- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती
पुरी,
Puri- Jagannath Rath Yatra : समुद्रकिनारी असलेले तीर्थक्षेत्र पुरी हे भगवान जगन्नाथ यांचा वार्षिक रथयात्रा उत्सव 53 वर्षांनंतर दोन दिवस चालणार्या सुरळीत आयोजनासाठी सज्ज झाले आहे. लाखो भाविकांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी रथयात्रेत सहभागी झाल्या. त्यांच्या भेटीसाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. अधिकार्यांनी सांगितले की, सहसा एक दिवस होणारा रथयात्रा उत्सव सुरळीतपणे पार पडण्यासाठी ओडिशा सरकारने व्यापक व्यवस्था केली आहे. काही खगोलीय कारणांमुळे ही रथयात्रा दोन दिवस राहणार आहे. यापूर्वी दोन दिवस रथयात्रा 1971 मध्ये काढण्यात आली होती.
यावर्षी काही परंपरांना फाटा देण्यात आला आहे. यात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र या तीन भावंड देवतांचा समावेश असलेल्या उत्सवाशी संबंधित काही विधी देखील रविवारी एकाच दिवशी झाले. जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारासमोर रथ उभे करण्यात आले असून, तेथून ते गुंडीचा मंदिरात नेण्यात येणार आहेत. तेथे आठवडाभर रथांचा मुक्काम राहणार आहे. रविवारी दुपारी भाविकांनी रथ ओढला. साधारणपणे रथयात्रेच्या आधी केले जाणारे विधी ‘नबाजौबन दर्शन’ आणि ‘नेत्रोत्सव’ रविवारी एकाच दिवशी करण्यात आले. ‘नबाजौबन दर्शन’ म्हणजे ‘स्नान पौर्णिमा’ नंतर आयोजित ‘अनासारा’ (क्वॉरंटाईन) नावाच्या विधीमध्ये 15 दिवस दारामागे असलेल्या देवतांचे तरुण रूप.
Puri- Jagannath Rath Yatra : पौराणिक कथेनुसार, ‘स्नान पौर्णिमेला’ जास्त स्नान केल्यामुळे देवता आजारी पडतात आणि त्यामुळे ते घरामध्येच राहतात. ‘नबाजौबन दर्शन’पूर्वी पुजार्यांनी ‘नेत्रोत्सव’ नावाचा विशेष विधी केला, ज्यात देवतांचे नेत्रपटल नव्याने रंगवले जातात. सर्व संबंधितांच्या सहकार्याने सर्व विधी सुरळीत पार पडले आहेत. भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने इतर सर्व विधी देखील वेळापत्रकानुसार पार पाडले जातील, असे पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वेन यांनी सांगितले.