नालंदाच्या वेदना!

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |
वेध
-अनिरुद्ध पांडे
‘अग्नीच्या ज्वाळा पुस्तके जाळू शकतील, पण ज्ञान नाही,’ असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचे लोकार्पण केले. भारतीय शिक्षणाच्या एका वैभवशाली परंपरेचे उद्ध्वस्त अवशेष त्याच दिमाखात आता नव्या रूपात भारत सरकारने सुमारे 1200 वर्षांनंतर जगासमोर आणले आहेत. जगातील पहिले विद्यापीठ नालंदा विद्यापीठ नालंदा शहरात असून ते शहर बिहारमध्ये राजधानी पाटणा शहरापासून 40 किमी अंतरावर आहे. गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने इसवी सन 370 ते 455 या काळात हे विद्यापीठ उभारले होते. सम्राट हर्षवर्धनाच्या काळात या विद्यापीठाची खूप भरभराट झाली होती. प्रारंभी ‘नलविहार विद्यापीठ’ असे नाव असलेल्या या विद्यापीठाच्या खर्चासाठी सम्राट हर्षवर्धनने 100 खेड्यांचे दान दिले होते. या सर्व खेड्यांमधील नागरिक या विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवत. नालंदा विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता. अनेक भव्य इमारती तेथे होत्या. 300 खोल्यांचे वसतिगृह, 80 सभागृहे, 100 अध्यापन कक्ष आणि ग्रहतार्‍यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. अनेक बगिचे, उपवने, तलाव, रस्ते असा भव्य आणि रमणीय परिसर या विद्यापीठाचा होता. हा परिसर, तेथील इमारती, सोयी-सुविधा पाहिल्यास असे प्रशस्त विद्यापीठ त्या काळीच काय, पण आजही जगात कुठेही असूच शकत नाही, हे निश्चित.
 
 
Nalanda University
 
या नालंदा विद्यापीठात अनेक मजली ‘धर्ममायायोग’ नावाचे भव्य ग्रंथालय होते. अक्षरश: लक्षावधींची ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर आणि रत्नरंजन अशी नावे होती. त्यात 90 लाख हस्तलिखिते आणि ग्रंथ होते. नालंदा विद्यापीठात त्या काळी 10 हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते. त्यात चीन, कोरिया व तिबेटी विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रवेशासाठी त्याही काळी कठीण अशी द्वारपरीक्षा (गेट...!) घेतली जात असे. अभ्यासक्रमात हीनयान व महायान पंथाच्या वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, पाणिनीसूत्रे या विषयांचा समावेश होता. बौद्ध व पाणिनी सूत्रसंग्रह अभ्यासाला विशेष महत्त्व होते. विद्यापीठाचे कुलगुरू (मुख्य आचार्य) शीलभद्र होते. धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र, चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र, वसुबंधू अशा त्या काळातील विद्वानांसह 1570 अध्यापक या विद्यापीठात कार्यरत होते. एकाच परिसरात दीड हजारांवर प्राध्यापक...! काही शतकांपासून उद्ध्वस्त नालंदा विद्यापीठ परिसर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जातो. भगवान बुद्धांशी या परिसराचा संबंध आहे. ते अनेकदा येथे येत असत. त्यांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मोग्गलाना याच भागातून आले होते. नालंदा विद्यापीठ हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षण केंद्र होते. म्हणूनच जपान, सिंगापूर आणि चीन या बौद्धधर्मीय देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्निर्मितीसाठी भरघोस निधी दिला आहे.
अशा या वैभवी नालंदा विद्यापीठाला नजर लागली ती 1193 साली. बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरीवर आक्रमण केले. येथील ग्रंथालयातील पुस्तके, ग्रंथ आणि हस्तलिखिते पेटवून दिली. कोट्यवधी पुस्तके, हस्तलिखिते तर कित्येक महिने जळत होती, अशी इतिहासात नोंद आहे.
 
 
नालंदा विद्यापीठात वैद्यकशास्त्रातून मिळणारे ज्ञान खिलजीला दिसून आले. येथील विद्वान आणि शिक्षकांना आपल्या दरबारातील हकिमांपेक्षा जास्त माहिती आहे, या वस्तुस्थितीमुळे— बख्तियार खिलजी चांगलाच अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने आयुर्वेदाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी हे सारे ज्ञानभांडार पेटवून दिले. ‘विकृती आणि धर्मांधता’ ती हीच, जी आजही काही प्रसंगी, काही लोकांकडून अनुभवायला मिळते. या विद्यापीठाची त्यावेळच्या धुरिणांनी काही वर्षांतच त्याची पुनर्स्थापना केली; पण नाममात्रच. 1190 मध्ये खिलजीने राखरांगोळी केल्यानंतर 1235 मध्ये चांगलुत्सावा या तिबेटी माणसाने या भागाला भेट दिली. 10 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षक अशा ‘संपन्न’ विद्यापीठ परिसरात 90 वर्षांचे आचार्य राहुल श्रीभद्र हे फक्त 70 विद्यार्थ्यांना शिकवताना त्याला दिसले होते. 2001 नंतर भारत सरकारने ‘नालंदा’च्या पुनर्निमितीसाठी हालचाली सुरू केल्या. 2010 मध्ये त्याला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून सूचिबद्ध केले असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. 2014 नंतर भारत सरकारने या पुनर्निर्मितीकडे अधिक लक्ष देऊन त्याला गती दिली. आता 455 एकरांच्या विस्तीर्ण भूखंडावर हे नालंदा विद्यापीठ आपल्या पुनर्वैभवासह पुन्हा दिमाखात उभे झाले आहे. 24 मोठ्या इमारती, 450 क्षमतेचे निवासी कक्ष, 40 हेक्टरचा जलाशय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड कोर्ट, अ‍ॅम्फी थिएटर, योग व क्रीडा संकुले, तीन लाख पुस्तक क्षमता असलेले वाचनालय यावर 1749 कोटी रुपये भारत सरकारने खर्च केले आहेत. आज ‘जगातील सर्वात मोठा प्रदूषणविरहित परिसर’ हेही त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
 
- 9881717829