अमरावती,
murder of youth : शहरातल्या केडीया नगर येथील उद्यानासमोर युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री बारा वाजताचे सुमारास घडली. रोहीत अमोल मांडळे (२१) असे मृतक युवकाचे नाव आहे.
रोहीत हा केडीया नगर येथील शीतला माता मंदिराजवळील रहीवासी आहे. तो पुणे येथे खाजगी नोकरी करीत होता. शुक्रवारी त्याचा लहान भाऊ नयन मांडळे याचा वाढदिवस असल्याने तो अमरावतीला आला होता. उद्यानात केक कापण्यात येत होता. यावेळी रोहीत प्रवेशद्वारासमोर उभा होता. दरम्यानच एका कारने त्याला जोरदार धडक दिली. तो कोसळला. कारमधून पाच ते सहा जण उतरले. त्यांनी रोहीतवर जोरदार हल्ला चढविला. त्याच्यावर लोखंडी सळाखीने वार करण्यात आले. दगडाने प्रहार करण्यात आले. हा प्रकार नयन मांडळे याच्या लक्षात येताच त्यांनी बचावाचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोरांजवळ धारदार शस्त्रे असल्याने त्याने आरडाओरड केली.
हल्लेखोर लगेच कारमध्ये बसून पसार झाले. या घटनेनंतर रोहीतला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी नयन मांडळे याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी भूषण वाटकर (२४), नितीन इंगोले (२०), सोनू झांझोटे (२१), यश काटे (२३) यांच्यासह एका विधीसंघर्षीत बालकास अटक केली आहे. प्रकरणातील अन्य एक आरोपी पसार आहेत. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
//मृतकासोबत जुना वाद
काही वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हत्याकांडात मृतक रोहीत मांडळे हा आरोपी होता. कारागृहातून सुटल्यानंतर तो पुणे येथे नोकरीसाठी गेला. रोहीतवर हल्लेखोरांपैकी काही राष्ट्रीय महामार्गावरील हत्या झालेल्या त्या मृतकाचे मित्र होते. त्यामुळे हल्लेखोर रोहीत मांडळे याचा वचपा काढण्यासाठी तयार होते. तो अमरावतीला आला असल्याची माहीती मिळताच गुरुवारी रात्री त्याच्यावर हल्ला चढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.