फडणवीस संपत नसतात, तू संपशील...

    दिनांक :02-Aug-2024
Total Views |
प्रासंगिक
- मोरेश्वर बडगे
Devendra Fadnavis : सार्‍याच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागेल. तसे झाले तर पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागू शकते. त्या आधी हातची कामे उरकायची सत्ताधार्‍यांना घाई असणार. त्या हिशोबाने प्रत्येकाने मोर्चेबंदी केली आहे. डाव-प्रतिडाव आखले जात आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावेळचे चित्र मोठे विचित्र आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा थेट सामना झाला. विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांची बहुरंगी जत्रा रिंगणात उतरलेली दिसेल. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन गट, वंचित आघाडी, अकोल्याचे तुपकर, बच्चू कडू यांच्या आघाड्या, एमआयएम याशिवाय शेकड्याने बंडखोर तुम्हाला मैदानात दिसतील. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही पाडायचे की लढायचे, याचा निर्णय लवकरच जाहीर करतील. एकूणच खूप सारे उमेदवार आखाड्यात उतरलेले असतील. त्यामुळे कोणाला मत द्यायचे, हा मतदारांपुढे मोठा प्रश्न राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज हेही यावेळी मैदानात उतरले आहेत. त्याची झलक अकोल्यात दिसली. या निवडणुकीत तुम्हाला खूप राडे पाहायला मिळतील. कारण राजकारण आता विचारधारेचे राहिलेले नाही. शक्तिप्रदर्शनाचे माध्यम बनले आहे.
 
 
Devendra Fadnavis
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला तडाखा बसला; ‘४१ पार’ करता आले नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक जिंकल्या तर १० पैकी ८ जागा जिंकून शरद पवारांनी सर्वाधिक स्ट्राईक रेट गाठला. मुस्लिम मतांच्या जोरावर ठाकरे सेनेने मुंबईतल्या चार जागा काढल्या. यावेळी मुस्लिम व्होट बँक त्यांना साथ देईलच अशातला भाग नाही. त्यामुळे की काय, उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. पण त्यांनी अंगात आणावे असे काहीही घडलेले नाही. महायुतीला फक्त जागा मिळाल्या. मात्र मतांच्या बाबतीत फक्त दोन लाख मतांचा फरक आहे. वंचित आघाडी लोकसभेत चालली नाही. मात्र विधानसभेत धूम करू शकते. मुंबई-पुण्याच्या मराठी पट्ट्यात मनसेची ३ ते ६ टक्के मते मोठ्यामोठ्यांची बंडी उलार करू शकते. राजू शेट्टी, एमआयएम आणि सपा यांचीही स्वत:ची प्रभाव क्षेत्रे आहेत. शिवाय मराठा फॅक्टर म्हणजे आहेच. यावेळेस महाविकास आघाडी एकत्र लढेल काय? शक्यता कमी वाटते. कारण प्रत्येकाला सीएम व्हायचे आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण अतिशय आक्रमक होते. उद्धव यांच्या भाषणात टोमणेबाजी, शिवीगाळ यांची भरमार असते. हे भाषणही वेगळे नव्हते. मात्र या भाषणात त्यांनी सभ्यतेच्या सार्‍या मर्यादा ओलांडल्या. ‘एक तर राहशील, नाहीतर मी राहीन,’ अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. ‘मला आणि आदित्यला तुरुंगात डांबण्यासाठी फडणवीसांनी डाव खेळले,’ असा गंभीर आरोप त्यांनी शरद पवार गटाचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आधार घेत केल्याने एकच खळबळ माजली. ‘फडणवीसांनी मला दिले होते. त्यावर सह्या करायला सांगितले होते. मी त्यावर सह्या केल्या असत्या तर ठाकरे पितापुत्र जेलमध्ये असते,’ असा दावा करताना देशमुखांनी पेनड्राईव्हही दाखवला. ‘अनिलबाबू हे शरद पवार आणि उद्धवबद्दल काय बोलतात त्याचा मसाला आपल्याकडेही आहे.
 
 
 
Devendra Fadnavis : योग्य वेळी तो बाहेर काढू,’ अशा भाषेत फडणवीसांनी ठणकावले. दोघांकडेही पेनड्राईव्ह आहे. मात्र दोघेही तयार नाहीत. लोकसभेत लोकांनी हात दिला म्हणून महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे, पण लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते, तिथले प्रश्न वेगळे असतात. संविधान बदलवण्यासाठी भाजपाला जागा हव्या आहेत, असा नॅरेटिव्ह विरोधकांनी चालवला. लोक त्या प्रचाराला भुलले. पण आता विधानसभा निवडणूक आहे. इथे स्थानिक प्रश्न असतात. त्यामुळे उद्धव हवेत उडू नये; आणि एक सांगू का? ठाकरेंनी फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणे म्हणजे कावळ्याने गरुडाला आव्हान देण्यासारखे आहे. फडणवीस हे एकटे नाहीत. फडणवीस ही व्यक्ती नाही, संस्था आहे, शक्ती आहे. त्यांच्या पाठीशी नरेंद्र मोदी आहेत, अमित शाह आहेत, संपूर्ण भाजपा पक्ष आहे. फडणवीसांना संपवणे तर दूर; त्यांच्या केसापर्यंतही पोहोचू शकत नाहीत. स्वत:चे ४० आमदार सांभाळू शकले नाहीत ठाकरे आणि लंब्याचवड्या गप्पा मारतात. महाआघाडीचे सरकार २५ वर्षे टिकेल, असे संजय राऊत म्हणाले होते. २५ महिनेही टिकले नाही. उद्धव यांना अलिकडे पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत. त्यांनी शरद पवारांना अजून ओळखलेच नाही, असे म्हटले पाहिजे. लिहून ठेवा. उद्धव यांचा सर्वात शत्रू शरद पवार असतील. ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार या वयात घाम गाळत नाहीत. त्यांना आपल्या मुलीला मुख्यमंत्रिपदी बसलेले पाहायचे आहे. काँग्रेसला घेऊन ते वेगळे जुगाड जमवू शकतात. तिकडे काँग्रेसचे नाना पटोले यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. दोन उपमुख्यमंत्री करू शकतात. मात्र, मुख्यमंत्री एकच असतो. इथे तर तिघे तिघे टपून तिकडे मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण हवे आहे आणि त्यासाठी त्यांनाही सत्ता हवी आहे. पण आता ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होणार आहे. सगळेच मराठे हे जरांगे यांचे समर्थक नाहीत हे आता हळूहळू उघड होऊ लागले आहे. जरांगे यांची पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. प्रसाद लाड, आशिष शेलार, दरेकर हे मराठा नेते उघडपणे मैदानात उतरले आहेत. मतांचे ध्रुवीकरण झाले तर तिकडे ओबीसी व्होट बँकही एकगठ्ठा मतदान करू शकते, हा धोका आता मराठ्यांच्याही लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे जरांगे किती जागा निवडून आणू शकतील यावर मराठा समाजातच खल सुरू झाला आहे. या वादात विरोधी पक्ष स्वत:चे हात भाजून घेऊ इच्छित नाहीत. उद्धव दिल्लीत मोदींकडे बोट दाखवले आहे. उशिरा का होईना, शरद पवारांनी या वादात उडी घेतली आहे. मराठा मतदारांची संख्या २८ टक्के आहे. तिला सोबत ठेवण्याच्या नादात जरांगेंनी फडणवीस आणि भाजपाला लक्ष्य करणे सुरूच ठेवले तर ही चाल बूमरँग होऊ शकते. ओबीसींचेही ध्रुवीकरण होऊन भाजपाला लाभ होऊ शकतो. 
 
- ९८५०३०४१२३
(लेखक पत्रकार आहेत.)