माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा शरद पवार गटात प्रवेश

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
मुंबई, 
विधान परिषदेचे माजी आमदार Babajani Durrani बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करीत शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत राजेश टोपेंच्या हस्ते दुर्राणी यांचा प्रवेश झाला. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शरद पवार स्वतः उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला. विधानसभा सदस्यांद्वारे 28 जुलै 2018 रोजी विधान परिषदेवर निवडून गेलेले 11 सदस्य 27 जुलै रोजी निवृत्त झाले. या जागांसाठीची निवडणूक 12 जुलै रोजी पार पडली.
 
 
Babajani Durrani
 
यात महायुतीचे 9 तर, महविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. निवृत्त होणार्‍या 11 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सदस्य बाबाजानी दुर्राणी यांचा समावेश आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा आल्या होत्या. त्यामुळे दुर्राणी यांना पुन्हा संधी देऊन, नव्या एकाला विधान परिषदेवर पाठविता आले असते. किंबहुना अशीच अपेक्षा दुर्राणी यांची होती. मात्र, पक्षप्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेश विटेकर व शिवाजीराव गरजे या नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या दुर्राणी यांनी पुन्हा शरद पवारांचा हात पकडण्याचा निर्णय घेतला.
 
 
शुक्रवारी रात्री शरद पवारांची भेट घेतली आणि शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रवेश केला. यावेळी Babajani Durrani दुर्राणी यांनी कुछ तो मजबुरीयाँ रही होगी, वरना कोई यू बेवफा नही होता, असा शेर म्हणत आपण 1985 पासून शरद पवारांसोबतच काम केले असून, यापुढे सोबत काम करणार असल्याची ग्वाही दिली.