अग्रलेख...
दर चार वर्षांनी Olympic competition ऑलिम्पिक स्पर्धा होत असतात. वारकर्यांसाठी पंढरीचे तसेच शैवांसाठी काशीचे जे महत्त्व आहे, तसे जगभरातील सर्व खेळांच्या खेळाडूंसाठी ऑलिम्पिकचे महत्त्व आहे. ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी पंढरी आणि काशी म्हणायला हरकत नाही. हिंदू अन्य धर्माच्या खेळाडूंसाठी मक्का-मदिना आणि व्हॅटिकन सिटी म्हणायला हरकत नाही. अशा या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, नव्हे ते त्याने आपल्या उराशी जपलेले स्वप्न असते. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ते आयुष्यभर झटत असतात. अनेक पात्रता फेर्या ओलांडत ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळणे, हे एकप्रकारे पदक असते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक मिळाले आहे. हातातोंडाशी आलेल्या सुवर्णपदकाने भारताला हुलकावणी दिली. पदकतालिकेत भारताचे स्थान खूप खाली आहे. भारताला जी चार कांस्यपदके मिळाली, त्यातील तीन पदके नेमबाजीतील आहेत तर चौथे हॉकीचे आहे. याचा अर्थ अन्य खेळात भारताची कामगिरी सुमार नसली, तरी राहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाला जगातील सर्वोच्च अशा या स्पर्धेत फक्त पाच पदके मिळावी, ही कामगिरीही फारशी समाधानकारक नसली, तरी निराशाजनक नक्कीच नाही. मात्र, यात सुधारणेला अजून भरपूर वाव आहे. चीन, कोरिया, ब्रिटन, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणारी पदके पाहिली तर आपली दारिद्र्यरेषेखालील लोकांसारखी असल्याचे जाणवते. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले असते तर समस्त भारतीयांच्या आनंदाला पारावर राहिला नसता. भारतासाठी तो सोनियाचा दिवस ठरला असता. पण भारताला सुवर्णपदक मिळवता आले नसले, तरी भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक मिळवून दिले होते. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून देणे ही नीरजची असामान्य कामगिरी म्हटली पाहिजे. त्यामुळे सार्या देशाला नीरजचा अभिमान आहे. आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणे हे खरोखरच कौतुकास्पद म्हटले पाहिजे. त्यासाठी कष्ट, सराव आणि मेहनतीला पर्याय नाही. नीरजने आपल्या वर्तनाने या तीनही आघाड्यांवर देशातील खेळाडूंसमोर आदर्श ठेवला आहे. अर्जुनाला फिरत्या चक्रातील माशाचा डोळा दिसायचा तसेच २४ बाय ७ सराव करताना ऑलिम्पिकमधील पदकच दिसायला पाहिजे. नीरजला औपचारिकपणे भारतरत्न मिळाले नसले तरी तो देशवासीयांच्या दृष्टीने खर्या अर्थाने भारतरत्नच आहे.
हॉकीत भारताने कांस्यपदक पटकावत देशवासीयांना दिलासा दिला आहे. टोकियो Olympic competition ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने कांस्य पदक पटकावले होते. या आधी १९७२ मध्येही भारताने सलग दुसर्यांदा हॉकीत कांस्य पदक पटकावले हॉकीत भारताने आतापर्यंत १३ पदके पटकावली आहेत. पहिले पदक भारताला १९२८ मध्ये मिळाले. १३ व्या पदकापर्यंतच्या प्रवासाला भारताला ९६ वर्षे लागली. ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी होत असतात, म्हणजे २४ ऑलिम्पिक स्पर्धातून भारताने १३ पदके मिळविली आहेत. कधीकाळी हॉकी स्पर्धेत भारत सुवर्णपदकाचा मानकरी होता. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात हॉकी अनेक सुवर्णपदक मिळवून दिली. ध्यानचंद यांच्या काळातील भारताच्या हॉकी संघाची कामगिरी म्हणजे भारताचे सुवर्णयुग होते. आताही भारताच्या हॉकी संघातील खेळाडू ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत हॉकीतील भारताचे सुवर्णयुग परत आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची कामगिरी पाहिल्यानंतर कोट्यवधी देशवासीयांच्या मनात निर्माण झाला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळवून देण्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याचे योगदान मौल्यवान असे आहे. त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानू हिलाही पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. विनेश फोगाट १०० ग्रॅम जास्त वजनामुळे रौप्य वा सुवर्णपदकापासून वंचित झाली, तशीच स्थिती मीराबाई चानू हिचीही झाली. म्हणजे मीराबाई वजनामुळे पदकापासून वंचित झाली नाही तर प्रतिस्पर्धीपेक्षा एक किलो कमी वजन ती उचलू शकली. त्यामुळे यावेळी तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने रौप्यपदक प्राप्त केले होते.
विनेश फोगटला स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश नाकारण्यात आला. ५० किलो वजन गटात असलेल्या विनेशचे वजन शेवटच्या दोन दिवसात ग्रॅमने वाढले. रात्रभरात घाम गाळून तिने दोन किलोने आपले वजन कमी केले, पण शेवटी १०० ग्रॅम वजनाने तिचा घात केला. चहाचा कप आणि ओठ यातील अंतराबाबतच्या इंग्रजी म्हणीची यानिमित्ताने आठवण झाली. विनेश कुस्तीत किमान रौप्य नाही तर सुवर्ण जिंकेल, असा विश्वास सगळ्यांनाच वाटत होता. पण अनपेक्षित घटनाक्रमाने सर्वांनाच धक्का रिओ Olympic competition ऑलिम्पिक स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर विनेशने पॅरिस ऑलिम्पिकसाठी कसून सराव केला होता. पण तिच्या नशिबाने तिला दगा दिला, याबद्दल तिला वाटले तेवढेच दु:ख देशभरातील कोट्यवधी लोकांनाही वाटले. विनेश पदक मिळविण्यात अपयशी ठरली असली, तरी तिने देशातील कोट्यवधी लोकांचे प्रेम आणि विश्वास जिंकला आहे. कुस्तीला रामराम ठोकताना विनेशने व्यक्त केलेली अतिशय मार्मिक अशी आहे. ‘कुस्ती जिंकली, आई, मी हरले,’ अशी तिची प्रतिक्रिया सर्वांनाच हेलावून टाकणारी म्हणावी लागेल. रौप्य वा सुवर्णपदक मिळवून विनेशने कुस्तीला अलविदा केले असते, तर सर्वांनाच खूप आनंद झाला असता. पण मनुष्य हा ईश्वराच्या हातचे खेळणे आहे, असे जे आपण म्हणतो, त्याची यानिमित्ताने प्रकर्षाने आठवण येते. ‘जितनी भरी रामने उतना चले खिलोना’ असे एक हिंदी गीत आहे; त्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. नशिबापेक्षा जास्त आणि वेळच्या आधी कोणालाच काही मिळू शकत नाही, असे म्हटले जाते; ते किती खरे आहे, याची अशा प्रसंगाने जाणीव होते. विनेश, तू हरली नाही तर जिंकली आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. पूर्वायुष्यात जे काही झाले, त्याची सल मनात न ठेवता देशाचे नाव उंचावण्यासाठी तू जो प्रयत्न केला, संघर्ष केला, त्याला आमचा सलाम आहे. अजूनही तू हिंमत हरू नको. निवृत्तीचा निर्णय मागे घे आणि पुन्हा एकदा कुस्तीच्या रिंगणात उतर. चार वर्षांनी होणार्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेत देशाला सुवर्णपदक मिळवून देत देशाचे नाव उज्ज्वल अशा आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या आमच्या देशात आम्ही ऑलिम्पिकमध्ये चौदाही पदकं मिळवू शकत नाही, ही बाब सर्वांसाठीच आत्मपरीक्षणाची आहे. पदक विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करताना आम्हाला यापुढे याचाही विचार करावा लागणार आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके मिळविणारे देश आपल्या देशातील क्रीडा क्षेत्राला कोणत्या सुविधा उपलब्ध करून याचा अभ्यास करण्याची गरज आहे. ऑलिम्पिकसाठी खेळाडू एका दिवसात वा एका वर्षात तयार होऊ शकत नाही. त्यासाठी दीर्घकालीन योजना आम्हाला तयार करावी लागणार आहे. शालेय स्तरापासून या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी फक्त पुरेशी आर्थिक तरतूद करणे पुरेसे नाही, तर क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने सर्वांची मानसिकता आम्हाला तयार लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने यादृष्टीने गेल्या दहा वर्षांत अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत आणि त्याचाही परिणामही हळूहळू दिसून येत आहे.