रशिया आणि युक्रेनकडून नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर

लढाऊ सैनिकांची कमतरता भरून काढण्यासाठी

    दिनांक :09-Jun-2024
Total Views |
राष्ट्ररक्षा
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामध्ये अनेक सैनिक मारले गेल्यामुळे किंवा जखमी झाल्यामुळे दोन्ही राष्ट्रांना सैनिकांची कमी पडत आहे. ही राष्ट्रे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून सैनिकांची कमी पूर्ण करत आहेत. या लेखामध्ये आपण दोन्ही देश त्यांना कमी पडत असलेल्या सैनिकांची कमी कशी दूर करत आहेत, यावर लक्ष केंद्रित करू.
 
 
war
 
युक्रेनला युरोप आणि अमेरिकन लढणार्‍या सैनिकांनी मदत केली नाही; मात्र शस्त्रपुरवठा मोठ्या प्रमाणात केला आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपचे स्पेशल फोर्सेसचे काही अधिकारी युक्रेनच्या सैन्याला तज्ज्ञांचा सल्ला (अ‍ॅडव्हाईस) देण्याकरिता किंवा डावपेचांची मांडणी/नियोजनाची गुणवत्ता किंवा ट्रेनिंगची गुणवत्ता सुधारण्याकरिता हजारोंच्या संख्येने युक्रेन सैन्यामध्ये आहेत. पण ते प्रत्यक्ष लढण्याचे काम करीत नाहीत.
 
 
‘इंटरनॅशनल रिजन ऑफ टेरिटोरियल डिफेन्स ऑफ युक्रेन’
Russia-Ukraine War : युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ‘इंटरनॅशनल रिजन ऑफ टेरिटोरियल डिफेन्स ऑफ युक्रेन’ नावाचे एक सैनिकी दल युक्रेनमध्ये उघडले होते; ज्यामध्ये युरोपमधून आणि रशिया विरोधातल्या देशांमधून हजारो भाडोत्री सैनिकांनी प्रवेश केला आणि जे युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरुद्ध लढत होते/आहेत. या सैनिकांमध्ये काही रिटायर्ड सैनिक, काही भाडोत्री सैनिक आणि काही केवळ रशियाने त्यांच्या देशावर अत्याचार केल्यामुळे, रशियाच्या विरुद्ध लढाईस तयार झालेले युवक सामील होते. त्यांनी अनेक लढायांमध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणात भाग घेतला व अजून घेत आहेत. असे म्हटले जाते की, 50 वेगवेगळ्या देशांतील 20 हजारांहून जास्त परकीय नागरिकांनी ‘इंटरनॅशनल रिजन ऑफ टेरिटोरियल डिफेन्स ऑफ युक्रेन’मध्ये प्रवेश केला. त्यांना युक्रेनच्या बाजूने लढता यावे, म्हणून युक्रेनने आपल्या देशाच्या कायद्यामध्ये बदल केला आणि त्यांना युक्रेनच्या बाजूने लढण्याकरिता परवानगी दिली होती. नंतर गरज पडली तर त्यांना युक्रेनचे नागरिकत्व पण दिले जात होते. युक्रेनच्या बाजूने रशियापासून स्वतंत्र असलेल्या अनेक देशांचे नागरिक, (कझाकिस्तान, किरगिस्थान, बेलारूस) या देशांचे नागरिक लढत होते.
 
 
‘फ्रेंच फॉरेन सोल्जर्स लीजन युक्रेन’मध्ये
फ्रान्स हा पहिला देश होता; ज्याने एक रेजिमेंट म्हणजे 700 ते 1000 सैनिक युक्रेनमध्ये लढण्याकरिता पाठवले, असे वृत्त रशियाच्या मीडियाने प्रकाशित केले. परंतु, फ्रान्सने या वृत्ताचे खंडन केले. फ्रान्समध्ये ‘फ्रेंच लीजन’ नावाचा एक सैनिकी प्रकार आहे, ज्याला ‘फ्रेंच फॉरेन सोल्जर्स’ नावाने ओळखले जाते. या सैनिकांचे नेतृत्व फ्रान्सचे सैन्याचे अधिकारी करतात; परंतु सैनिक हे युरोप किंवा इतर देशातून आलेले खाजगी भाडोत्री सैनिक असू शकतील. असे मानले जाते की, ‘फ्रेंच फॉरेन सोल्जर्स लीजन’ने 1500 हून जास्त सैनिक लढण्याकरिता युक्रेनमध्ये पाठविले आहेत. ब्रिटिशांप्रमाणे फ्रान्सचे साम्राज्यसुद्धा आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक समुद्रातील अनेक देशांमध्ये पसरले होते. ते टिकविण्याकरिता या देशांमध्ये फ्रान्सला सैन्याची गरज होती. ही संख्या नेहमीच कमी पडायची म्हणून फ्रेंच फॉरेन लीजनची स्थापना 1831 मध्ये झाली होती. फ्रान्सच्या सैन्यात भरती होणार्‍या भाडोत्रींना पाच वर्षांकरिता सैन्यात घेतले जाते. जर त्यांनी चांगले काम केले तर त्यांना फ्रान्सचे नागरिकत्व दिले जाते. म्हणजेच पाच वर्षांकरिता जर तुम्ही फ्रान्सकरिता वेगवेगळ्या ठिकाणी लढाई केल्यास, तुम्हाला फ्रान्सचे कायमचे नागरिकत्व मिळू शकेल. जर हे सैनिक लढताना जखमी झाले तर त्यांना फ्रान्सचे नागरिकत्व लगेच दिले जाते. गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन, ‘आम्ही युक्रेनमध्ये फ्रान्सचे सैन्य पाठवू’ अशी धमकी देत आहेत, परंतु त्यांना नाटो किंवा युरोपमधल्या इतर देशातून फारसे समर्थन मिळाले नाही. त्यांना पोलंड आणि बाल्टिक देशांकडून काही मदत मात्र जरूर झाली. सध्या लढण्याकरिता फ्रान्सकडे फारसे सैन्य नाही. मात्र, 2025 पर्यंत फ्रान्सकडे एक डिव्हिजन सैन्याची (15 ते 20 हजार सैन्य) क्षमता निर्माण होईल. म्हणून मधल्या काळात ‘फ्रेंच फॉरेन सोल्जर्स लीजन’ना युक्रेनमध्ये पाठविले जाईल.
 

french-foreign 
 
रशियन सैन्यात काही भारतीय, श्रीलंकन आणि नेपाळी नागरिक सामील
Russia-Ukraine War : मार्च 2024 मध्ये काही भारतीय, श्रीलंकन आणि नेपाळी नागरिक रशियन सैन्यात सामील झाल्याचे आणि युक्रेनमध्ये आघाडीवर लढत असल्याचे उघड झाले. केवळ आठवडाभराच्या प्रशिक्षणानंतर त्यांचा युद्धात वापर केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युक्रेन युद्धात आतापर्यंत नेपाळचे 12, श्रीलंकेचे 5 आणि 2 भारतीय नागरिक मारले गेले आहेत. रशियात परदेशी भाडोत्री सैनिक आणि युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी परदेशी कामगारांची प्रचंड मागणी आहे. भाडोत्री सैनिक आणि परदेशी कामगारांना दिल्या जाणार्‍या त्यांच्या देशात मिळणार्‍या पगारापेक्षा तीनपट पगारामुळे अनेक परदेशी नागरिक भरती होत आहेत. आता लढाईत मारले जाण्याची शक्यता बघता, हे नागरिक आपल्या देशात परत जाण्याकरिता मदत मागत आहेत. या युद्धामुळे रशियन सैन्यात 2021 मध्ये 1,902,757 सैनिक होते; जे 2022 मध्ये 2,039,757 आणि 2023 मध्ये 2,209,130 पर्यंत वाढले. आता रशियन सैन्य पुन्हा एकदा युक्रेनवर आक्रमक कारवाई करीत आहे. सैनिकांची कमी दूर करण्यासाठी रशिया अनेक परदेशी नागरिकांना जास्त वेतन आणि रशियन नागरिकत्व देऊ करत आहे. कामगारांना सैन्यात सहायक म्हणून भरती केले जाते आणि युद्धाच्या आघाडीवर पाठविले जाते. हे नागरिक रशियामध्ये दरमहा 550 डॉलर्स म्हणजेच दरमहा 45 हजार रुपये कमवू शकतात. रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भागात मदतनीस आणि पोर्टर म्हणून काम करणारे सुमारे 2000 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये दरमहा कमावतात. भारतीय लष्करात अग्निवीर योजना लागू झाल्यानंतर नेपाळी नागरिकांना गोरखा रेजिमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही. श्रीलंकेतील गृहयुद्धाचा अनुभव आणि अधिक कमावण्याची इच्छा श्रीलंकेच्या लष्कराच्या अनेक माजी आणि वर्तमान सैनिकांना रशियाकडे नेत आहे. डिसेंबर 2023 मध्ये 700 नेपाळी नागरिक रशियन सैन्यात काम करीत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार शेकडो श्रीलंकन आणि सुमारे 100 भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत, नेपाळ आणि श्रीलंकेतून टुरिस्ट व्हिसावर रशियाला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. 2021 मध्ये 7,132 भारतीय, 2022 मध्ये 8,275 रशियात गेले. 2023 पर्यटकांसाठी ई-व्हिसा प्रणाली सुरू केली आणि 1,039 नेपाळी नागरिक पर्यटक व्हिसावर रशियाला गेले. काही युट्युबर्स, ब्लॉगर्स, मध्यस्थ या फसवणुकीमध्ये सामील आहे.
 
 
फसवून सैनिकी काम करण्यास भाग पाडले
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध अनेक दिवस सुरू राहणार असल्याने अजून अनेक परदेशी नागरिक सैन्यात सामील होणार, हे निश्चित आहे. रशियाची लोकसंख्या सैनिकांच्या गरजेपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत रशिया परदेशी नागरिकांना अधिक पैशांची ऑफर देऊन आपल्या सैन्यात समाविष्ट करणे सुरू ठेवेल. अधिक कमाई आणि रशियन नागरिकत्व मिळण्याची आशा दक्षिण आशियातील नागरिकांना नेहमीच रशियात जाण्याकरिता प्रोत्साहन देईल. भारताचे परराष्ट्र मंत्रालय रशियन सैन्यात सेवा करणार्‍या भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही भारतीयांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे तर उर्वरितांबाबत रशियन अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे. नेपाळ आणि श्रीलंकेला अद्याप या बाबतीत भारताइतके यश मिळालेले नाही. जे रशियन सैन्यामध्ये अडकतात, त्यांना केवळ मृत्यू किंवा गंभीर जखमाच परत आणू शकतात. अनेक वेळा सांगितले जाते की, तुम्ही एक मजूर म्हणून जात आहात, पण नंतर फसवून त्यांना सैनिकी काम करण्यास भाग पाडले जाते. यामुळे भारतीयांनी रशियन सैन्यात भरती होणे थांबवावे.
 
 
वरील पद्धतींशिवाय रशियाने सैनिकांची कमी पूर्ण करण्याकरिता ‘वॅगनर’ नावाचा एक भाडोत्री सैनिकांचा ग्रुपसुद्धा वापरला होता आणि अजूनही वापरला जात आहे. याशिवाय एक अजून नावीन्यपूर्ण पद्धत आहे, रशियाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हजारो गुन्हेगारांना सैन्यात भरती करण्यात आले आहे. जर त्यांनी सैन्यात चांगले काम केले तर त्यांची शिक्षा रद्द होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. मात्र याविषयी पुढच्या लेखामध्ये...
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)