ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनर्निर्माण

    दिनांक :12-Jul-2024
Total Views |
दृष्टिक्षेप
- गुंजन अग्रवाल
जगप्रसिद्ध Nalanda University नालंदा विद्यापीठाचे नवनिर्माण हे भारतीय शिक्षण प्रणालीचे उत्थान आणि जागतिक शिक्षणात भारताची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘‘आगीच्या ज्वाळात ग्रंथ जळू शकतात, पण आगीच्या ज्वाळा ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत. नालंदाच्या विध्वंसाने भारत अंधकाराने व्यापून गेला होता. आता त्याचे नवनिर्माण, या विद्यापीठाची पुनर्स्थापना भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात करेल. आपल्या प्राचीन अवशेषांजवळील नालंदाचे पुनर्जागरण, हा नवीन परिसर जगाला भारताच्या सामर्थ्याचा परिचय देईल. जे राष्ट्र मजबूत मानवी मूल्यांवर उभे असते ते राष्ट्र, इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याची पायाभरणी कशी करायची हे चांगल्या प्रकारे जाणते, हे नालंदा जगाला सांगेल,’’ असे ओजस्वी प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्याने बांधलेल्या इमारतींचे उद्घाटन करताना केले.
 
 
Nalanda University
 
Nalanda University : भारताने पुन्हा एकदा आपले प्राचीन वैभव प्राप्त केले पाहिजे आणि केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील कानाकोपर्‍यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणासाठी भारतात येऊन स्वत:चे भविष्य घडविले पाहिजे, भारतातही आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळून करीअर घडविण्याची संधी आहे, असे विदेशातील विद्यार्थ्यांना वाटले पाहिजे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. हे एक निर्विवाद सत्य आहे की नालंदा महाविहाराला संपूर्ण जगात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य स्थान होते. पाटणाच्या आग्नेयेला सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या बडगाव नावाच्या विस्तीर्ण परिसरात असलेले त्याचे अवशेष बघितले तर येथे एखादा खूप मोठा किल्लाच असावा, असा आभास होतो. लाल दगडांनी बांधलेल्या या निवासी शिक्षण केंद्रात दहा हजार विद्यार्थी शिकत असत आणि त्यांच्यासाठी 1,500 शिक्षकांची व्यवस्था होती. 2016 मध्ये 23 हेक्टरमध्ये पसरलेल्या या अवशेषांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला होता.
 
 
नालंदा शब्दाची व्युत्पत्ती
‘नालं ददाती इति नालंदा अथवा न अलं ददाती इति नालंदा’ असे ‘नालंदा’ या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी सांगितले जाते. म्हणजेच जिथे कमळाच्या बिया सापडतात किंवा ज्यातून भरपूर कमळं मिळू ती नालंदा.
प्राचीन बौद्ध आणि जैन ग्रंथातील नालंदा
‘दीर्घविकाय’ दुर्घविकाय प्रकट करतो की
मगधची राजधानी राजगृहाच्या एक योजन उत्तर-पश्चिमेस असलेले Nalanda University नालंदा हे एक ‘समृद्ध, संपन्न आणि बहुजनाकीर्ण’ शहर होते, असे दीर्घविकायमध्ये म्हटले आहे. येथील एका श्रीमंत कुटुंबाने भगवान गौतम बुद्धांच्या निवासस्थानासाठी आपले आम्रवन दान केले होते. भगवान बुद्ध राजगृहातून नालंदात आल्याचा उल्लेख पाली ग्रंथात अनेक वेळा आढळतो. गौतम बुद्धांचे मुख्य शिष्य सारिपुत्र यांचा जन्म नालंदाजवळील नालक नामक गावात झाला होता. या ठिकाणी बौद्ध भिक्खू आणि उपासकांसाठी सारिपुत्राच्या स्मरणार्थ चैत्य बांधण्यात आला होता. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने नमूद केले आहे की मगधच्या 500 व्यापार्‍यांनी दहा कोटी सुवर्ण मुद्रा दान करून येथे एक विस्तीर्ण भूखंड खरेदी केला होता. तिबेटी इतिहासकार लामा तारानाथ (1575-1634) यांनी लिहिले आहे की, सम्राट अशोकाने येथे येऊन सारिपुत्राच्या चैत्याची पूजा केली होती. त्यांनी तेथे त्यांच्यासाठी एक सुंदर मंदिराची निर्मितीही केली होती. या सारिपुत्र चैत्याभोवती जे भिक्षूंचे मठ-विहार बांधले होते तेच कालांतराने शैक्षणिक केंद्र बनले. आजही प्राचीन अवशेषांजवळ सारिपुत्राचे अवशेष म्हणून ‘सारिचक’ नावाचे गाव अस्तित्वात आहे.
 
 
एक विद्यापीठ म्हणून अस्तित्व
सम्राट अशोकाच्या काळातील प्रसिद्ध बौद्ध मठ Nalanda University नालंदाची विद्यापीठासारखी उभारणी गुप्त शासक कुमारगुप्त शक्रादित्य (इसवीसन 415-455) याने केली होती. सरकारी अनुदानातून केवळ बांधकामच नव्हे तर देखभालही केली जात होती. बालादित्य, तथागतगुप्त इत्यादी इतर गुप्त शासकांनीही नालंदात बांधकाम केले. सहाव्या शतकापर्यंत नालंदा हे शिक्षणाचे एक फार मोठे केंद्र म्हणून विकसित झाले होते. कन्नौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या काळात नालंदाची खूप भरभराट झाली. आठव्या शतकानंतर बंगालच्या पाल घराण्याने नालंदाची जबाबदारी सांभाळली. कन्नौैजचा राजा यशोवर्मन यांच्या देणगीच्या नोंदीही (दान-अभिलेख) नालंदामध्ये आढळल्या आहेत. नालंदाच्या खर्चासाठी, ह्युएन त्सांगने 100 आणि इत्सिंगने 201 गावांमधून मिळणार्‍या कराविषयी सांगितले आहे. याशिवाय धर्मनिष्ठ धनिक वर्गाकडूनही भरपूर अनुदान मिळत होते. ळाले. या गावांमधून दररोज शेकडो मण तांदूळ आणि दूध व लोणी बैलगाडीतून आणले जात होते, असे ह्युएन त्सांगने लिहिले आहे.
 
 
प्रवेश-परीक्षा
प्राचीन नालंदा महाविहारातील प्रवेशाचे निकष (मानदंड) अत्यंत कठीण होते. याठिकाणी आलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला त्याची जात, वर्ण अथवा समुदाय पाहून नव्हे तर मौखिक अर्थात तोंडी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश मिळत असे. ह्युएन त्सांग यांच्या म्हणण्यानुसार प्रवेशार्थींची परीक्षा ‘द्वारपंडितां’ कडून घेतली जात असे. दहा पैकी केवळ तीनच प्रवेशार्थी उत्तीर्ण झालेले त्याने पाहिले होते. नालंदा विद्यापीठात प्रवेश मिळणे हे विद्यार्थ्याच्या उच्चपात्रतेचे सूचक मानले जात असे. म्हणूनच ‘आपण नालंदाचे पदवीधर आहोत असे खोटेच सांगणार्‍याला देखील सर्वत्र मानसन्मान मिळत असे.’ असे ह्युएन त्सांगने देखील लिहिले आहे.
 
 
अभ्यासक्रम आणि जागतिक कीर्ती
Nalanda University नालंदा महाविहाराचे शिक्षण केवळ बौद्ध साहित्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्या काळातील सर्व विषयांचा त्यात समावेश होता. नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम खूप विस्तृत होता. येथे वेद, वेदांत, धर्मशास्त्र, पुराणे, ज्योतिष, वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शनासह अन्य भौतिक विषयांचेही शिक्षण दिले जात असे. ह्युएन त्सांगने येथे वेद, हेतू विद्या, न्यायशास्त्र, भाषाशास्त्र, वैद्यकशास्त्र, ज्योतिष इत्यादींचे अध्ययन व अध्यापन होत असल्याचा उल्लेख केला आहे. योगशास्त्राचे महान अभ्यासक असलेले तत्कालीन संघस्थवीर शिलभद्र यांनी ह्युएन त्सांग यांना दंडनिती आणि पाणिनीय व्याकरण शिकवले होते. नालंदा हे मुख्यत: महायान तत्त्वज्ञानाचे केंद्र होते. नालंदाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीय न्यायशास्त्र आणि प्रमाणशास्त्र यांचा झालेला विकास. ह्युएन त्सांगने नालंदा महाविहारातील धर्मपाल, चंद्रपाल, गुणमति, स्थितमति, बुद्धभद्र इत्यादी विद्वान आचार्यांचाही उल्लेख केला आहे. तिबेटी राजा सांग-स्तंग गम्पोने आपला मंत्री थान-मि याला नालंदा येथे अध्ययनासाठी पाठवले होते. येथील थोर विद्वान आचार्य देवविद यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने बौद्ध आणि ब्राह्मण ग्रंथांचे अध्ययन केले होते. तिबेटचा आणखी एक राजा यी-संगस्तन (800-815) याने कुलपती शांतरक्षित आणि पद्मसंभव यांना आपल्या दरबारात आमंत्रित केले होते. या राजाने महान विद्वान शीलभद्र यांना चिनी पंडितांशी शास्त्रार्थ (चर्चा-संवाद) करण्यासाठी आमंत्रित केले होते.
 
 
उच्चशिक्षणामुळे नालंदा महाविहाराची कीर्ती तिबेट, चीन, जपान, भूतान, कोरिया, मंगोलिया, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्की, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये पोहोचली होती. चिनी प्रवासी इत्सिंग जेव्हा भारतात आला तेव्हा त्याची भेट श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांशी झाली होती. चीन, जपान आणि कोरियामधून आलेल्या 55 विद्यार्थ्यांशीही त्याने चर्चा केली होती. नालंदा महाविहाराची भव्यता, विद्यापीठाची शैक्षणिक परंपरा आणि प्रशासन यांचे सर्वात आकर्षक आणि तपशीलवार वर्णन ह्युएन त्सांग याच्या ‘सी-यू-की’ या प्रवासवर्णनामधून आढळून येते. ह्युएन त्सांग भारतात अनेक ठिकाणी फिरून इसवी सन 633 च्या सुमारास नालंदा येथे पोहोचला आणि त्याने सुमारे पाच वर्षे येथे वास्तव्य केले. ह्युएन त्सांग यांना नालंदात ‘मोक्षदेव’ हे नाव प्राप्त झाले. ह्युएन त्सांग भारतातून बाहेर गेल्यानंतर नालंदाची कीर्ती इतकी पसरली की पुढील तीन दशकांत चीन आणि कोरियातून अकरा प्रवासी येथे आले.
 
 
नालंदाचे ग्रंथालय
Nalanda University नालंदा महाविहारामध्ये 90 लाख हस्तलिखित ग्रंथ असलेल्या ग्रंथालयाचे एक विशेष क्षेत्र होते. या ग्रंथालय परिसराला ‘धर्मगंज’ नावाने संबोधले जात असे. येथे ‘रत्नसागर’, ‘रत्नोदधि’ आणि ‘रत्नरंजक’ नावाच्या तीन विशाल ग्रंथालय इमारती होत्या. त्यापैकी ‘रत्नसागर’ ही इमारत नऊ मजली होती. ह्युएन त्सांग याने नालंदाच्या ग्रंथालयाचा अतिशय अभिमानाने उल्लेख केला आहे. बख्तियार खिलजीच्या सैन्याने हे जाळले तेव्हा या ग्रंथालयाच्या इमारती सुमारे सहा महिने जळत राहिल्या. याबरोबरच ज्ञानाचा सूर्य येथे जवळजवळ मावळला आणि अमूल्य अशी ग्रंथसंपदा कायमची भस्मसात झाली, ज्यांचा केवळ उल्लेख तिबेटी आणि चिनी ग्रंथांमध्ये आढळतो.
 
 
आक्रमणांची मालिका
नालंदा महाविहारावर अनेक आक्रमणे झाली आणि वेळोवेळी त्याची पुनर्बांधणीही झाली. पहिला हल्ला सहाव्या शतकात मिहिरकुलने केला होता. मात्र, त्याचे आक्रमण लवकरच परतवून लावण्यात आले. आठव्या शतकात बंगालच्या गौड शासकाच्या आक्रमणातही नालंदाचे खूप नुकसान झाले होते. पुरातत्वशास्त्रज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया (1908-1989) हे आपल्या ‘द युनिव्हर्सिटी ऑफ नालंदा’ या पुस्तकात लिहितात, ‘किल्ल्यासारखा परिसर आणि त्याच्या संपत्तीविषयी पसरलेल्या कथांमुळे आक्रमणकर्ते येथे आक्रमण करण्यास आकर्षित झाले असावेत. उत्खननात अनेक बौद्ध विहारांमधून मौल्यवान धातू, नाणी आणि नाणी बनवण्याचे साचे आढळले आहेत. किंबहुना, बौद्ध भिक्खू इतके श्रीमंत झाले होते की अनेक ठिकाणी त्यांनी देणग्या घेण्याऐवजी दान दिल्याचे शिलालेखात आढळून आले आहे.
महिपाल प्रथम (इसवीसन 999) च्या शिलालेखावर लिहिले आहे, ‘आपल्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी नालंदा आगीमुळे नष्ट झाले होते, ज्याची पुनर्बांधणी त्याने स्वत: केली होती’. 
 
 
12 व्या शतकाच्या शेवटी मोहम्मद घोरीचा सेनापती इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजीच्या नेतृत्वाखाली आक्रमकांच्या सैन्य तुकडीने हे महान शैक्षणिक केंद्र जाळून राख करून टाकले, असे बहुतांश इतिहासकारांचे मत आहे. Nalanda University नालंदाच्या विध्वंस व विनाशाची माहिती देणारा पहिला स्रोत म्हणजे तिबेटी बौद्ध भिक्षू आणि यात्रेकरू ‘चाग लो-त्सा-बा चोस-रजे-दपाल’ (इसवीसन 1234-36) अर्थात धर्मस्वामिन् (1197-1264) चे जीवनचरित्र ‘नाम-थार’ अर्थात ‘जीवन कथा.’ धर्मस्वामिन् 1234 मध्ये तिबेटमधून भारतात आला होता. या ग्रंथानुसार, धर्मस्वामिन् नालंदाच्या आधी वज्रासन (बोधगया) येथे दाखल झाला. तेथील भयंकर स्थिती पाहून तो सुन्न होऊन गेला. तुर्कांच्या भीतीने मुख्य बुद्ध मूर्ती भिंतीच्या मागे लपवून ठेवण्यात आल्याचे त्याला कळले. येथील राजा बुद्धसेन (प्रसिद्ध सेन घराण्यातील नव्हे) तुर्कांच्या भीतीने जंगलात लपून राहात असल्याचा उल्लेख ‘नाम-थार’ या ग्रंथात आहे. धर्मस्वामिन सांगतात की उदंतपुरी महाविहार उद्ध्वस्त केल्यानंतर तुर्की सैन्याने त्याला आपली छावणी बनवले होते. नालंदाबद्दल धर्मस्वामिन् आपल्या या ग्रंथात लिहितात की, नालेंद्र विहार (नालंदा) चे वैभव नष्ट झाल्यानंतर आता तेथे 90 वर्षीय आचार्य राहुल श्रीभद्र अन्य चार शिक्षकांसह तेथे सुमारे 70 विद्यार्थ्यांना शिकवत होते.
 
 
राहुल श्रीभद्र यांना सुरुवातीला राजा बुद्धसेनकडून आर्थिक मदत मिळत होती. त्यानंतर आचार्यांचे शिष्य, उदन्तपुरीचे एक श्रीमंत ब्राह्मण जयदेव यांनी आचार्य व त्यांच्या शिष्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. दरम्यान तुर्की सैन्याने जयदेव यांना अटक केली. त्यामुळे त्यांनी तुरुंगातूनच आचार्यांना निरोप पाठवला की ‘नालंदावर पुन्हा एकदा हल्ला होणार आहे. त्यामुळे त्यांनी तेथून लवकर निघून जावे.’ जयदेव यांचा हा निरोप मिळताच राहुल श्रीभद्र यांनी सर्व शिष्यांना बाहेर पाठवले आणि स्वत: वृद्धत्वाचे कारण सांगून विहारमध्येच राहिले. राहुल श्रीभद्र यांना या अशा अवस्थेत सोडून नालंदातून बाहेर पडायला धर्मस्वामिन् तयार नव्हते. त्यांनी श्रीभद्र यांना आपल्याबरोबर चलण्याचा खूप आग्रह केला. बरीच समजूत काढल्यानंतर राहुल श्रीभद्र धर्मस्वामिन्च्या खांद्यावर बसून विहाराबाहेर पडले आणि त्याचवेळी अश्वारूढ तुर्की सैनिक महाविहारात शिरताना त्यांना दिसले.
 
 
दुसरा स्रोत आहे मिनहाज-ए-सिराज याने लिहिलेला ‘तबकात-ए-नासिरी’ हा ग्रंथ. 13 व्या शतकातील या ग्रंथात तुर्की आक्रमणकर्त्यांनी केलेल्या नालंदाच्या विध्वंसाचे वर्णन आढळते. त्याने (बख्तियार खिलजी) बिहारच्या तटबंदीवर असलेल्या शहरावर (नालंदा) हल्ला केला आणि प्रचंड लुटालूट केली. त्याने दोनशे घोडेस्वारांसह बिहारच्या किल्याच्या प्रवेशद्वारावर धडक मारली आणि अचानक हल्ला केला. त्या ठिकाणचे बहुसंख्य रहिवासी ब्राह्मण होते आणि ते सर्वच्या सर्व मारले गेले. तेथे मोठ्या संख्येत पुस्तके होती आणि जेव्हा ही सर्व पुस्तके मुसलमानांच्या ताब्यात आली तेव्हा त्यांनी हिंदूंना बोलावले जेणेकरून त्यांना त्या पुस्तकांसंबंधी माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व हिंदू ठार झाले होते.
 
 
नालंदाचे उत्खनन
बख्तियार खिलजीच्या आक्रमणानंतर Nalanda University नालंदा हळूहळू विस्मृतीत गेले. तब्बल सात शतके ते खोल अंधारात बुडून राहिले आणि त्याच्या भग्नावशेषांवर मातीचा एक मोठा ढिगारा तयार झाला. 1811-12 मध्ये स्कॉटिश शल्यचिकित्सक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन याने या स्थळाचे (साईट) सर्वेक्षण केले. तथापि हे नालंदाचे भग्नावशेष आहेत हे सिद्ध करण्यात फ्रान्सिस बुकानन यांना अपयश आले. मात्र मेजर मार्कहम किट्टो यांनी 1847 मध्ये सर्वप्रथम ही बाब सिद्ध केली. 1861-62 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने नालंदाचे अधिकृत सर्वेक्षण केले. पण नालंदाला आपल्या उद्धारासाठी 1915 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली, जी 1937 मध्ये संपली.
 
 
गतवैभव पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न
Nalanda University : नालंदाचे वैभव पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने आणि पाली, बौद्ध तत्त्वज्ञान, संस्कृती, इतिहास इत्यादी विषयांवर सखोल अध्ययन आणि संशोधन करण्यासाठी, बिहार सरकारच्या सहकार्याने 1951 मध्ये येथे ‘नवनालंदा महाविहार’ ची स्थापना करण्यात आली. 28 मार्च 2006 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनासाठी बिहार विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ही कल्पना मांडली. पुढील वर्षी बिहार विधानसभेने एका नवीन विद्यापीठाच्या निर्मितीसाठी विधेयक मंजूर केले.21 ऑगस्ट 2010 रोजी राज्यसभेत आणि 26 ऑगस्ट 2010 रोजी लोकसभेत नालंदा विद्यापीठ विधेयक-2010 मंजूर करण्यात आले. या विधेयकाला 21 सप्टेंबर 2010 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले. 25 नोव्हेंबर 2010 रोजी कायदा लागू होताच विद्यापीठ अस्तित्वात आले. याला 18 देशांनी पाठिंबा दिला. हे सगळे देश नालंदा विद्यापीठात गुंतवणूक करण्यास उत्सुक होते. नालंदा विद्यापीठात 2014 पासून प्रवेश सुरू झाले आहेत. या विद्यापीठाला आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु सरकारचा हा प्रयत्न भारताच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे, अशी आशा करायला हरकत नाही. 
 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार आहेत)