पंढरीची वारी आहे माझे घरी ।आणिक न करी तीर्थ व्रत ॥

    दिनांक :07-Jul-2024
Total Views |
संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
आषाढ महिन्यामध्ये येणारी आषाढी एकादशी ही जणू वारकर्‍यांना पंढरीला येण्यासाठी खुणावत असते.
 
पांडुरंगाच्या भेटीची तळमळ
Pandhari Vari : साक्षात पांडुरंग त्यांच्यासाठी वाट पाहत असतो. त्या प्राणप्रिय विठुरायाच्या भेटीला जाण्यासाठी वारकरीही तळमळत असतात. आपल्या गावापासून निघालेल्या प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी समाविष्ट झालेला आहे. चालताना पायाच्या वेदना त्याला कधी आठवत नाहीत. घरची आठवण येत नाही. प्रामुख्याने शेतकरी असलेला हा वारकरी शेतामध्ये पेरलेलं पीक कसे आहे, याचीही त्याला काळजी नाही. तो सर्व भार त्या पांडुरंगावर टाकून प्राणसख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी अतिशय उत्साहाने निघालेला आहे.
 

wari 
 
प्रत्येकाला तो बोलवत आहे आणि सांगत आहे-
या रे नाचू प्रेमानंदे । विठ्ठल नामाचीया छंदे ॥
Pandhari Vari : मुखामध्ये ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली, ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी वासुदेव हरी, गण गण गणात बोते हे सर्व त्याचे शक्तीचे मंत्र आहेत. प्रत्येक पावलागणीक तो हा मंत्र म्हणत असतो आणि पुढे चालत असतो. शास्त्रकार असे सांगतात, मुखामध्ये रामाचं नाम असेल आणि तुम्ही पायी वारी करत असाल तर तुमच्या पावलागणीक यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला लाभते. तो पुण्याचा ठेवा सोबत घेऊन तो पुढचे मार्गक्रमण करीत असतो. कारण त्याला विठ्ठलाने सांगितलेले आहे.
 
 
 
 
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगत असे गुज पांडुरंग ॥
पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ॥
आषाढ महिन्यामध्ये येणारी पंढरीची वारी हे प्रत्येक व्रतधारी वारकर्‍यासाठी एक मोक्षाची पर्वणी आहे. वर्षभरामध्ये आपल्या संसारामध्ये कार्यरत असणारा हा वारकरी वर्षाच्या या आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाला भेटायला जाण्यासाठी पंढरीची वारी करतो. आपल्या मायबाप विठ्ठलाला भेटण्यासाठी अतिशय आतूर होत असतो. आपलं क्षेमकुशल त्याला सांगावं, आपला संसार त्याच्या पायावर ठेवावा, हा भाव त्याच्या मनामध्ये असतो आणि निश्चय करतो की,
‘पंढरीची वाटे संतचरणी लागेन।
जन्मांतरीच्या पुण्य राशी । वारी त्यासी पंढरीची ॥’
असा भाव त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्याला आपल्या जीवनाची धन्यता आषाढी कार्तिकी वारीमध्ये वाटते. खरं म्हणजे वारी हा एक अध्यात्म उत्सव सोहळा आहे. खूप मोठी सामाजिक व आध्यात्मिक चळवळ होत आहे. अवघ्या महाराष्ट्रातील संत मांदियाळी यांच्या दिंड्या पंढरीच्या वाटेने निघालेल्या आहेत.
 
 
मानसिक वारी
Pandhari Vari : बुधवार, 17 जुलैला हा आषाढी एकादशी सोहळा पंढरपुरामध्ये भक्तांना सोबत घेऊन साजरा होणार आहे. हे जरी सत्य असले, तरी प्रत्येक वारकरी जो आपल्या कामाच्या व्यापामुळे, आपल्या संसारातील तापत्रयामध्ये गुंतला असल्याने पंढरपूरला जाऊ शकत नाही. परंतु, मनामध्ये विठ्ठलाबद्दल निरंतर ओढ असल्याने विठ्ठलाचा निस्सीम भक्त आहे. त्याची मानसिक वारी ही घरीच निश्चितपणे होऊ शकते. तो आपल्या आई-वडिलांना नमस्कार करून त्यांना प्रदक्षिणा घालून आणि त्यांची सेवा, त्यांचे स्वप्न पूर्ण करून तो पंढरीची वारी निश्चितपणे करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आपण ठरविले आणि दृष्टीमध्ये साठवले की, मी त्या ठिकाणी मनाने पोहोचलो आहोत, तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पोहोचण्याची अनुभूती आपल्याला येऊ शकते. संतांनी मानसिक पूजेला महत्त्व दिलेले आहे.
मनोमार्गे गेला तो तेथे मुकला।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य॥
आपण या मानसिक वारीच्या प्रीत्यर्थ आपल्या अंगणामध्ये एक झाड लावून आणि त्यालाच विठ्ठल संबोधून त्याची मनोभावे पूजा करावी आणि त्याला आपल्या जीवनाचा सुख-दुःख नित्यनियमाने जलाभिषेक अर्पण करावे. त्याला जगवावे आणि आगळी-वेगळी विठ्ठलाची मूर्ती सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवावी आणि त्याची आठवण ठेवावी की, जेव्हा मी प्रत्यक्ष पंढरीला पोहोचू शकलो नाही, पण त्या पंढरीचा विठ्ठल मी या वृक्षांमध्ये माझ्या घरातच स्थापन केला आहे.
 
 
वृक्ष हे विठ्ठलाचे रूप
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥ पर्यावरणसाठी शुद्ध हवा, निरामय आरोग्य प्रत्येकाला प्रदान करेल. आज ती काळाची गरज आहे. कोरोनासारख्या महामारीने या जगाला जो महाभयंकर विळखा घातला होता, त्यातून आता जग सहीसलामत बाहेर पडले आहे. आता पुन्हा अशी कोणतीही महामारी या जगावरती येऊ नये, म्हणून प्रत्येक वारकर्‍याचं कर्तव्य आहे की आपण जगाच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे. संतांनीसुद्धा हा विचार सांगून ठेवला आहे.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती ।
देह कष्टविती परोपकारे ॥
 
 
वारी मार्गावर वृक्ष लागवड
Pandhari Vari : मी वारीत जाऊ शकलो नाही, परंतु ज्या रस्त्याने माझ्या गावातून वारी जाते त्या वारीच्या रस्त्यावरती जर मी त्या वारकर्‍यांसाठी सावलीसाठी दोन झाडं लावू शकलो तर ते वारीत गेल्याचे पुण्य त्याला लाभेल. आपल्या महाराष्ट्रातील वारकरी हा कृषक आहे. त्याच्या शेतीमध्ये पाऊस पडण्यासाठी वृक्षांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येकाने अवघ्या महाराष्ट्रामध्ये असंख्य वृक्षांचं वन हे निर्माण केलं पाहिजे. घराघरांमध्ये, शेताच्या बांधावरती, प्रत्येक रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड जर केली, तर वृक्षांचे मोठे वन काहीच वर्षांमध्ये त्या ठिकाणी उभे राहू शकते. हे वन समृद्धीचे, स्वच्छतेचे आणि निसर्गरम्यतेचे प्रतीक आहे. वारीच्या निमित्ताने जगवलेलं हे वन प्रत्येकाचं मन प्रफुल्लित करेल. प्रत्येकाच्या मनाला तजेला देईल, अशी सामूहिक कृती आपण प्रत्येकाने मनापासून करायला पाहिजे. नाहीतर मग त्या एका हौदामध्ये राजाने केलेल्या आवाहनानुसार प्रत्येकाने एक लोटा दूध आणायला सांगितलं होतं आणि प्रत्येकाने असा विचार केला की, आपण एक तांब्या पाणी टाकलं तर दुधामध्ये काय फरक पडेल? जेव्हा संध्याकाळपासूनच सकाळपर्यंत जी नियोजित वेळ होती तोपर्यंत प्रत्येक जण दूध टाकण्याऐवजी एक तांब्या पाणी टाकत राहिला. परिणामतः हौद दुधाने न भरता पाण्यानेच भरला, असे होईल.
 
 
आधुनिक वारी
ज्याला आपला वैचारिक कायापालट करायचा असतो, तो आपले विचार हा नेहमीच आधुनिक करत असतो. त्यामध्ये पर्याय शोधत असतो आणि जेव्हा एखाद्या गोष्टीला पायबंद घातला जातो, तेव्हा आपण त्याऐवजी काय करू शकतो, असा सकारात्मक विचार करत असतो.
दारी वृंदावनी तुळशीची बने ।
रामकृष्ण गाणे नारायण ॥
जगदानी इच्छी तुळशी एकदल ।
भवाचा सकळ विकीला तो ॥
जर अंगणामध्ये तुळशीची वने आपण लावली तर तो साक्षात परमात्मा प्रसन्न होतो, असा दृष्टांत अध्यात्मामध्ये आहे.
चला पंढरीसी जाऊ पांडुरंग डोळ्याने पाहू ।
पंढरीच्या परमात्म्याला डोळ्याने जरी पाहू शकलो नाही तरी मनाच्या दृष्टीने त्याला पाहण्यासाठी आपला भाव शुद्ध असला पाहिजे. साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर घ्यावा म्हणजे विठ्ठल आपल्या जवळच कुठेतरी आहे, असा भाव अर्पण करायचा. आपल्या सत्य कर्माची पुष्पमाला त्याला अर्पण करायची आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
संगतसे गुज पांडुरंग ॥
हा विश्वास त्याचा त्याला अर्पण करायचा आहे. मी जरी पंढरीला जाऊ शकलो नाही तरी माझी सेवा, कर्म, भाव हा इतक्या अंतरावरून मी त्याच्या पायाशी अर्पण करू शकतो, असा विश्वास मनामध्ये निर्माण केला तर निश्चितच मानसिक वारी पूर्ण होईल.
 
 
संतांची वारी
Pandhari Vari : पंढरीची वारी आहे माझे घरी ॥
आणिक न करी तीर्थव्रत ॥
असा विश्वास संत तुकोबारायांनी या समस्त वारकर्‍यांना दिलेला आहे आणि माझ्या घरात म्हटल्यानंतर घरातील प्रत्येकाचा विचार येत असतो.
धरितां पंढरीची वाट । नाही संकट मुक्तीचे ॥
ते सुख वर्णवया गती। एवढी कैची मज मती ॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला ॥
असा संदेश देतात.
जाय जाय तू पंढरी । होय होय वारकरी ॥
संतांच्या मांदियाळीने असा पंढरीचा वारीचा अगाध महिमा वर्णन केला आहे.
 
- 7588566400