प्रार्थना : एक आदर्श भारतीय जीवनमूल्य

18 Aug 2024 05:45:00
संत प्रबोधन

प्रार्थना म्हणजे काय?
Saint Tukaram : प्रार्थना हे एक आदर्श जीवनमूल्य आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही लहान-मोठ्या उत्सवकार्याची सुरुवात प्रार्थनेने करण्याचा आदर्श शिष्टाचार आहे. प्रार्थना हे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. प्रार्थना म्हणजे श्रेष्ठांजवळ केलेली मागणी आहे. संत साहित्यातील प्रत्येक कार्याची सुरुवात विशिष्ट आराध्य प्रार्थनेने केलेली आढळते. श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायारंभी केलेली प्रार्थना अशी-
श्री नमः॥ ओम नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा॥१॥
(ज्ञानेश्वरी अध्याय १ ओ. १)
 
 
praying
 
कोणत्याही मंगल कार्यारंभी श्रीगणेशाची प्रार्थना करतात. शालेय कामकाजाची सुरुवात ‘राष्ट्रगीत’ या राष्ट्रीय प्रार्थनेने होते. कोणत्याही मंगलप्रसंगी सुरुवातीलाच इष्ट देवतेची प्रार्थना करण्याचा प्रघात आहे. श्री संत एकनाथांनी आपल्या भागवताच्या प्रथम अध्यायारंभी इष्ट देवतांची आळवणी आहे.
श्रीगणेशायनमः॥ श्रीसरस्वत्यैःनमः॥
श्रीगुरुभ्योनमः॥ श्रीदत्तात्रेयायनमः॥
श्रीरुक्मिणी पांडुरंगाभ्यानमः॥
ओम नमोजी जनार्दना| नाही भवअभवभावना|
न देखोनि मीतूंपणा | नमन श्रीचरणा सद्गुरुराया॥२॥
(एकनाथी भागवत अ. १ ओ. १)
संत तुकारामांनी अभंगगाथेच्या सुरुवातीला केलेली प्रार्थना अशी-
श्रीअनंता मधुसूदना | पद्मनाभा नारायणा |
जगव्यापका जनार्दना | आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळदेवा आदिदेवा | कृपाळुवा जी |
महानंदा महानुभवा | सदाशिवा सहजरूपा ॥२॥
चक्रधरा विश्वंभरा | गरुडध्वजा करुणाकरा |
सहस्त्रपादा सहस्त्रकरा | क्षीरसागरा शेषशयना ॥३॥
कमलनयना कमलापती | कामिनीमोहना मदनमूर्ति |
भवतारका धरित्या क्षिती | वामनमूर्ति त्रिविक्रमा ॥४॥
अगा ये सगुणा निर्गुणा | जगजाणित्या जगजीवना |
वसुदेवदेवकीनंदना | बाळरांगणा बाळकृष्णा ॥५॥
तुका आला लोटांगणी | ठाव द्यावा जी चरणी |
हे चि करीतसे विनवणी | भवबंधनी सोडवावे ॥६॥
(तुकाराम गाथा अभंग ६४६)
 
 
अशा प्रकारे Saint Tukaram संत तुकारामांनी विश्वनियंत्या परमेश्वराची विनवणीच्या रूपात आळवणी करून आपल्याला संसाराच्या भवबंधनातून मुक्त करण्याची प्रार्थना केली आहे. वारकर्‍यांच्या प्रस्थानत्रयीत संत ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’, संत एकनाथांचे ‘भागवत’ व संत तुकारामांची ‘अभंगगाथा’ या असामान्य समावेश होतो. या तिन्ही ग्रंथांत प्रार्थना केलेल्या आढळतात. ते आपण आरंभी पाहिलेच. श्रीमद्भागवतामध्ये वर्णन केलेल्या प्रार्थनेमध्ये सर्व प्राणिमात्रांच्या सुख व कल्याणाचा भाव प्रकट झालेला आहे. या प्रार्थनेतून विश्वाचे कल्याण व्हावे, दुष्टांची वृत्ती चांगली व्हावी, भूतमात्रांनी एकमेकांचे शुभ चिंतावे, सर्वांचे मन मंगलाच्या प्राप्तीकडे प्रवृत्त व्हावे व बुद्धी भगवान श्रीहरीच्या स्वरूपात करावी, असा भाव प्रकट झाला आहे.
स्वस्त्यस्तु विस्य खलः प्रसीदता
ध्यायन्तु भूतानि शिवं मिथोधियाम
मनश्च भद्रं भजतादधोक्षजे
आवेशयता नो मतिरप्यपैतुकी॥४ ॥
(श्रीमद् भागवत ५.१८.९)
पुरातन प्रार्थनांमध्ये सर्वमांगल्य व शांतीची मागणी केली आहे.
जसे -
सर्वेऽत्र सुखिन सन्तु सर्वे संन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्ददुःखमाप्नुया ॥५ ॥
 
 
(विस्तारित
Saint Tukaram : अशा प्रकारे प्राचीन प्रार्थनांमध्ये सर्वांना सुखी करण्यासाठी, निरामय आनंद मिळण्यासाठी, कुणीही दुःखी राहू नये यासाठी प्रार्थना केली आहे. प्रार्थना म्हणजे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला साक्षी मानून, मनाला एकाग्र करून स्वतःच्या व जगाच्या कल्याणाकरिता ईशचिंतन करणे होय. त्यामध्ये थोड्या वेळासाठी सर्व जगाला विसरून परमात्म्याशी एकरूप होता येते. मनाची ही अवस्था म्हणजे ज्या कोण्या परमेश्वराला मानत असू, पूजत असू त्या परमेश्वराशी थेट संवाद साधणे होय. या संवादामध्ये आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा व्यक्त होत असतात. प्रार्थनेने जे बळ प्राप्त होते त्याला जगामध्ये कुठेही तोड नाही. म्हणूनच जागतिक स्तरावर पाहिल्यास विविध धर्मांमध्ये विविध धार्मिक प्रार्थना होताना दिसतात. प्रत्येक प्रार्थनेला प्रत्येक धर्मामध्ये विशिष्ट आहे. प्रार्थनेविषयी प्रत्येकाचा सकारात्मक दृष्टिकोन पाहावयास मिळतो. प्रार्थना हे धार्मिक वा आध्यात्मिक जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. साधा नमस्कार केला तरी त्यानंतर-
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव मम |
तस्मात कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ॥६ ॥
अशी प्रार्थना असते. पूजेच्या शेवटी प्रार्थना असते, कीर्तनाच्या शेवटी प्रार्थना असते, यज्ञाच्या समाप्तीनंतरही प्रार्थना कोणतीही भक्ती केली तरी, शेवटी प्रार्थना केली जाते.
ओम असतो मा सद्मय |
तमसो मा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय
ओम शांती ओम शांती ओम शांती ॥७॥
ओम भद्र कर्णेभिः श्रुणुयाम देवाः
भद्र पश्चिमाश्चः भीर्यजत्रा॥
 
 
Saint Tukaram : या वेदकालापासून चालत आलेल्या प्रार्थना आहेत. प्रार्थनेचे अनेक प्रकार आहेत. ऐहिक भोगप्राप्तीसाठी, मोक्षासाठी, भक्ती म्हणून, त्याचप्रमाणे स्वतःसाठी, दुसर्‍यासाठी व सर्वांकरिता असे प्रार्थनेचे प्रकार म्हणता येतील. प्रार्थना कुणापाशी केली आहे. श्रीमान-गृहस्थ किंवा सत्ताधीश, इंद्र-चंद्र किंवा शिव-विष्णू यावरूनही प्रार्थनेचे स्वरूप ठरत असते. प्रार्थना करणार्‍याच्या अंतःकरणात अगतिकत्वाचा भाव व ज्याच्याजवळ प्रार्थना करावयाची असते त्याच्याविषयी पूज्यबुद्धी असावी लागते, असा जरी सर्वसामान्य नियम असला तरी त्याला अपवाद आहेतच. अनुकरण करून आपणास असे म्हणता येईल की, मानवी बुद्धीचे- १) सात्त्विक २) राजस ३) तामस हे प्रकार आहेत. प्रार्थनेचेही तसेच तीन प्रकार होऊ शकतात. त्यातील राजस आणि तामस प्रार्थना या स्वार्थी, दिखाऊ आणि कित्येकदा तर स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांच्या अकल्याणासंबंधी असतात. जसे -
सत्वर पाव गे मला| भवानी आई रोडगा तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला | तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करिते | लौकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडाफडा बोलते| बोडकी कर गं तिला ॥ ४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते | खरूज होऊ दे तिला ॥५॥
दादला मारून आहुति देईन | मोकळी कर गं मला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे| एकलीच राहू दे मला ॥७॥
 
 
(एकनाथी भारुड)
या भारुडामध्ये बाह्यता अशा व्यक्तींच्या प्रार्थनेचे चित्रच संत एकनाथांनी रेखाटलेले आहे. सामान्य माणसांच्या प्रार्थना या बहुधा वासना आणि द्वेष, मत्सरातून उद्भवलेल्या असल्यामुळे त्या राजस व तामस या वर्गात मोडणार्‍या असतात. अशा प्रार्थना करणारी माणसे केवळ लौकिक सुखाची किंवा क्षुद्र वासनांची पूर्ती यासाठी लाचार असतात आणि ज्याच्याजवळ आपण प्रार्थना करीत आहोत, त्याच्या सामर्थ्याचादेखील ती विचार करीत नाहीत.
 
 
१) अकल्याणाची प्रार्थना - भूतप्रेतांची उपासना करून अघोरी मार्गाने काहीतरी मिळवू पाहणार्‍या लोकांची प्रार्थना ही त्यांच्या विनाशाला कारणीभूत होते. हे लोक स्वपीडा आणि परपीडारूपी बीज तामस मनोवृत्तीच्या शेतात पेरतात आणि त्यांना पुढे त्याप्रमाणेच फळ मिळते. याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी समर्पक शब्दात केले आहे. ते म्हणतात -
अगा आत्मपरपीडा | बीज तमक्षेत्रीं सुहाडा |
पेरिती मग पुढा | तेचि पिके॥९ ॥
(ज्ञानेश्वरी अ. १७ ओ. ९९)
 
 
अशा व्यक्तींची श्रद्धा, पूज्यत्वबुद्धी किंवा भक्ती ही ज्यांच्याकडे प्रार्थना करावयाची त्यांच्यावर नसते, तर त्यांची श्रद्ध असते. कुठल्याही मार्गाने साधावयाच्या विषय सुखावर. ते प्रार्थनेमुळे मिळेल, असे त्यांना वाटते. तोपर्यंतच त्यांची प्रार्थना टिकते. अशा प्रार्थना फलद्रूप होऊन काही प्राप्ती झाल्यास तीही टिकाऊ नसते. ती निश्चित सुखप्रदच होईल, असेही नाही. धन, पुत्र, पौत्र, सत्ता, प्रत्येक वेळी स्वतःलाही सुखाचे होतील, अशी शाश्वतीही नसते.
 
 
२) सात्त्विक प्रार्थना - प्रार्थना यापेक्षा वेगळी असते. ही केवळ लौकिक अशाश्वत विषय सुखाची मागणी करणारी नसते. असे मागितलेच तर ते केवळ स्वतःपुरते राहत नाही. तर, ती मागणी अधिक व्यापक भूमिकेतून मागितलेली असते.
काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी सस्यशालिनी॥
या प्रार्थनेप्रमाणे उदार असते.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा |
माझिया सकळा हरिच्या दासा |
 
 
प्रसिद्ध प्रार्थनेप्रमाणे ती असते. सात्त्विक प्रार्थना म्हणजे सात्त्विक बुद्धीने केलेली प्रार्थना, असे आपल्याला म्हणता येईल. सात्त्विक बुद्धीची व्याख्या गीतेने १८ व्या अध्यायात अशी केली आहे -
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये |
बंधं मोक्षं च या वेत्ति बुद्धीः सा पार्थ सात्त्विकी ॥
 
 
योग्यायोग्य कार्य व त्याचप्रमाणे भयकारक काय अभयकारक काय, हे जाणून त्याप्रमाणे त्या गोष्टीत यथोचित प्रवृत्ती आणि निवृत्ती ठेवणारी बंध आणि मोक्ष जाणणारी बुद्धी सात्त्विक होय, असे गीता सांगते.
 
 
३) Saint Tukaram संत तुकारामांनी संत संग लाभण्यासाठी केलेली प्रार्थना - ‘भवबंधनी सोडवावे’ अशी प्रार्थना किंवा भक्तिसुखाची मागणी करणारी प्रसिद्ध विनवणी अशी-
हेचि दान देगा देवा | तुझा विसर व्हावा ॥
न लगे मुक्ती धनसंपदा | संत संग देई सदा ॥
 
 
शंकराचार्यांच्या अनेक स्तोत्रांतून केलेली मोक्षासंबंधीची मागणी, ही सात्त्विक प्रार्थनेची उदाहरणे होत. पण, शेवटी ही प्रार्थनादेखील स्वतःपुरतीच आहे. अत्यंत उच्च प्रकारची असली, तरी केवळ स्वतःच्या उद्धाराची मागणी करणे हा स्वार्थच म्हणावा लागेल. परमार्थ हाही एक प्रकारे स्वार्थच आहे. हा स्वार्थ परदुःखाला कारणीभूत न होता स्वतःचे शाश्वत कल्याण करणारा आहे. हा स्वार्थ माणसाचे अंतिम साध्य आहे. म्हणून सात्त्विक प्रार्थना माणसाने करावीच.
 
 
४) प्रार्थनेची आवश्यकता - Saint Tukaram प्रार्थना ही आदर्शाकडे जाण्याची प्रेरणा जिवंत ठेवते. निष्ठा जागृत ठेवण्याचे कार्य करते. माणसाला आपल्या ध्येयाचे नित्य स्मरण देऊन त्याला खाली घसरू देत नाही. ध्येयाचे कधीही विस्मरण होऊ देत नाही. आज प्रत्येक राष्ट्रामध्ये राष्ट्रीय प्रार्थना म्हटल्या जातात. राष्ट्रीय प्रार्थनेमुळे आपल्या सर्व व्यक्तिगत, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा आधार असणार्‍या देशावरील निष्ठा व्यक्त होते व वाढत राहते.
 
 
समाजामध्ये सामान्यतः असे आढळते की, लोक हाती घेतलेले काम निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून प्रार्थना करतात. आदर्श शिष्टाचाराचे पालन केले जाते. वाचेचा दोषही त्याव्दारे नष्ट व्हावा. जे कार्य हाती घेतले असेल त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार स्वतःकडे येऊ नये. नास्तिकतेचा आरोपही आपल्यावर होऊ नये व विनम्रता आपल्या कृती-उक्तीतून प्रकट व्हावी, असे उद्देश प्रामुख्याने प्रार्थना करण्यामागे आढळतात. या सर्वांचे तात्पर्य हेच की, मंगल प्रार्थनेने कार्याची सुरुवात करणे हिच आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे.
 
-प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0