परवाना निलंबित केलेल्या उत्पादनांची विक्री थांबवली

    दिनांक :09-Jul-2024
Total Views |
- पतंजलीची सर्वोच्च न्यायालयात माहिती
 
नवी दिल्ली, 
उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने एप्रिलममध्ये उत्पादन परवाने रद्द केलेल्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली आहे, अशी माहिती Patanjali Ayurveda पतंजली आयुर्वेद लि. ने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. ही उत्पादने मागे घेण्यात यावीत, असे निर्देश आम्ही 5,606 फ्रँचायझी स्टोअर्सला दिली, असे कंपनीने न्या. हिमा कोहली आणि न्या. संदीप मेहता यांच्या न्यायासनाला सांगितले. या 14 उत्पादनांच्या कोणत्याही पद्धतीच्या जाहिराती थांबवण्यात याव्या, असे माध्यम मंचांना सांगण्यात आल्याचे पतंजलीने स्पष्ट केले.
 
 
Patanjali
 
Patanjali Ayurveda : समाज माध्यमांना केलेली विनंती मान्य झाली आहे का आणि या 14 उत्पादनांच्या जाहिराती मागे घेण्यात आल्या आहेत का, याबाबतची माहिती देणारे शपथपत्र दोन आठवड्यांत सादर करा, असा निर्देश न्यायासनाने पतंजलीला दिला. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवली आहे. कोरोना लसीकरण मोहीम आणि औषधांच्या आधुनिक प्रणालींविरोधात पतंजलीच्या कलंकित मोहिमेचा आरोप करणार्‍या इंडियन मेडिकल असोसिशनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पतंजली आयुर्वेद लि. आणि दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांचा उत्पादन परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असल्याची माहिती यापूर्वी उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने न्यायालयाला दिली होती.