शिक्षकासाठी नवनीतपूर जिप शाळा तीन दिवसापासून बंद

02 Aug 2024 21:08:15
- सुरबन येथेही करणार शाळा बंद

अर्जुनी मोरगाव, 
तालुक्यातील Navneetpur Zip School नवनीतपूर बुटाई क्रमांक 1 जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्याच्या होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्‍न या निमित्ताने उभा झालेला आहे.
 
 
Navneetpur Zip School
 
तालुक्यातील नवनीतपूर बुटाई 1 येथे जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. शाळेत 141 अशी पटसंख्या असून 6 शिक्षकांची संच मान्यता आहे. मात्र सद्यस्थितीत एका शिक्षकाला प्रतीनियुक्तिवर जिप शाळा शिवरामटोला येथे पाठविण्यात आले. तर नुकत्याच बदली प्रक्रियेतून आलेल्या शिक्षकांच्या बदलीवर आक्षेप घेण्यात आला. मुख्याध्यापक हे कार्यालयीन कामात सतत व्यस्त असतात. त्यामुळे या 141 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्याची जबाबदारी केवळ 3 शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे वैतागलेल्या पालक आणि ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसापासून शाळेत मुलांना पाठवणं बंद केले आहे. परंतु अजूनही वरिष्ठांकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. असाच प्रकार तालुक्यातील द्विशिक्षकी शाळा असलेल्या सूरबन बोंडगाव येथे समोर आला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या 27 असून केवळ एका शिक्षकावर भार देण्यात आलेला आहे. कार्यरत असलेले शिक्षक बैठक, कार्यालयीन काम असल्याचे सांगून मध्येच शाळेला कुलूपबंद करून जातात. त्यामुळे तिथल्याही पालकांनी 5 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
आधीच तालुक्यात 72 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तरीही एप्रिल पर्यंत 29 शिक्षकांची पदोन्नती निश्‍चीत असून या 29 जागा रिक्त होणार असल्याने तालुक्यातील शिक्षण सेवा कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. आत्ताच द्विशिक्षकी शाळेत 1 शिक्षक आणि 1 ते 7 मध्ये 6 मंजूर शिक्षकांच्या ठिकाणी 3 तर कुठे 4 शिक्षक आहेत पुन्हा नव्या 29 शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्यानंतर बर्‍याच शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा होणार आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः कोलमडण्याची चिन्ह आहेत.
  
 

शाळेला 6 शिक्षकांची संच मान्यता असून शासनाने नियुक्ती केलेल्या 5 शिक्षकांचा कोटा पूर्ण करावा. उर्वरित 1 स्वयंसेवक नेमण्याची जबाबदारी गावकरी मिळून घेऊ असे नवनीतपूरचे सरपंच मोहन साखरे यांनी सांगितले.
 
 

शिक्षकांच्या 72 जागा रिक्त असल्यामुळे शिक्षक पुरविणे अवघड आहे. त्यामुळे सदर शाळेला 1 स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या स्वयंसेवकाचे मानधन हे जिल्हा परिषदेच्या निधीतून देण्यात येईल, असे पंसचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0