मंगरुळनाथ,
धान्य वितरणामध्ये आधार सर्व्हर E Pass machine सुरु करून द्यावे तसेच माहे जुलै २४ करिता धान्य वितरणाची मुदत वाढ करून द्यावी, या मागणीसाठी येथील रास्त भाव दुकानदाराकडून शासनास तहसीलदारामार्फत निवेदन पाठविण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, तालुक्यातील सर्वच दुकानदारांना धान्य वितरीत करताना सर्व्हर व ई पॉस मशीनमध्ये अडथळा होत आहे. ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन या देशपातळीवरील संघटोच्या वतीने रास्त भाव दुकानदारांच्या धान्य वाटप करण्याकरिता येणारे आधार सर्वर प्रॉब्लेम लवकर सुरळीत करून माहे जुलै २४ धान्य वाटपकरिता मुदत वाढ देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन दुकानदारांना मिळालेल्या ई-पॉस मशीनमध्ये विविध स्वरूपातील अडथळे निर्माण होत आहेत. E Pass machine त्यामुळे धान्य वितरण प्रक्रिया ठप्प होऊन गरजूंना धान्य मिळेनासे झाले आहे. या समस्येमुळे रेशन दुकानदारही हवालदील झाले असून दुकानदारांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून होत असलेल्या अडचणी मांडून प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. दुकानांना दोन महिन्यांपूर्वी ’५-जी’ नेटवर्क असणार्या ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. नवीन मशीनमुळे धान्य वितरण जलद गतीने होईल, अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदार बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. याउलट चालू महिन्यात वारंवार आधार सर्व्हर ठप्प होऊन ई-पॉस मशीन बंद राहत आहे. त्यामुळे रेशनधारकांना धान्य वितरण करणे अशक्य होत आहे. मागील दहा दिवसांपासून ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. या त्रासाला कंटाळून तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुधाकर चौधरी, निलेश पाटील, सुधाकर नामदेव भोगले, एस. एम. डोंगरे, पेंढारकर व आदी धान्य दुकानदारांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.