मोहाकडून जीवनाकडे

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |
कानोसा
- अमोल पुसदकर
Tourism accident : लोणावळा येथील भुशी धरणाच्या धबधब्यामध्ये काही लोक वाहून गेल्याचा व्हिडीओ आपण सर्वांनी पाहिला. अत्यंत हृदयविदारक दृश्य होते ते! थोड्या वेळापूर्वी मौजमजा करायला गेलेले कुटुंब अनेकांच्या समोर बघता बघता अगदी थोड्याच वेळात काळाच्या उदरात गडप झाले. संकटात सापडलेल्या त्या कुटुंबातील लोक मदतीची याचना करीत होते. एकाच्या कडेवर एक छोटे बाळसुद्धा होते. परंतु, कोणीही त्यांना मदत करू शकले नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहासमोर केवळ मदतीची याचनाच ते करू शकले आणि त्यानंतर वाहत गेले. स्वतःचा मृत्यू त्यांना डोळ्यासमोर दिसत होता. अगतिकपणे त्यांना स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन करावे लागले. त्या छोट्या बाळाला तर काय घडत आहे, याची जाणीवही नसेल. मृत्यू म्हणजे काय असतो, हे त्याला माहितीही नव्हते. त्यानंतर तो जलप्रपात शांत होता. तेथील पाणी झुळझुळ वाहत होते. अशी काही घटना घडली असेल असे त्याच्याकडे पाहून कोणालाही वाटणार नाही. परंतु जे झाले ते भयावह होते.
 
 
Lonavala
 
दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशा घटना घडत असतात. चार मित्र वाढदिवसाची पार्टी करण्याकरिता तलावाच्या काठी गेले. थोडा वेळ तलावाच्या काठी बसल्यानंतर त्यांना असे वाटले की, आपण तलावात नौकाविहार केला पाहिजे. त्यासाठी तशा पद्धतीची तिथे सोय नव्हती. परंतु तेथेच असलेली एका मासेमाराची मासेमारी करणारी छोटीशी नौका त्यांनी मिळवली. त्या नौकेवर बसून त्यांनी ती नौका तलावाच्या पाण्यात नेली. तलावामध्ये सेल्फी घेता घेता ते चारही जण त्या छोट्याशा नावेच्या एकाच बाजूला आले अन् अगदी एका सेकंदात पाण्यामध्ये पडले. कोणालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे ते किनारा अगदी जवळ असतानासुद्धा किनार्‍यावर येऊ शकले नाही व त्या चार तरुणांचा करुण अंत सेल्फीच्या नादामध्ये झाला.
 
 
Tourism accident : चालत्या रेल्वेमध्ये एक हात दरवाजाच्या दंडाला पकडून सेल्फी घेत असताना तोल जाऊन तरुणाचा जीव गेल्याची घटना आपण कधीतरी वाचली असेल. एका निर्माणाधीन पुलाच्या पिलरवर चढून मैत्रिणीला एका हाताने वर ओढत असल्याचा देखावा करणार्‍या तरुण व तरुणीला त्यांचा हा मोह महागात पडला होता. घटना अनेक आहेत. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय!’ लोक हळहळ व्यक्त करतात. परंतु पुढे काहीच होत नाही. अशा घटना घडतच राहतात. अनेक तलावांच्या किनार्‍यावर त्या तलावात बुडालेल्या लोकांचा आकडा लिहिलेला असतो. तरीही लोकांना त्या तलावात जाण्याचा मोह होतोच आणि तो मोह त्यांच्या जिवावर बेततो.
 
 
Tourism accident : समुद्रामध्ये पाण्यामध्ये उभे राहून फोटो काढण्याचा मोह सर्वांनाच होतो. परंतु एकदा आई, वडील, मुलगा आणि त्याची नवविवाहित पत्नी हे चार जण समुद्राच्या पाण्यात उभे होते. त्यांनी एकाला फोटो काढायला सांगितले. पाठीमागून एक मोठी लाट आली. त्यात चौघही खाली पडले. लाट ओसरल्यावर सगळे उभे राहिले. पडताना चार जण पडले, परंतु उभे राहताना तीनच जण उभे राहिले. त्यांचा नवविवाहित मुलगा हा लाटेसोबत समुद्रामध्ये ओढला गेला होता. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. एक छोटासा मोह आणि अनमोल जीवनाचे नुकसान. माणसाचे जीवन अमूल्य आहे. त्याचे रक्षण कोणत्या ना कोणत्या प्रकारे केले पाहिजे. म्हणून हे छोटे छोटे मोह टाळणे आवश्यक आहे.
 
 
Tourism accident : पर्यटन स्थळांमध्ये काही स्थळे ही सर्वांना माहीत असलेली असतात तर काही स्थळे ही निसर्गाच्या कुशीत दडलेली असतात. त्याचा शोध स्थानिक गावकर्‍यांना किंवा अशा निसर्ग सौंदर्याचा शोध घेणार्‍या पर्यटकांना लागत असतो. त्यावेळेला असे सर्व लोक तिथे जात असतात. जे सर्वांना माहीत असलेले पर्यटन स्थळ आहे, त्या पर्यटन स्थळांचा शासनाने ‘पर्यटन स्थळ’ म्हणून विकास करणे आवश्यक आहे. प्रत्येक पर्यटन स्थळाशी संबंधित काही सौंदर्य स्थळे असू शकतात तर काही धोक्याची स्थळे असू शकतात. ज्या ठिकाणी जो धोका आहे, तो लक्षात घेऊन जर लोक संकटग्रस्त झाले तर त्यांना कसे वाचवायचे याची उपाययोजना प्रत्येक अशा पर्यटन स्थळावर असणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी नौकाविहार करण्याची संधी असेल किंवा शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी एकतर नौकाविहाराला संपूर्णतः बंदी असायला पाहिजे, तिथे नौकाविहाराचे कुठलेही साधन नको, नाव नको, बोट नको, काहीच नको किंवा व्यवस्थित बोट असावी व त्यामध्ये प्रशिक्षित असे नावाडी तथा प्रत्येक बोटीमध्ये दोन जीवन रक्षक तसेच नावेत बसणार्‍या प्रत्येकाला जीवन सुरक्षा जॅकेट घालूनच नावेत बसणे बंधनकारक केले पाहिजे. नावेमध्ये प्रवासी संख्येपेक्षा अधिक प्रवासी कुठल्याही परिस्थितीत बसवू नये. दुर्घटना झाल्यास नाव चालक तसेच तेथे कार्यरत सरकारी कर्मचारी हे दोषी समजले जावेत. अनेक वेळा गंगा नदीत नाव बुडते किंवा अन्य ठिकाणीही अशा पद्धतीच्या दुर्घटना घडतात. यामध्ये ज्या ठिकाणी लोकांना नावेतून प्रवास करण्याची गरज असते अशा सर्व ठिकाणी ‘जीवन सुरक्षा जॅकेट’ उपलब्ध असणे गरजेचे आहे.
 
 
Tourism accident : सरकारने सर्वच घोषित पर्यटन स्थळी पर्यटनास येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय योजणे आवश्यक आहे. प्रत्येक पर्यटन स्थळी शासनाचे एक कार्यालय व पुरेसे कर्मचारी तेथे असणे आवश्यक आहे. त्या कर्मचार्‍यांना संकट प्रसंगी पर्यटकांची सुटका कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. जंगल सफारी करीत असताना गाडी, गाडीचा चालक व मार्गदर्शक (गाईड) तेथे असतो. हे सर्वच लोक आजूबाजूच्या खेड्यातले असतात. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना रोजगार मिळतो. लोक जंगल सफारी मोठ्या प्रमाणावर करतात. सर्वच पर्यटन स्थळांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. दर्‍याखोर्‍यांमध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो. हरिद्वारमध्ये गंगेमध्ये स्नान करताना साखळी पकडून लोक स्नान करतात. यातून गंगा स्नान, पुण्य प्राप्ती व जीवन रक्षण या सर्वच गोष्टी साध्य केल्या जातात.
 
 
वन विभाग, पर्यटन विभाग या सर्वांनी वर्षानुवर्षे जी पर्यटन केंद्रे आहेत त्याच्या व्यतिरिक्त निसर्गाच्या कुशीत दडलेली पर्यटन केंद्रे शोधून काढायला हवीत. त्यांचा विकास करायला हवा. आवागमनाच्या सोयी निर्माण करणे गरजेचे आहे. लोकांनी आपण पर्यटनाला चाललो आहोत, जीव गमवायला नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेज, संस्थांनी संकटात सापडलेल्या लोकांना मदत कशी करावी, याचे व आपण संकटात सापडलो तर स्वत:ची सुटका कशी करू, याचेही प्रशिक्षण व जागृती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, हेच यानिमित्ताने येथे सांगावेसे वाटते...