डॉ. मेघेंचा प्रवेश अन् शेंडे, डॉ. पावडेंची ‘डोकेदुखी’

10 Aug 2024 20:12:24
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
Wardha Marathi News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला विजय अनेकांचा आत्मविश्‍वास दुगणित करणारा ठरला आहे. महाविकास आघाडीतून वर्धेत इच्छूकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दत्ता मेघे ज्यांचे दैवत होते त्या डॉ. अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि काँग्रेसचे निष्ठावान शेखर शेंडे, कोणत्याही हालतीत लढणारच यावर ठाम असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांची डोकेदुखी वाढली आहे.
 
 
,lk j lk
 
 
विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी सागर व समिर या दोन मुलांसह 10 वर्षांपूर्वी भाजपात प्रवेेश घेतला. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांची दत्ता मेघे यांचे पुतणे म्हणून सर्वत्र ओळख होती. पण, ते भाजपात असल्याचे बरेच वर्षे जाणवले नाही. दरम्यान, त्यांनीही सामाजिक उपक्रमात सहभागी होत वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण केली. वेळप्रसंगी त्यांनीही भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. 15 दिवसांपुर्वी एका प्रसिद्धी पत्रकात डॉ. अभ्युदय मेघे यांच्या नावापुढे भाजपा नेते असा उल्लेखही करण्यात आला होता. त्यांचा भाजपातील वाढता सहभाग आणि सामाजिक कार्यातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नव्हते.
 
 
 
परंतु, विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या 10 वर्षातील कार्यशैलीत पक्षश्रेष्ठींना तृटी दिसलीच नसल्याने त्यांचे नावाला विरोध होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे तिकीटासाठी आपला विचार होणार नसल्याचे स्पष्ट होताच डॉ. अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. प्रमोद शेंडे यांचे चिरंजिव शेखर शेंडे दोन वेळा विधानसभेत पराभूत झाले असले तरी त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवत काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. त्यांनीही तिकिटाची मागणी केली. त्या पाठोपाठ डॉ. सचिन पावडे यांनीही काँग्रेसकडे तिकीटाची मागणी केली. याशिवाय अनेक जणांचा काँग्रेसच्या तिकिटावर डोळा आहे. डॉ. मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर डॉ. पावडेंचे काय हीच चिंता वर्धेकरांना दिवसभर पडली. भाजपाचे विचार जुळत नसल्याने डॉ. मेघे यांनी काँग्रेस जवळ केली हे जरी खरे असले तरी काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते डॉ. मेघेंना स्वीकारतील काय असा प्रश्‍न विचारला जात असल्याचे फिरता फिरता कळले. दोन दिवसांपासुन समाजमाध्यमांवर सुरू असलेली चर्चा आणि सागर मेघे यांचे डॉ. भोयर यांच्यासोबतच असल्याचे वक्तव्य
बरेच काही सांगुन जाते.
Powered By Sangraha 9.0