मुख्यमंत्र्यांनी खिशातून 11 कोटी रुपये द्यावे

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
- क्रिकेटपटूंना बक्षीस देण्यावरून आरोप
- भाजपाने दिले जोरदार प्रत्युत्तर
 
मुंबई, 
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने T-20 World Cup टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला 11 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याच्या घोषणेवर विरोधी पक्ष काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि सरकारला आपली पाठ थोपवून घ्यायची आहे, असा आरोप केला. विरोधी पक्षांनी सांगितले की, त्यांना क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा अभिमान वाटत असताना, राज्याच्या तिजोरीतून 11 कोटी रुपये देण्याची गरज नाही. हवे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून रक्कम द्यावी.
 
 
T-20 World Cup 1
 
काँग्रेसने केलेल्या टीकेवर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पलटवार करीत म्हटले की, काँग्रेस या प्रकरणाचे राजकारण करत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी T-20 World Cup टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, खेळाडू सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा विधान भवनात गौरव केला आणि तेथे 11 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या तिजोरीतून 11 कोटी देण्याची काय गरज होती? त्यांना आपलीच पाठ थोपटून घ्यायची आहे. तिजोरी रिकामी होऊ द्या. गरिबांना मरू द्या.
 
 
उबाठा गटाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राज्याच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती. प्रत्येकाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे आणि त्यांना पुरेशी बक्षीस रक्कम मिळते. एवढेच होते तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून 11 कोटी रुपये द्यायला हवे होते.
 
 
शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाचे आमदार दरेकर म्हणाले, विजय वडेट्टीवार यांची मानसिकता विकृत आणि उथळ आहे. T-20 World Cup टी-20 पुरुष संघाने विश्वचषक जिंकल्याने संपूर्ण देश आनंदित झाला आहे आणि प्रत्येक जण आनंदी आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्हवर क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. पण, वडेट्टीवार यांना या कार्यक्रमाचेही राजकारण करायचे आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.