मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
- अजित पवारांची विधानसभेत चौफेर फटकेबाजी

मुंबई, 
दुसर्‍या कोणाच्या नेतृत्वात हाताखाली काम करीत असताना सगळं तिथे ढकलावे लागते. त्यांनी केले, मी कुठे काही केले, असे म्हणावे लागते. पण, मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो, अशा शब्दांत अर्थमंत्री Ajit Pawar अजित पवारांनी विधानसभेत मिश्कील टिप्पणी केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
 
 
Ajit Pawar
 
अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली. या चर्चेवर शुक्रवारी अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. अजित पवार उत्तर देत असताना विरोधी बाकांवरून शेरेबाजी केली जात होती. अजित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिले. विरोधात बसलेल्या जयंत पाटील यांनी नऊवेळा अर्थसंकल्प मांडला आहे. पण, मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला इतरांइतका अनुभव नसला तरी, थोडाफार नक्कीच आहे. आधी मला महाविकास आघाडीने अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली, आता महायुतीकडून मला संधी देण्यात आली. मी एक गोष्ट पाहिली की, मविआकडून अर्थसंकल्प मांडला, तेव्हा महायुतीकडून विरोध व्हायचा. आता महायुतीकडून अर्थसंकल्प मांडला, तर मविआकडून विरोध होत आहे. हरकत नाही. तो मनुष्यस्वभाव आहे, असे चिमटा त्यांनी काढला.
एवढं लक्षात ठेवा...
अर्थसंकल्पावर चर्चा करताना जयंत पाटील यांनी विंदाच्या कवितेचा उल्लेख केला. त्यामुळे मलाही विंदाची कविता वाचण्याचा मोह आवरत नाही. मी एक कविता वाचून दाखवतो, असे म्हणत Ajit Pawar अजित पवारांनी...
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा॥
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा॥
ही कविता सभागृहात सादर करत जयंत पाटलावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.