महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संपूर्ण राज्यात 300 केंद्रावर Computer Typing Test संगणक टंकलेखनाची परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. याकरिता काही खास महाविद्यालयांची निवड केली जाते. पण तिथे गेल्यावर परीक्षार्थींना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा परीक्षार्थी जाणीवपूर्वक समस्या निर्माण करतात. यावर आळा बसावा म्हणून उमेदवार ज्या संस्थेत शिकणार तिथेच त्यांची टंकलेखनासह लघुलेखनाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पहिल्यांदाच हा नवा प्रयोग घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Computer Typing Test : टंकलेखन व लघुलेखन परीक्षा घेण्यासाठी आतापर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, सीईटी केंद्राची निवड केली जायची. पण या केंद्रावर नीट, जेईई, सीईटी, भरती परीक्षा घेतल्या जातात. यामुळे संगणक टंकलेखन परीक्षेसाठी केंद्र मिळणे अवघड जायचे. अनेकदा ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीही परीषदेवर यायची. शिवाय काही विद्यार्थ्यांकडून जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जायच्या. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांची नाहक बदनामी व्हायची. त्यामुळे ते महाविद्यालय पुढील काळात परीक्षा केंद्रासाठी नकार द्यायचे. यासर्व घटनाक्रमांकाचा आढावा घेता जिथे प्रशिक्षणार्थी शिकणार त्याच संस्थेत काही अटींचे पालन करीत परीक्षा केंद्र ठेवण्याचा प्रयोग आता होणार आहे. शेवटी, टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेविषयी परिषदेने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणाराच ठरेल. यातून मुलांच्या अडचणी दूर होतील. परीक्षा केंद्र मिळवताना उद्भवणार्या समस्याही यातून संपुष्टात येतील. यामुळे हा निर्णय धाडसी आणि लाखों विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल.