रत्नागिरी,
Konkan Marathi News : मागील काही दिवसांपासून कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी अधिकच वाढला. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरले आहे. चिपळूण आणि खेडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळपासून कोसळणार्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. खेड-दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीलाही पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. सध्या जगबुडी नदी 9 मीटर पातळीच्या खालून वाहत असली तरी, पावसाचा जोर कायम असल्याने खेड शहरावर पुराची टांगती तलवार आहे.
चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. वशिष्ठी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मात्र, सध्या समुद्राला भरती असल्यामुळे चिपळूण शहरातील नाईक कंपनी परिसरात वशिष्ठी नदीचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर कमी असला तरी सह्याद्री पट्ट्यात पाऊस असल्याने वशिष्ठी नदीला पूर आला आहे.
रायगडच्या कुंडलिका नदीला पूर
कालपासून कोकणासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रोहा येथील कुंडलिका नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचे पात्र फुगले
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, अनेक नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. खेड तसेच राजापूरच्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.