- स्वाती पेशवे
Ashadha Heavy rain यंदा अतितीव्र झळांनी भाजून काढणारा उन्हाळा अनुभवत असतानाच काहीसा लवकर दाखल झालेला मान्सून सर्वांना सुखावून गेला. केवळ शेतकर्यांनीच नव्हे तर पाण्यासाठी वणवण फिरणार्या महिलांपासून दिवसभर अंगावर एसीचे वारे घेत राबणार्या कॉर्पोरेट कामगारांपर्यंत सर्वांनाच पाऊस येण्याची सुवार्ता आशादायी वाटली. त्यातच यंदाचा मान्सून सरासरीइतका राहणार असल्याचे भाकीतही आशाची पालवी प्रफुल्लित ठेवणारे ठरले. असे असले तरी पावसाळ्यातील पहिल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये पावसाने काही ठिकाणी मासिक सरासरी ओलांडली. मात्र त्याचे प्रमाण काही उपकारक राहिले नाही. म्हणजेच काही शहरांमध्ये एकाच दिवशी तो घनघोर बरसला आणि पावसाळी कामे चोख पार पाडल्याचे आश्वासन देणार्या पालिकेचे पितळ उघडे पाडून, गटारे तुंबवून, रस्त्यांचे ओढे करून घाईघाईत निघूनही गेला. त्यानंतर पुन्हा एकदा असह्य उकाड्याने हैराण होण्यातच आपले दिवस गेले. आता पावसाची झड असणारा आषाढ सुरू झाला आहे. त्यामुळेच हा ओलाकंच महिना उत्तम पावसाचा असेल, अशी आशा करायला हरकत नाही.
भरगच्च हिरवेपणा, संततधार, पाय पडला तर घसरण्याची भीती वाटावे इतक्या प्रमाणात साठलेले शेवाळे, चार-चार दिवस सुकवले तरी ओलसर राहणारे कपडे, साचलेपणाचा तो समृद्ध सुवास हीच तर आषाढाची खरी ओळख आहे. आषाढात पाऊस लयदार तरीही बेफाम असतो. त्या कोसळधारांमध्ये सातत्य असते. त्याचे आगळे देखणेपण असतो. सूर्यकिरणांची वाट अडवण्याची, आसमंतावर ओलेती झिलाई निर्माण करण्याचे, जमिनीतील रिते जलकुंभ काठोकाठ भरवून टाकण्याचे, प्रवाहमार्ग प्रवाहित करण्याचे, धबधब्यांना अनिवार ओढीने दरीत उडी घेण्यास भाग पाडण्याचे कसब आणि ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच आषाढातला पाऊस दमदार भासतो. त्याचा आवेग अनुभवण्याजोगा असतो. उडत्या पक्ष्यांना आणि हुंदडणार्या पशूंनाही चिडीचूप होत आडोसा शोधायला लावण्याचे सामर्थ्य त्याच्या दिमाखदार कोसळण्यात असते. तीदेखील निमूट त्याचा आदेश पाळतात आणि आधीच बांधून ठेवलेल्या घरट्यांमध्ये वा शोधलेल्या आडोशामध्ये आसरा घेत बाहेरचे जलसुक्त शांतपणे ऐकत राहतात. खरे सांगायचे तर आषाढातल्या अतिवृष्टीत वेडे धाडस करणार्या अतिउत्साही पर्यटकांनी त्यांच्यापासून तरी धडा घेणे गरजेचे आहे.
Ashadha Heavy rain : एकंदरच हा ओलाचिंब महिना येणार्या समृद्धीची पेरणी करणारा असतो. शेतशिवारात पेरलेलं बी-बियाणं रुजण्यासाठी आभाळीच्या जलधारांचं सिंचन कामी येत असतं. या काळ्या आईच्या अंगावरील मुरमाड भेगाळलेपण कमी होत असल्याने जीव भांड्यात पडलेला असतो. बहरू पाहणार्या या ऋतुपर्वात भक्तीला धुमारे फुटले नाहीत तरच नवल! दुसरीकडे याचीही सज्जता सुरू असते. गावोगावीचे वारकरी भागवत धर्माची पताका नाचवत आनंदाने पंढरीच्या वाटेवर चालत असतात. असंख्य भक्तगणांनी उच्चारवात केलेला हा विठूचा जागर आपल्याही मनात घुमत असतो. एक प्रकारे ही सणांच्या आगमनाची सज्जताच असते. दरवर्षी याच भारलेपणाने आषाढ साजरा होतो.
Ashadha Heavy rain : पावसाच्या एका सरीमध्ये आधीच्या सगळ्या व्यथा-वेदना विसरायला लावण्याचं सामर्थ्य असतं हे आपण अनुभवलेलं आहे. म्हणूनच ग्रीष्मातल्या तलखीवर पावसाची हळुवार फुंकर पडताच आपण सगळे कष्ट विसरतो. एका अर्थाने पाहता दु:स्वप्न न उगाळण्याची ऊर्मी आपल्याला आषाढाच्या स्वागतासाठी सिद्ध करते. मग या आनंदापोटीच कुठे सामिष भोजनाचे बेत रंगू लागतात. येणार्या चातुर्मासात या आनंदाला मुकावं लागणार, या जाणिवेने बेचैन झालेले लोक आषाढात मनसोक्त ‘खाण्या-पिण्या’ची चैन भागवून येतात. पाहुणे-राऊळे बोलावून जेवणाचे कार्यक्रम पार पडतात. घरात खमंग आषाढ तळला जातो. बाहेरच्या चिंब वातावरणात भजी, तळण अथवा आषाढात तळले जाणारे खास गोड पदार्थ लज्जत वाढवतात. ऋतू कूस पालटताना घरोघरी साजरे होणारे हे मनभावन सोहळे... नेहमीप्रमाणे ते यंदाही साजरे होतील. तोच उत्साह आणि आनंद झरझर बरसताना दिसेल. पण आता आपल्या विचारांची आणि कृतीची व्याप्ती थोडी वाढवायला हवी. ‘भोगातून योगाकडे’ या उक्तीप्रमाणे आषाढात मनसोक्त खात-पीत असतानाच बरसणार्या या जलधारा संचित करण्याचे उपाय शोधायला हवेत. पाऊस बरसत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्याचा संकल्प करून प्रत्येकाने आषाढ साजरा करायला हवा.
Ashadha Heavy rain : माणूस मुळात उत्सवप्रिय आहे. त्याला निसर्गाची साथ लाभली तर आनंदाचं भरतं आल्याशिवाय राहात नाही. एवढी प्रचंड लोकशक्ती एका सुरात आनंदगीत गाताना बघणं हा अवर्णनीय आनंद आहे, यात शंका नाही. पण बदलत्या परिस्थितीत व्यक्तिगत सुखाला मागे सारून सामूहिक सुख-समाधानावर लक्ष केंद्रित करायला हवं. भीषण दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर पुढे अशा विनाशवेळा टाळता याव्यात, यासाठी अनेक ठिकाणी जलयुक्त शिवारांचे कार्यक्रम राबविले गेले. गावतळी बांधली गेली. काहींनी सिंचनाच्या वेगळ्या पद्धती राबवून पाणी जपून वापरण्याचे उपक्रम हाती घेतले. बर्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम साजरे झाले. या सर्व योजना जवळून बघण्याचे, त्यात सहभागी होऊन आपली जबाबदारी उचलण्याचे, न पेक्षा या योजना जाणून घेण्याचे हेच दिवस आहेत. या कार्यक्रम आणि उपक्रमांपासून धडा घेत आपण आपल्या परिसरात, गृहसंकुलामध्ये त्यातील काही फायदेशीर उपक्रमांची अंमलबजावणी करू शकतो. सगळीकडे दुष्काळाचा प्रकोप अनुभवायला मिळत असतो. काही द्रष्ट्या लोकांनी राहत्या घरात पावसाचे पाणी साठवणारा एक हौद बांधला आणि दोन पावसातच त्यांना पुढचे 24 महिने पुरेल इतकं पाणी मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. वर्षाविहाराचे कार्यक्रम आखताना एखाद वेळी अशा स्वागतार्ह उपक्रमांचा मागोवा घेणंही उपकारक ठरेल. घटत चाललेल्या जंगलांमुळे दुष्काळाची भीषणता वाढते हे सत्य आहे. म्हणूनच पडत्या पावसात आरडाओरडा करत, अंगविक्षेप करून नाचून आनंद व्यक्त करण्यापेक्षा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये कृतिशील सहभाग नोंदवत आपण निसर्गाचा हा भरलेला दरबार अधिक समृद्ध करू शकतो. आषाढ साजरीकरणाचं हे नवं स्वरूप आपल्याला आनंद देईलच; शिवाय काही तरी भरीव योगदान दिल्याची भावनाही संतुष्टता वाढवेल.
Ashadha Heavy rain : कवी कालिदासाने आपल्या अजरामर काव्यामध्ये आषाढाच्या मेघालाच प्रियेपर्यंत सांगावा पोहोचवण्याचं साकडं घातलं आहे. तो मेघाला आपल्या प्रियेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगतो. हा ‘जलद’ आपल्या मनाची तगमग, आर्तता, आवेग, विरहव्याकुळता सर्व काही जाणेल असा विश्वास या कविराजाला आहे. आजही आषाढाच्या प्रथम दिवशी त्याच्या या तरल भावनांचा सन्मान केला जातो. त्याच्या काव्यप्रतिभेचा सन्मान केला जातो. एका व्यक्तीची आर्तता आणि विव्हळता जाणून घेणारा हा मेघ यावेळी अगदी आपला वाटतो. कवी कालिदासाचंच नव्हे तर आपल्या प्रत्येकाचं आषाढातल्या या गच्च जलदांशी अतूट नातं आहे. एरवी निळाशार दिसणारा हा डोईवरचा डोंब या दिवसात श्यामवर्णी होऊन जातो. त्यांचं ते गच्च आवरण चराचराला कवेत घेऊ पाहतं. संथ आणि शांत गतीने या मेघांमधून बरसणार्या जलधारा अमृतसिंचन करतात. अशा या नादमधूर वातावरणात पानापानांतून मल्हाराची धून ऐकू येऊ लागते. डोंगरदर्यांमध्ये कोसळणारा, माळरानावर बरसणारा, कौलांमधून ठिबकणारा, पन्हाळीतून झेपावणारा... पावसाची ही रूपं डोळा भरून पाहावीशी वाटतात. हा सोहळा अनुपम आहे, मनोहर आहे, सर्जनशील आहे. हा मेघ तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी धावून आला आहे. त्याच्या काळ्या छायेत उद्याची तेजोशलाका दडली आहे. चला, त्याचं स्वागत करू या. घनघोर बरसणारा आषाढ मनसोक्त अनुभवू या. एकदा का या लोण्यासारख्या चिखलात पावलं भिजली की मनात आपोआप मांगल्याची कमळं फुलू लागतील आणि सृष्टीबरोबर मनाचा गाभाराही प्रसन्न होईल.