व्यवसायातून भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारेसंत सेना महाराज

    दिनांक :09-Jun-2024
Total Views |
संत प्रबोधन
Sant Sena Maharaj : संत सेना न्हावी हे संत नामदेवांना समकालीन असणारे एक महत्त्वपूर्ण संत आहेत. त्यांचे कवित्वही भावपूर्ण होते. त्यांच्या नावाबद्दल व त्यांच्या महाराष्ट्राबाहेरील कार्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आढळतात. त्यांचे नाव सेनापती. वडिलांचे नाव गंगाधर असून ते हिंदीमधून काव्य करायचे, असे काही अभ्यासक मानतात. ‘हिंदी साहित्य का आलोचनात्मक इतिहास’ या ग्रंथात या सेनापती संतकवीबद्दलची माहिती आलेली आहे. त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे काही सांगता येत नाही. संत सेना न्हावी आणि सेनापती हे दोन नसून एकच व्यक्ती असावी, असा युक्तिवाद काही अभ्यासक करतात. संत सेना न्हावी यांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि त्यामध्ये त्यांचा नित्यनेम होता. आपल्या न्हाव्याच्या व्यवसायातही नित्यनेम होता. याचे उदाहरण म्हणजे राजाच्या सेवेला दररोज न चुकता जात असताना एक दिवस ते जाऊ शकले नाही. त्या दिवशी साक्षात पांडुरंगाने स्वतः जाऊन त्यांच्या वाट्याची राजे साहेबांची सेवा केली.
 

sant-sena-maharaj 
 
करिता नित्य नेम । राये बोलाविले जाण ॥
पांडुरंग कृपा केली । राया उपरती झाली ॥
मुख पाहता दर्पणी । आत दिसे चक्रपाणी ॥
कैसे झाले नवल परी । वाटी माजी दिसे हरी ॥
रखुमादेवीवर । सेना म्हणे मी पामर ॥
साक्षात पांडुरंगाने सेना न्हावी यांचे सेवेचे, न्हाव्याचे काम केलेले आहे. अतिशय सामान्य काम भगवंत आपल्या भक्ताचे करतो, असे प्रस्तुत अभंगातून आपल्याला प्रतीत होते. फक्त त्या सेवेप्रती आपला नित्यनेम व निष्ठा असली पाहिजे. सोबतच ती सेवा भगवंताला समर्पित असली पाहिजे, असा दृष्टांत भगवंतांनी साक्षात राजा व सेना न्हावी यांना दिला आहे. आयुष्याचा पूर्वार्ध संत सेना यांनी संत ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई आदी भावंडांच्या सहवासात घालवला. त्यांच्या सहवासाने त्यांचा मोह, मायादी गर्व गळून पडला होता. त्यांच्या सहवासानेच विठ्ठल भक्तीची आस लागली होती. जो चैतन्याचा, लावण्याचा गाभा विटेवरी उभा आहे. त्याच्या भक्तीमध्ये संत सेना महाराज तन्मय होऊन गेले. पुढील काळामध्ये उत्तर भारतामध्ये जाऊन त्यांनी भावी समाजाचे आध्यात्मिक नेतृत्व केल्याच्या काही नोंदी आढळतात. पंजाब संयुक्त प्रांताने राजपुताना येथील न्हावी समाजांनी सेनाजींचे पारमार्थिक नेतृत्व स्वीकारले होते. या सेना भक्तांनी पंजाब व राजपुताना प्रांतात संत सेना महाराजांची शेकडो मंदिरे बांधली. मठ उभारले. आपल्या पंथाच्या आद्यप्रवर्तकार म्हणजे संत सेनाजीवर नाटक रचले. एवढा आध्यात्मिक प्रभाव त्यांचा परप्रांतात होता. अशा नोंदी काही ठिकाणी आढळतात. अशी फार मोठ्या उंचीची आध्यात्मिक कमाई सेना महाराजांनी महाराष्ट्रात असतानाच केली असली पाहिजे, हे उघड आहे.
 
 
सेना न्हावी यांचे पारमार्थिक कार्य
भक्तिमार्गाचा प्रचार हे आपले अवतारकार्य आहे, याची जाणीव संत सेनाजींना पदोपदी असल्याचे जाणवते. जीवनामध्ये आलो तर जीवनामध्ये काय करायचे, कोणते कार्य करायचे याबद्दलचा निश्चय ते व्यक्त करतात.
असता वैकुंठासी । काय सांगेल हृषीकेशी ॥
जाऊन मृत्यू लोकांसी । जन भक्तीसी लावी का ॥
आज्ञा वंदनीय शिरी । जन्मलो न्हावियाचे उदरी ॥
वाचे नाम निरंतर । रामकृष्ण गोविंद ॥
त्याच्या नावाने एक पंथ विशेष प्रभावाने जन्माला आला. हा त्यांच्या कर्तृत्वाचा परिपाक आहे.
 
 
सांसारिकतेच्या पलीकडे जीवन
जगणारे संत सेना महाराज
संत सेना न्हावी यांच्या मते सांसारिकतेचा जो अनुभव आहे, तो तापत्रय देणारा आहे. त्या तापत्रयातून बाहेर पडण्यासाठी पांडुरंगाचा सहवास माणसाला आवश्यक आहे. मुखामध्ये त्याचं नाव घेणे आवश्यक आहे. यासाठी ते त्याच्याजवळ राहण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हा त्यांच्या जीवनातला खूप मोठा ठेवा आहे, असे ते म्हणतात. भगवंताचे मुखामध्ये असणारे पवित्र नाम आणि त्याचा सहवास यामुळेच ते हा भवसिंधू पार करून गेले, अशा प्रकारचा अनुभव सांगतात.
 
 
उतरलो पार । संसार सिंधू हा दुस्तर ॥
कृपा केली पांडुरंगे । सर्व निवाली अंगे ॥
सुख-संतोषा पडे मिठी । आवडी पोटी होती ते ॥
उपाधी वेगळा । सेना राहिला निराळा ॥
 
 
संत सेना न्हावी यांची
नामावरची अपार भक्ती
भगवंताची कृपा आशीर्वाद मिळण्याचे खात्रीचे योग्य साधन म्हणजे नामस्मरण. संत सेना महाराज या साधनावरती खूप विश्वास ठेवतात. त्यांची अपरंपार श्रद्धा नामावर आहे. या साधनाचा महिमा त्यांनी ऊर्मिला व अनुभवला आहे. म्हणूनच ते भगवंताचे नाम सतत घेत राहतात.
गुंतलो होतो मोह आशा । स्मरता पावलो नाशा ॥
ऐसा अनुभव नामाचा । सेना न्हावी स्मरे वाचा ॥
या साधनावर श्रद्धा नसणार्‍यांचा त्यांनी चांगला समाचार घेतला आहे.
मुखी नाम नाही । त्याची संगती नको पाही ॥
जाता हरिकीर्तना नावडे ज्याच्या मना ।
सेना म्हणे त्याच कुळा सुद्धा नरकवास ॥
ज्या कुळामध्ये भगवंताचं नाम नाही. नामधारक नाही. त्यांचे अवघे कुळच नरकवासाला जाईल. म्हणून एक नाम झलक कुळामध्ये असावा. ज्यांने नाम भक्ती करावी. तो पूर्ण कुळाचा उद्धार करू शकतो, असा नामाबद्दलचा विश्वास संत सेना महाराज या ठिकाणी व्यक्त करतात.
 
 
संत सेना न्हावी यांनी
नाकारलेला तीर्थ व्रतांचा खटाटोप
संत सेना न्हावी यांनी तीर्थ व्रतांचा खटाटोप हा त्यांच्या दृष्टीने अनावश्यक आहे. कशासाठी खटपट करावी. तपतीर्थवृत्ते अचाट कृती कशासाठी? योग साधना ही खूप ध्येयनिष्ठ असावी. नाही तर, योग साधनाही भंग होऊ शकते. म्हणून संत सेना महाराज म्हणतात, एका ठिकाणी बसून भगवंताचे निवांतपणे चिंतन करणे, त्याचं नाम आळवणे हेच सर्वात सोपे आणि सर्वात श्रेष्ठ असे भक्तिसाधन आहे.
नामाचे चिंतन श्रेष्ठ पै साधन । जातील जळून महापापे ॥
न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन । करिता चिंतन हरी भेटे ॥
बैसुनी निवांत करा एक चित्त ।
आवडी गावे गीत विठोबाचे ॥
सकळाहुनी सोपे हेचि पै साधन ।
सेना म्हणे आण विठोबाची ॥
 
 
संत सेना न्हावी यांची
नामावरील अतूट श्रद्धा
नामसंकीर्तन साधनेवर सेना न्हावी यांचा अतूट विश्वास आहे. याच साधनेमुळे त्यांना साक्षात भगवंताचे दर्शन होते. त्याचा आनंद अलौकिकपणे ते व्यक्त करतात. त्यांच्या जीवनामध्ये भगवंताचे दर्शन हाच त्यांच्या जीवनातील मोलाचा ठेवा आहे, असे वर्णन करतात.
धन्य धन्य दिन । तुमचे झाले दरूषण ॥
आजि भाग्य उदया आले । तुमचे पाउल देखिये ॥
 
 
संत सेना न्हावी यांच्या
जीवनात संतसंगतीचे महत्त्व
नामस्मरणाप्रमाणेच संतांची संगती ही सेनाजी महाराजांना खूप महत्त्वाची वाटते. त्यांनी संत संगतीचा महिमा गोडपणे गायला आहे. संतांच्या संगतीमध्ये सामान्य न्हावीसुद्धा भगवंताची भेट घेऊ शकतो. भगवंताचे दर्शन त्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून संत ज्ञानदेवाच्या सहवासामुळे हे मला प्राप्त झाले, असा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांच्या सहवासानेच माझ्या जीवनातील मोह, माया, क्रोध या षड्रिपूंचा नाश झाला, असे ते सांगतात.
संत संगतीने थोर लाभ झाला ।
मोह निरसला मायादिक ॥
जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत यातिहिनांना जवळ करतात. संत हेच कृपावंत मायबाप आहेत, असा विचार संत सेना महाराज या ठिकाणी मांडतात. त्यांच्या मते संत हेच आपले खरे मायबाप आहेत. ते दीनदुबळ्यांना जवळ करतात. यातिहिनांना जवळ करतात.
उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥
जड जीवा उद्धार केला । मार्ग सुपंथ दाखविला ॥
वागवा अभिमान । सेना आहे यातिहीन ॥
 
 
संत सेना न्हावी यांची
यातिहिनतेची जाणीव
संत सेना न्हावी यांना आपल्या याती हिनत्वाची जाणीव आहे. त्यांना त्याबद्दल अंत:करणात थोडे दुःखही वाटते. पण, त्यासाठी ते कुठेही त्रागा करीत नाहीत. वैताग करीत नाहीत किंवा संताप व्यक्त करत नाहीत. देव भक्तांच्या साह्यास धावून जाताना त्याची जात पाहत नाही. तर, त्याचा श्रेष्ठ भक्तिभाव पाहतो. यातच त्यांना खूप मोठा धीर वाटतो. म्हणून भगवंत जाती न पाहता त्याची भक्ती पाहतो, असा विचार ते या ठिकाणी प्रामुख्याने प्रकट करतात.
गुणदोष न याती विचारी काही ।
धावे लवलाही भक्त काजा ॥
मला श्रेष्ठ जातीमध्ये जन्माला घाल. मला उच्च सामाजिक दर्जा प्राप्त होऊ दे, असे मागणे संत सेनाजी देवाजवळ कधीही मागत नाहीत. उच्च सामाजिक प्रतिष्ठा ही अहंकाराचे, भेदबुद्धीचे पोषण करणारे आहे. म्हणून ती ईश्वर भक्तीला मारक आहे. त्यामुळेच तर ज्ञानदेवांनी संभावितपणाला ओझे म्हटले आहे. त्यामुळे संभावितपणा हा शाप मानतात.
 
 
संत सेना न्हावी यांची समाधानी वृत्ती
संत सेना न्हावी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विलोभनीय वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे त्यांची समाधानी वृत्ती होय. आपला न्हावीपणाचा व्यवसाय रोज ठरावीक वेळ, नित्य नेमाने ते प्रामाणिकपणे करत असत. उरलेला वेळ हरी स्मरणात घालवत असत, असे त्यांच्या जीवन नीतीचे साधे सरळ वळण आहे. ते आपलं काम इमानेइतबारे करतात. ज्या व्यवसायामुळे आपल्याला समाजामध्ये राहावे लागते. त्यामुळेच उपजीविकेचे साधनसुद्धा प्राप्त झालेले आहे. तो व्यवसाय ते खूप प्रामाणिकपणे करतात. परंतु, नागासारखे कमी दर्जाचे काम माझ्या वाट्याला आले, याबद्दल त्याचं दुःख त्यांना कदापि वाटत नाही.
जन्मलो ज्या वंशात । धंदा दोन प्रहर नेमस्त ॥
सत्य पाळा रे धर्माशी । सेना म्हणे आज्ञा ऐसी ॥
न्हावीयांचे वंशी । जन्म दिला हृषीकेशी ॥
प्रतिपाळावे धर्माशी । व्यवहाराशी न सांडी ॥
 
 
संत सेना यांचा साधेपणा
संत सेना महाराजांचे जीवन अतिशय सरळ असून त्यांची व्यवहार भाषा अतिशय साधी सोपी आहे. त्यांना भक्तीचा अभिमान नाही. त्यांना मोठेपणाचा सोस नाही. तर, ते अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपला भक्तिभाव भगवंताप्रती व्यक्त करतात. ते भाषेला कुठेही नटवीत नाहीत, सजवीत नाहीत. तर, त्यांच्या व्यवसायामध्ये आलेल्या शब्दांचा खुबीने उपयोग करतात. न्हाव्याच्या व्यवहारातील दैनंदिन शब्द वापरून देवाची भक्ती करतात.
आपल्या व्यवसायाचा त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही. उलट त्याच व्यवसायातील भक्ती कशी दृढमूल होऊ शकते. आपला व्यवसाय कोणताही असो त्यामध्ये जर आपण भगवंत पाहिला. त्याच्याप्रती ते कार्य समर्पित केलं. भक्तिमार्गाने त्याचा सन्मान केला. म्हणजे काय प्राप्त होईल हेसुद्धा ते सांगतात.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥
विवेक दर्पण आयना दावू । वैराग्य चिमटा हलवू ॥
उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू ।
भावार्थाच्या बगला झाडू ॥ काम क्रोध नखे काढू ।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥
काम, क्रोधावर विजय मिळण्याचे ध्येय या अभंगाच्या माध्यमातून संत सेनाजी महाराज ठेवतात. या अभंगाला व्याकरणदृष्ट्या आपण पाहिले तर हजामत करणे, बगला झाडणे, शेंडी पिळणे हे वाक्प्रचार आलेले आहेत. ते मराठी भाषेमध्ये प्रथमत:च आपल्याला दिसतात. अशी व्यावसायिक भाषा वाक्प्रचार रूढ करण्याचे श्रेय संत सेना महाराज यांना जाते.
 
 
संत सेना न्हावी यांचा संतांबद्दल आदरभाव
संत सेना न्हावी हे संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव व संत मुक्ताबाई यांच्यासारख्या अधिकाराने ज्येष्ठ-श्रेष्ठ संतांना आदर देतात. त्यांचा मानसन्मान करतात. त्यांचे शिष्यत्व पत्करतात.
शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥
निवृत्तिनाथांना शिवाचा अवतार म्हणणारे संत सेना महाराज संत ज्ञानेश्वरांना गुरुस्थानी मानतात.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू । उत्तरील पैलपारू ज्ञानदेव ॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । पुढील भव व्यथा ज्ञानदेव ॥
श्रीज्ञानराजे केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥
संत सेना न्हावी यांचे जीवन साधे सरळ सोपे होते. आपल्या व्यवसायातून त्यांनी भावभक्ती फुलविली. सोबतच आपल्यापेक्षा ज्येष्ठ-श्रेष्ठ संतांना प्रमाण मानून त्यांच्या भक्तीचा मार्ग पुढे नेण्याचा निश्चय त्यांच्या भक्तिकार्यातून आपल्याला दिसतो. त्यांचा नेमस्तपणा आपल्या व्यवसायाप्रती असणारी निष्ठा त्यांनी सदैव व्यक्त केली आहे. त्यातूनच भक्तीचा मार्ग प्रशस्त केला आहे.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
7588566400