सल्लागार प्रतिष्ठानाच्या ग्राहकांबाबत भूमिका स्पष्ट करा

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
- हिंडेनबर्गचे सेबीच्या अध्यक्षांना आव्हान
 
नवी दिल्ली, 
सिंगापूरमधील सल्लागार प्रतिष्ठान तसेच भारतीय सल्लागार कंपन्यांनी हाताळलेल्या ग्राहकांबाबत भूमिका स्पष्ट करा, असे आव्हान Hindenburg हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्ष माधबी बूच यांना दिले आहे. सेबीच्या विश्वासाहर्तेवर आलेला हा हल्ला म्हणजे चारित्र्य हननाचा प्रयत्न आहे, असे निवेदन बूच आणि त्यांच्या पतीने जारी केल्यानंतर हिंडेनबर्गने एक्सवर पोस्टची मालिका चालवली. त्यांनी प्रतिक्रियेतून काही महत्त्वपूर्ण कबुली दिली. त्यातून काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतात, असे हिंडेनबर्गने एक्सवर म्हटले आहे.
 
 
Madhabi Butch
 
Hindenburg : बूच यांनी दिलेल्या सार्वजनिक कबुलीतून त्यांची बर्मुडा-मॉरिशसमध्ये गुंतवणूक असल्याचे तसेच विनोद यांनी तिकडे पैसा वळवल्याचे स्पष्ट झाले आहे, असे हिंडेनबर्गने म्हटले आहे. माधबी बूच आणि त्यांच्या पतीने बर्मुडा-मॉरिशसमधील ऑफशोर फंडात अघोषित गुंतवणूक केल्याचा आरोप हिंडेनबर्गने शनिवारी केला होता. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांनी त्याच संस्थांचा वापर समभागांच्या किमती फुगवण्याकरिता पैसा फिरवण्यासाठी केला होता, असेही म्हटले होते. हे आरोप माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी संयुक्त निवेदन जारी करीत फेटाळले होते. सेबीवर पूर्णवेळ नियुक्ती मिळण्यापूर्वी २०१५ मध्ये सिंगापूरमध्ये वास्तव्य करणारा खाजगी नागरिक या नात्याने ही गुंतवणूक केली होती आणि सेबीचे अध्यक्षपद २०२२ मध्ये मिळाले होते. सेबीवर पूर्णवेळ नियुक्ती झाल्यानंतर हा निधी सुप्त असे त्यांनी निवेदनात म्हटले होते.