रुद्र अष्टाध्यायी : शिवाची अद्भुत साधना!

    दिनांक :21-Aug-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- दिलीप जोशी
Mahadev Rudrabhishek : सनातन संस्कृतीत विविध प्रकारांच्या अर्चना सांगितल्या आहेत. त्यात श्रुती, स्मृती, पुराणोक्त, शास्त्रोक्त, व्यासोक्त आणि वेदोक्त पुण्यफळ अर्चना पद्धतींचा समावेश आहे. वैदिक सूक्तांचा उपयोग करून षोढशोपचार पूजनाची पद्धत संपूर्ण भारत वर्षात प्रचलित आहे. वेद भारतवर्षाला एकत्रित ठेवणारे आणि आसेतुहिमाचल असणारे वाङ्मय आहे. ‘पृथिव्यै समुद्रपर्यंताया एक राळिती’ असा वैदिक आहेच. खरं तर वेदांच्या राशी हा उल्लेख वेदांचे अमर्याद रूप प्रकट करतात. ज्ञानेश्वर माउलींनी स्पष्ट शब्दात उल्लेख केला की,
 
 
Shravan
 
 
हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू |
तो स्वये सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादीला |
 हे वेद शिवस्वरूप आहेत. ‘वेदः शिवः शिवो वेदः’ म्हणजे वेद हेच शिव आणि शिव हेच वेद. या राशींचे चार भाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद भगवान वेदव्यासांनी पाडले. यातील विशेषतः यजुर्वेदातील आठ सूक्तांचा अर्क म्हणजे रुद्रसूक्त आहे. भगवान महादेवांना रुद्राभिषेक करताना वैदिक पद्धतीत रुद्र अष्टाध्यायीचा वापर करतात.
यजुर्वेदातील आठ वैदिक सूक्तांचा एकत्रित असा सूक्तसमूह म्हणजे रुद्र अष्टाध्यायी. श्रावण महिन्यात शिवमहादेवांना रुद्राभिषेक करतात तो याच रुद्राध्यायीने. मंथुन नवनीत तयार व्हावे तशी रुद्र अष्टाध्यायी निर्माण झाली आहे. रुद्राध्यायी प्रामुख्याने यजुर्वेदातील असली, तरी त्यातील काही सूक्ते ऋग्वेद, साम आणि अथर्ववेदातही आहेत. म्हणूनच हा ‘वेदाचा काढा’ म्हणायला हरकत नाही. रुद्र अष्टाध्यायीवरूनच लक्षात येते की, रुद्राचे आठ अध्याय म्हणजे आठ सूक्तांचा हा सूक्तसमूह आहे. त्यालाच जोडून शांत्यध्याय आणि स्वस्ती मंत्राध्याय असल्यामुळे ते १० अध्याय होतात. सोबतच आठ अध्यायानंतर महागौरीसाठी श्रीसूक्त पठन केले जातेच. पण प्रमुख आठ अध्याय आहेत. रुद्राध्यायीत साधारणतः २१३ वैदिक ऋचा म्हणजे मंत्र आहेत. थोडक्यात यजुर्वेदातील एकूण ४० अध्याय सात कांड आणि ३ हजार ९८८ मंत्रांपैकी आठ सूक्त ज्यांचे एकूण २१३ मंत्र आहेत. ते निवडून प्रभावी तयार झाली.
 
 
 
Mahadev Rudrabhishek : प्रथम अध्याय १० ऋचांचा किंवा मंत्रांचा असून याला ‘शिव संकल्प सूक्त’ म्हणतात. दुसर्‍यात २२ ऋचा आहेत. याला सुप्रसिद्ध असे ‘पुरुषसूक्त’ म्हणतात. तिसरा अध्याय १७ ऋचांचा असून याला आदित्य किंवा सूर्यसूक्त म्हणून संबोधिले जाते. चौथा अध्याय वज्रसूक्त. १७ ऋचा असलेल्या या अध्यायाला इंद्रसूक्त, अप्रतिरथ सूक्त आणि उत्तर प्रतिरथ म्हणूनही ओळखतात. हे सूक्त इंद्रदेव आणि देवगुरू बृहस्पती यांना समर्पित आहे. अध्याय पाचवा हा प्रमुख अध्याय असून रुद्राभिषेकात हल्ली याच अध्यायाची आवर्तने केली जातात. एकूण ६६ ऋचा असलेले हे रुद्रसूक्त आहे. याला ‘नमक अध्याय’देखील म्हणतात. यातील प्रत्येक मंत्र हा ‘नमःकार’ आहे.
 
 
‘नमस्ते रुद्र मन्यव उतोत ईशवे नमः |’ ही सुरुवात आहे. नमःकारामुळे हा नमक अध्याय गणला जातो. सहाव्या अध्यायात प्रचंड ऊर्जा असलेला महामृत्युंजय मंत्र आहे. रुद्रपरिवाराचा समावेश मंत्र या अध्यायात आहे. एकूण आठ ऋचा असलेल्या अध्यायाला महिश्वसा किंवा महिच्छार अध्याय म्हणतात. सातवा अध्याय केवळ सात ऋचांचा आहे. या अध्यायाला ‘अरण्यक श्रुती’ म्हणतात. काही ठिकाणी या अध्यायातील केवळ तीन रुद्राभिषेक प्रसंगी उपयोगात आणतात. उर्वरित चार ऋचा चिताग्नी प्रसंगी वापरतात म्हणून त्या वर्ज्य गणल्या जातात. आठवा अध्याय पण महत्त्वपूर्ण असा ‘चमकाध्याय’ आहे. प्रत्येक ठिकाणी ‘च मे’ लावले जाते. वाजश्चमे, प्रसवश्चमे अशी चमके लावली जातात. हा अध्याय वैदिक गणितीय गणनदेखील आहे. एका चमे, तिस्र चमे, पंच चमे, सप्त चमे, नव असे गणन यात आहे. नववा आणि दहावा अध्याय प्रघाताप्रमाणे शांतिमंत्र आणि स्वस्ती प्रार्थनाध्याय आहे.
आठ अध्यायाचे हे रुद्रसूक्त आहे. यातील मुख्य प्रार्थना ‘तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु’ हीच आहे. म्हणजे माझे मन शिवसंकल्पी म्हणजे कल्याणकारी संकल्पाचे होवो. रुद्राचा अर्थही तसाच आहे.
 
 
रुतम (दुःखम) द्रावयती, नाशयती इति रुद्रः
Mahadev Rudrabhishek : दुःखाचा नाश करतो तो रुद्राभिषेक करताना आपण नेहमी शब्द ऐकतो लघुरुद्र, महारुद्र वगैरे. काय आहे हे? भगवान महादेवाच्या पिंडीवर केवळ एकाच व्यक्तीने ११ वेळा रुद्राध्याय म्हटला तर त्याला एकादशनी म्हणतात. हाच रुद्राध्याय ११ जणांनी ११ वेळा म्हणजे एकूण १२१ वेळा म्हटला तर याला ‘लघुरुद्र’ म्हणतात. असे लघुरुद्र ११ वेळा झाले म्हणजे १३३१ वेळा तर त्याला ‘महारुद्र’ म्हणतात. असे महारुद्र ११ वेळा झाले म्हणजे रुद्राध्याय १४,६४१ वेळा म्हटला गेला म्हणजे त्याला ‘अतिरुद्र’ म्हणतात. काही वेळा अति अति रुद्राभिषेकही केला जातो. प्रत्येक रुद्र प्रकाराला ११ पटीने वाढविल्यास पुढील वरिष्ठ रुद्रपाठ होईल. रुद्र अष्टाध्यायी वैदिक ऋचांची असल्यामुळे ती अपौरुषेय आहे. तरीदेखील रुद्राचे कर्ते ऋषि स्वयं ब्रह्मदेव आहेत. काही ठिकाणी केवळ नमक चमक म्हणजे पाचवा नमकाध्याय आणि आठवा चमकाध्याय उपयोगात आणून रुद्रपूजन केले जाते.
 
 
चमकं नमकं चैव, पौरुषसूक्तं तथैवच |
नित्यं त्रयं प्रयुंजानो, ब्रह्मलोके महियते !
 Mahadev Rudrabhishek : रुद्राध्यायीत जीवसृष्टीचा विचार म्हणजे वृक्ष, पशुपक्षी, अर्भकापासून कुंभारादी व्यावसायिक, सभा, सभापती, गण, गणपती अशा सर्वांच्या प्रति कृतज्ञभाव नमन केले थोडक्यात, रुद्राध्याय म्हणजे समाजजीवनाचा समन्वय आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांची सांगड म्हणजे रुद्राध्यायी आहे. अजून एक गंमत सांगू; स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वकील शब्दासाठी अधिवक्ता किंवा विधिज्ञ हे शब्द दिले. त्यातील ‘अधिवक्ता’ हा शब्द रुद्राध्यायीत आहे. ‘अध्यवोचदधिवक्ता’ ही ऋचाच आहे. असो. रुद्राध्यायी प्रवृत्ती मार्गात तृप्तता प्रदान करून निवृत्ती मार्गाकडे रुद्राध्यायी अत्यंत ऊर्जादायी, समशीतोष्ण आणि प्रसंगी विद्युल्लतेसम सूक्त समूह आहे.
 
 
आपण सामूहिक रुद्रपाठ जेथे स्वराघातासह चालू असेल किंवा युट्यूबवर शांतचित्ताने ऐका फक्त. आपल्या शरीरातील स्पंदने आणि तरंग लहरी हेलावल्याचा अनुभव येईल. शरीरातील सर्व चक्रावर आघात होऊन कुंडलिनी जगदंबा लहरी कंपायमान होण्याची सुक्ष्म अनुभूती येईल. रुद्राध्यायी संथा घेतल्याशिवाय म्हणता येणार पण ती आपण युट्यूबवर ऐकू शकतो. केवळ ऐकली तरी चित्ताची विरागता, ऐश्वर्याचा विवेक आणि परमेष्ठीशी अनुसंधान अनुभूती नक्की येईल. श्रावणात प्रयोग तर करून पाहा.
शिवो भुत्वा, शिवम् यजेत्! 
 
- ९८२२२६२७३५