निराधार नंदाताईला अखेरचा निरोप

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
यवतमाळ, 
आयुष्याने दिलेल्या वेदनांचे जेव्हा स्मरण व्हायचे तेव्हा त्यातून येणारे शल्य सोसण्यापेक्षा मरण आलेले बरे. या विवंचनेतून दिग्रसच्या Nanda Tai नंदाताईंनी अन्नत्याग केला आणि शेवटपर्यंत साथ दिलेल्या आपल्या बहिणीच्या कुशीत जीव सोडला. मन हेलावून टाकणारी ही घटना नंददीप मनोरुग्ण निवारा केंद्रात गुरुवार, 18 जुलैला घडली.
 
 
y20July-Nandatai
 
नंदा दिगंबर भलगे (वय 60) आणि धाकटी कमला या दोघेही दिग्रसच्या हॉटेल व्यवसायीच्या मुली. दिग्रसमध्ये या त्यांना सर्वजण ओळखायचे. परंतु, नियतीने त्यांची क्रूर थट्टा केली. दोन्ही बहिणींना जोडीदारांकडून असह्य छळ भोगावा लागत होता. त्रस्त होऊन त्यांनी मुलंबाळं होऊ न देता आपला संसार मोडला. वडील असेपर्यंत त्यांना मोठा आधार होता. परंतु त्यांच्यानंतर त्या एकाकी पडल्या. नातलगांनी आधार देण्याऐवजी त्यांना बेदखल केले. शेवटी धुणीभांडी करून त्या बहिणी फूटपाथवर आयुष्य काढत होत्या. याच ठिकाणी एकेकाळी त्यांच्या वडिलांचे हॉटेलसुद्धा होते.
 
 
Nanda Tai : जगण्यासाठीची त्यांची केविलवाणी धडपड माजी नगरसेवक अजिंक्य म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते केतन रत्नपारखी, राजू भट, मिलिंद मोरे, राजू जाधव हे सुरुवातीपासूनच पाहत होते. या मंडळींनी संवेदनशीलतेने दोघींचेही पालकत्व स्वीकारले, त्यांना आधार दिला. परंतु, हे वेदनादायी जीवन संपवण्याचा पक्का निर्धार करत नंदाताईंनी अन्नत्याग केला. प्रकृती खालावल्याने त्यांना 7 जुलैला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
 
 
मनोवैद्यक डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी या दोन्ही बहिणींची माहिती यवतमाळच्या नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र संचालक संदीप शिंदे यांना दिली. य्यांनी लगेचच त्यांना आपल्या केंद्रात दाखल केले. या ठिकाणी तातडीने डॉ. प्रवीण राखुंडे यांनी त्यांची तपासणी करून सलाईन चढविले. पण अन्न व औषध ग्रहण न करण्याचा त्यांचा इरादा पक्का होता. त्यामुळेच अखेर 18 जुलैच्या सकाळी 11 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. तिच्या मृत्यूचा जबर आघात बसलेल्या बहीण कमलाच्या आग्रहामुळे दिग्रस येथे नेऊन नंदाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.