जनतेची कामे केलीच पाहिजे

    दिनांक :08-Jun-2024
Total Views |
- मल्लिकार्जुन खडगे यांचे आवाहन
- काँग्रेस कार्यसमितीची लोकसभा निवडणुकीनंतर पहिली बैठक

नवी दिल्ली, 
सत्तेत असू वा नसू आपण जनतेची कामे केली पाहिजे, चोवीस बाय सात त्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष Mallikarjun Kharge मल्लिकार्जुन खडगे यांनी शनिवारी केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘इंडिया’ आघाडने 233 जागा तसेच काँग्रेसने 99 जागा जिंकल्यानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज बोलावण्यात आली होती. या बैठकीत खडगे मार्गदर्शन करीत होते. काँग्रेस सांसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका वढेरा यांच्या सह सर्व प्रमुख नेते बैठकीसाठी उपस्थित होते.
 
 
Khadage
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वढेरा यांच्यासह काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते तसेच देशभरातील हजारो कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. या सर्वांनी एक टीम म्हणून काम केले, त्याचाच परिणाम म्हणून देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये जोष आणि चैतन्य निर्माण झाले. परिश्रम आणि संकल्पामुळे आम्ही मोठ्यात मोठ्या विरोधकाला नमवू शकतो, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे Mallikarjun Kharge खडगे यांनी सांगितले.
 
 
काँग्रेस पक्षाच्या विजयात राहुल गांधी यांनी पहिल्यांदा काढलेली चार हजार किमीची भारत जोडो यात्रा तसेच नंतर काढलेली 6,600 किमीची भारत जोडो न्याय यात्रा यांचे मोठे योगदान आहे, या दोन्ही यात्रा देशाच्या ज्या भागांतून फिरल्या तिथे काँग्रेसला मोठे यश मिळाले, याकडे खडगे यांनी लक्ष वेधले. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू झाली, तेथील दोन्ही जागा आम्ही जिंकल्या, आसाम, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. महाराष्ट्रात आम्ही सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आलो. लोकशाही आणि संविधान बचावच्या काँग्रेसच्या अभियानाला देशभरातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
 
ज्या राज्यात चांगले यश मिळाले, तेथील पक्षाच्या कामगिरीवर आम्ही समाधानी असलो, तरी काही राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, विशेषत: ज्या राज्यात आम्ही विधानसभा निवडणूक जिंकलो, तेथे आम्हाला चांगले यश मिळाले नाही. या राज्यात आम्हाला यश का मिळाले नाही, याचे आम्ही आत्मपरीक्षण करू तसेच आवश्यक त्या उपाययोजनाही करू. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षाच्या योगदानाची प्रशंसा करताना संसदेत आणि संसदेबाहेरही आम्ही एकत्रितपणे काम करू, जनतेचे प्रश्न उचलू, अशी ग्वाही Mallikarjun Kharge खडगे यांनी यावेळी दिली.