणार ती वारी होय. ही आनंदाची Pandhari Vari वारी वारकर्‍यांच्या जीवनामध्ये सदैव राहण्यासाठी मागणी मागतात-
वारी चुको न दे हरी ।
ते आनंदाची वारी जणू सर्वांना सांगते
होय होय रे पंढरीचा वारकरी...
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- 7588566400