प्रवीण पोटे यांचा भाजपा अध्यक्षपदाचा राजीनामा

    दिनांक :05-Jun-2024
Total Views |
- नवनीत यांच्या पराभावाची स्विकारली जबाबदारी
 
अमरावती, 
अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांचा झालेला पराभव भाजपा शहराध्यक्ष Pravin Pote आ. प्रवीण पोटे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र पाठविले आहे.
 
 
Pravin Pote
 
जवळपास नऊ महिन्यापूर्वी आ. पोटे यांच्याकडे भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या पद्धतीने संघटन बांधणी केली होती. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ते चांगलेच सक्रिय झाले होते. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघाची भाजपाची उमेदवारी नवनीत राणा यांना मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या. नवनीत यांना भाजपाची उमेदवारी देऊ नये म्हणून त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांसह देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. पण, त्याचवेळी त्यांनी पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करण्याची ग्वाही दिली होती.
 
 
 
Pravin Pote : भेटून आल्यावर दुसर्‍याच दिवशी नवनीत यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांनी खुल्या दिलाने पक्षाचा निर्णय स्विकारला व काम सुरू केले. निवडणुकी दरम्यानही ते चांगले सक्रिय होते. नवनीत यांचा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे. तो मंजूर करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. तो मंजूर होतो की नाही हे पहावे लागेल. दरम्यान प्रवीण पोटे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 21 जून रोजी संपुष्टात येणार आहे. ते अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर भाजपाचे आमदार आहेत.