कुटुंब नियोजनात वर्धा राज्यात चौथा

    दिनांक :17-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Family planning : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. पण, अजूनही या शस्त्रक्रियेबाबत समाजात अनेक गैरसमज कायम आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शासन व प्रशासन स्तरावर व्यापक जनजागृतीही केली जाते. वर्धा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उद्दीष्टाच्या तुलनेत तब्बल 145 टक्के कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्याने वर्धा राज्यात सध्या चौथ्या स्थानी आहे.
 
 
FAM
 
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्याला 5 हजार 640 कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसंदर्भात उद्दिष्ट प्राप्त होताच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गावपातळीवर प्रभावी जनजागृतीचे सर्वप्रथम सूक्ष्म नियोजन केले. शिवाय छोटे कुटुंब सुखी कुटुंब असे याबाबतची सविस्तर माहिती ग्रामीण व शहरी भागातील दाम्पत्यांना देत वेळीच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया महिला किंवा पुरुषाने करावी, असे आवाहन केले. आरोग्य विभागाच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत 2023-24 या वर्षात जिल्ह्यात तब्बल 8 हजार 205 व्यक्तींनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया स्वयंस्फूर्तीने करून घेतली. त्याची उद्दिष्टाच्या तुलनेत टक्केवारी तब्बल 145 इतकी असून याच कर्तुत्त्वाच्या जोरावर सध्या वर्धा राज्यात चौथ्या स्थानी असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, 2023-24 मध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणार्‍यांत तब्बल 37 पुरुषांचा समावेश होता.
 
 
राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न : जिल्हा आरोग्य अधिकारी
 
 
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत वर्धा राज्यात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. वर्धा राज्यात प्रथम स्थानी कसा येईल, यासाठी आणखी प्रयत्न नक्कीच केले जातील. नागरिकांनीही कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत कुठलीही शंका मनात बाळगू नये. शंका असल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात जात वैद्यकीय अधिकार्‍यांकडून शंकांचे समाधान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांनी केले.