मेळघाटचे धबधबे पर्यटकांसाठी पर्वणी

पावसाने बहरला सातपुड्यातील निसर्ग

    दिनांक :13-Aug-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
धारणी, 
waterfalls of Melghat गेल्या दोन दिवसाच्या सुटीमुळे आणि रिमझिम पावसाच्या सतत रिपरिपमुळे धारणी-चिखलदरा भागात पर्यटकांची रेलचेल होती. २५ दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने गोलाई, बैरागड, चिखलदरा, अकोट रोड, सेमाडोह, कावडाझिरी येथील धबधबे भरभराटीने कोसळत असून पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहेत. होटल आणि बार गच्च भरून मालामाल झालेले आहेत.
 
 
waterfalls of Melghat
 
विदर्भाचे नंदनवन सध्या काश्मिर झालेले आहे. सततचा पाऊस आणि सूर्यनारायण बेपत्ता झाल्याने वातावरण आल्हाददायक आहे. संपूर्ण जंगलाने हिरवा शालू पांघरलेला आहे तर छोटे नाले नद्या बनले तर नद्या सागर झालेल्या दिसत आहेत. धारणी तालुक्यातील अनोळखी धबधबा यावर्षी मध्यप्रदेश आणि अकोट व धारणीवाल्यांसाठी सर्वश्रेष्ठ पर्यटनस्थळ झालेले आहे. धारणीपासून ६० कि. मी. अंतावरील गिरीस्थान असलेल्या गोलाईचा दोन रंगाचा धबधबा आणि राणीखोरा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सेमाडोहच्या जवळचा जव्हारकुंड आणि हत्तीघाट तथा परतवाडा-धारणी मार्गावरचा छोटासा धबधबा पर्यटकांना थांबावयास सुचवत आहे. हरिसाल-अकोट रस्त्यावरचा अगदी सडकेवर कोसळणारा धबधबा तर पर्यटकांचे मन मोहून घेत आहे. चिखलदरा शहरातील भीमकुंड आणि देवी पाईंटवर पर्यटकांची जाम गर्दी असली तरी पंचबोल तथा चिखलदर्‍यातून आतीन रस्त्याने सेमाडोह मार्गावरील छोटे-छोटे धबधबे मोठे झाल्याने मोठा आनंद प्रदान करीत आहेत. waterfalls of Melghat हरिसाल गावाजवळून वाहणारी सिपना नदी तापीसारखी भरभरून वाहत आहे तर जुना पूल तुडूंब भरून वरून पाणी जात असल्याने मोठ्या पुलावरून पाहणे सुखद वाटत आहे. यामुळे पर्यटक मोठ्या पुलावर गाड्या उभ्या करून प्राकृतिक आनंद घेताना दिसत आहेत. गोलईचा धबधबा सध्या धारणी भागात प्रथम पसंतीवर आहे. येथे एकाच जागी पांढरा शुभ्र आणि मळकट रंगाची म्हणजे दोन प्रकारच्या वेगवेगळ्या जलधारा जमिनीवर जोराने आदळत असल्याचा आगळा-वेगळा अनुभव देत आहे. गोलाई धबधब्याचे वैशिष्ट्य असे की या धबधब्यात स्नान करता येत नाही. मात्र, धबधब्याच्या मागे पोहचून पाणी आपल्या अगदी समोर पडते.