विजयी मिरवणुकीत दुखापत 11 चाहते रुग्णालयात दाखल

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
मुंबई, 
T-20 World Cup : दक्षिण मुंबईत टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींची गर्दी उसळल्यामुळे काहींना किरकोळ दुखापती झाल्या तसेच काहींना चक्कर आली. त्यामुळे 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका अधिकार्‍याने शुक्रवारी सांगितले.
 
 
T-20 World Cup
 
जास्त गर्दीमुळे जखमी झालेल्या किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे नऊ जणांना सरकारी जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या अधिष्ठातांनी सांगितले. एका चाहत्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. आणखी एका व्यक्तीला दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले व उपचारानंतर सुटी देण्यात आली.
 
 
 
T-20 World Cup : गुरुवारी सायंकाळी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीचे साक्षीदार होण्यासाठी लाखो चाहत्यांनी मरिन ड्राईव्हवर गर्दी केली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, असे अधिकार्‍याने सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात केले होते. विजयी मिरवणुकीदरम्यान गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन केल्याबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आपल्या पोलिस विभागाचे कौतुक केले.