तभा वृत्तसेवा
अचलपूर,
Bichchan river : परतवाडा शहरातून वाहणार्या बिच्छन नदीच्या काठावरील भाग, शेती भूमाफिया खरेदी करून नदीच्या मूळ प्रवाहाला वळती करीत त्या ठिकाणी नदीलगतच्या भागात तात्पुरत्या स्वरूपाचे अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर प्रकार परतवाडा शहरात सुरू आहे.
एकीकडे देशात व राज्यात नदी जोड प्रकल्पाला चालना मिळत असताना परतवाडा शहरातून वाहणार्या बिच्छन नदीच्या पात्रात वाढते अतिक्रमण पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. मेळघाटातून बिच्छन नदी उगम पावत परतवाडा व अचलपूर शहरातून पुढे वाहत जाते. परतवाडा शहरात जवळपास ७ किलोमीटर भागातून ही नदी वाहते. परंतु वर्षानुवर्षे नदीकाठाच्या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. काहींनी तर नदीपात्रातच घरे, व्यावसायिक दुकाने थाटले आहे. सहा ते सात ठिकाणी गाई, म्हशीचे मोठमोठे गोठे उभारण्यात आले आहे. तसेच परतवाडा शहरातील मुख्य भागात चक्क नदीपात्रात खानावळ, टुरिस्ट हॉटेल, बांधल्या गेली आहे. त्याकरिता नदीचा प्रवाह देखील विटामातीची भरती टाकून दुसरीकडे वळवण्यात आला आहे.
दोन्ही काठावरील अतिक्रमणधारकांनी वेळोवेळी नदीपात्रात भरती टाकत ज्या ठिकाणी आपली घरे, व्यावसायिक दुकाने थाटले आहे, तेथून नदीचा प्रवाह वळविला आहे. याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होऊन नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेकदा नागरिकांच्या घरात देखील घुसले आहे. छोटा बाजार, कालीमाता झोपडपट्टी परिसर, लाल पूल, सफेद पूल आदी भागात बरेचदा पुराचे पाणी घुसलेले आहे.
जमिनीचे भाव परतवाडा शहरात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना नदीकाठ्याच्या भागातील जमीन व्यापारी वर्ग विकत घेऊन त्या ठिकाणी अतिक्रमण करीत असल्याचे अनेकदा निर्देशनास आले आहे. असाच प्रकार सैतुक बाग कॉलनी परिसर, रेल्वे पूल या भागात झाला असून काही लोकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकर्यांनी दिली होती. त्यांचा नेहमीचा रस्ता जेसीबीच्या साह्याने बंद करून त्या भागातून नदीचे पाणी वाळविण्याची तक्रार काही शेतकर्यांनी दिली होती. अशाच प्रकारे मुख्य मार्गावरून नदीच्या काठचा भाग सहसा दिसत नसल्यामुळे त्या भागात घरे उभारलेली दिसतात. एकदा उभे झालेले बांधकाम परत कुणीच हटवीत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.