- प्रेमप्रकरणाच्या त्रिकुटाची शक्यता
वर्धा,
murder सावंगी मेघे रुग्णालयात एएनएमच्या दुसर्या वर्षाला शिकत असलेल्या मुलीच्या वाढदिवशीच तिच्या प्रियकराचा खून करण्यात आल्याची घटना 21 रोजी मध्यरात्री 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास सावंगी मेघे परिसरातील साईपार्क येथे घडली. या हल्ल्यात प्रेयसी सुद्धा गंभीर जखमी असून तिच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहित मोहर्ले (28) रा. मोरवा पडोली जि. चंद्रपूर असे मृतकाचे तर प्रवीण सोनटक्के असे मारेकर्याचे नाव असून त्याला आज सोमवार 22 रोजी अटक केली आहे.
murder मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मुलगी सावंगी येथे एएनएमच्या दुसर्या वर्षाला शिकत आहे. मैत्रिणीसोबत ती साईपार्क ड्रिम लॅण्ड सिटी सावंगी (मेघे) येथे राहते. रविवार 21 रोजी तिचा वाढदिवस असल्याने प्रियकर मोहित मोहर्ले हा तिच्या खोलीवर आला होता. रात्री उशिरापर्यंत मोहित तिच्याच खोलीवर होता. याची कुणकुण लागताच प्रवीण सोनटक्के हा घटनास्थळी पोहचला. प्रेयसी आणि प्रियकर दोघेही संशयास्पद स्थितीत आढळून येताच मोहित आणि प्रवीण यांच्यात वाद झाला. संतापलेल्या प्रवीणने लोखंडी रॉडने मोहितला जबर मारहाण केली. यात मोहितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रवीण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीवरही रॉडने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोहित व मुलीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मोहितला मृत घोषित केले तर गंभीर जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी तपासाला गती देत प्रवीण सोनटक्के याला अटक केली आहे. त्रिकुट प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर करीत आहेत.