सुकळी (ज) येथील रास्तभाव दुकानात अफरातफर

08 Jun 2024 20:34:26
- परवाना रद्द करून 2.55 लाख रुपये शासनजमा करा
- उमरखेड तहसीलदारांचा जिल्हा पुरवठा अधिकार्‍याकडे अहवाल

उमरखेड, 
Swast dhanya dukan : स्वस्त धान्य दुकानातील धान्य शिधापत्रिकाधारकांना न वाटप करता त्याची अफरातफर करणार्‍या तालुक्यातील सुकळी (ज) येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात 2 लाख 55 हजार 233 रुपये शासनजमा करून दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यासाठी येथील तहसीलदारांनी यवतमाळ जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना अहवाल सादर केल्याने या रास्त भाव दुकानदारावर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
 
 
Swast dhanya dukan
 
सुकळी (ज) येथील या दुकानच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी पुसद व पुरवठा निरीक्षक उमरखेड यांनी या दुकानात जोडण्यात आलेल्या शिधा पत्रिकाधारकांची चौकशी केली. तब्बल 49 शिधापत्रिकाधारकांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यावेळी, 12 मार्च 2024 रोजी तपासणीत आढळून आलेल्या धान्य साठ्याचा ताळमेळ चौकशी अधिकार्‍यांनी घेतला असता रास्त भाव धान्य दुकानात गहू 21.81 क्विंटल आणि तांदूळ 47.43 क्विंटल कमी आढळून आला. तांदूळ, गहूच नव्हे तर रवा, मैदा, पोहा, पामतेल, चणाडाळ, साखर इत्यादी धान्यही तपासणीदरम्यान कमी आढळून आले.
 
 
Swast dhanya dukan : या सर्व धान्यसाठ्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम शासनजमा करणे आवश्यक असल्याचे सांगून 2 लाख 55 हजार 233 रुपये जमा करून स्वस्त धान्य दुकानधारक संगीता वानखेडे याचे प्राधिकारपत्र रद्द करण्यासाठी शिफारस करणारा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर चौकशी दरम्यान ऑनलाईननुसार धान्यक्री न करणे, वाटपाची पावती न देणे, साठा नोंदवही व साठाफलक अद्ययावत न ठेवणे, आनंदाचा शिधा उशिरा वाटप करणे याही त्रुटी आढळून आल्याने या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, असा अहवाल तहसीलदार राजेश सुरडकर यांनी 28 मे 2024 रोजी सादर केला आहे.
चार वेळ निलंबित, दोनवेळा रद्द
तरीही सुरूच
विशेष म्हणजे यापूर्वी हेच दुकान चारवेळा निलंबित करण्यात आले होते. तर दोनवेळा रद्दही करण्यात आले होते. एक वेळेस इसी अ‍ॅक्टनुसार गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे आता जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0